अनाकलनीय, अविश्वसनीय आणि अथांग धक्क्याचे पडसाद प्रस्थापित पटलावर दूरवर जाणवत असतात. अणू तंत्रज्ञानाचा शोध हा त्यापैकीच एक! जगातील एकमेव आण्विक हल्ल्याला ८० वर्षे होत आली तरी अण्वस्त्रांबद्दलचे कुतूहल, दहशत आणि अनिश्चितता कमी झालेली नाही. यातूनच गेल्या आठ दशकांत जी जागतिक व्यवस्था जन्माला आली तिचा पाया आण्विक तंत्रज्ञान हेच बनले. कधी काळी औद्याोगिकीकरण, यांत्रिक कुशलता, तेलाचे साठे इत्यादी कारणांवरून ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ वर्गात विभागलेल्या जगाची नवी विभंगरेषा अण्वस्त्रे बनली. तिथून पुढे जागतिक राजकारणाची दिशा आण्विक जरब, शीतयुद्ध, अण्वस्त्र प्रसारबंदीचे राजकारण आणि नवीन तंत्रज्ञानाचा विकास यांनी प्रामुख्याने ठरविली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
चढती कमान
१९४५ च्या जपानवरील हल्ल्यानंतर स्टॅलिन आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमन यांच्यात दुरावा आला. अमेरिका अण्वस्त्रांसारखे काहीतरी महाभयंकर विकसित करीत आहे याची कल्पना मॉस्कोला दिली गेली नव्हती. अण्वस्त्र तंत्रज्ञानावर आपलाच एकहाती अंमल पाहिजे, असा अमेरिकेचा प्रयत्न होता. मात्र १९४९ साली ‘फर्स्ट लायटनिंग’ या नावाखाली सोव्हिएत महासंघाने यशस्वी आण्विक चाचणी करून अमेरिकेला शह दिला. तिथून पुढे दोन्ही देशांत अघोषित स्पर्धा चालू होऊन जमिनीवर, पाण्याखाली, अवकाशात अशा सर्व ठिकाणी आण्विक चाचणीचे पेव फुटले. त्याचबरोबर आण्विक केंद्रीकरणाचे तंत्रज्ञान विकसित होऊन पहिल्या हायड्रोजन बॉम्बची चाचणी १९५२ मध्ये अमेरिकेत घेण्यात आली जिची संहारकता नागासाकी येथे वापरण्यात आलेल्या बॉम्बच्या ५०० पट अधिक होती. विनाशाकडे जाण्याची स्पर्धा तारतम्य हरवून बसते. सोव्हिएतने १९६१ साली मानवी इतिहासातील सर्वात मोठी अशी ‘झार बॉम्ब’ ही चाचणी आर्क्टिक समुद्रात पार पाडली जिची संहारकता नागासाकी बॉम्बपेक्षा १५००- २००० पट जास्त होती. काही तज्ज्ञांच्या अंदाजानुसार सोव्हिएतकडे याच्या दुप्पट क्षमतेची स्फोटके आहते. दोन गोष्टी अण्वस्त्र प्रसारबंदीच्या मोहिमेस कारणीभूत ठरल्या. पहिली म्हणजे क्युबन मिसाईल संकट! अमेरिकेने सोव्हिएतच्या आजूबाजूला अण्वस्त्रे तैनात करण्याचे ठरवल्यावर सोव्हिएतने अमेरिकेतील फ्लोरिडाच्या किनाऱ्यापासून केवळ १५० किलोमीटर्स दूर, क्युबामध्ये अण्वस्त्रे तैनात करण्याचा निर्णय घेतला. आण्विक धोका थेट परसात उभे राहणे ही अमेरिकन परराष्ट्र धोरणाची नाचक्की होती. त्यातच १९६४ मध्ये कम्युनिस्ट चीनने अण्वस्त्र चाचणी केल्यानंतर जागतिक पातळीवर या भस्मासुराला आवरण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. द्विध्रुवीय सिद्धांतानुसार, दोनच शक्तिकेंद्रे असतात तेव्हा जग अधिक शांततापूर्ण असण्याची शक्यता बळावते. चीनचा आण्विक सत्ता म्हणून उदय ही या गोंधळाची सुरुवात होती. भविष्यातील आणखी अण्वस्त्रसज्ज राष्ट्रांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी १९६८ मध्ये अण्वस्त्र प्रसारबंदी कायद्याचा अंगीकार संयुक्त राष्ट्रांनी केला. भारताने या कराराचा सदस्य होण्यास दिलेला नकार हा भविष्यात घडणाऱ्या अनेक घटनांची नांदी होती.
क्षेपणास्त्रांची रणनीती
अण्वस्त्र प्रणालीचा सर्वसमावेशक विचार करायचा झाला तर प्रत्यक्ष स्फोटके, अण्वस्त्रांची नियंत्रण आणि उपयोजन करणारी यंत्रणा म्हणजेच प्रत्यक्ष हल्ला करायचा झाला तर त्याचा निर्णय कोण आणि कसा घेणार हे ठरविणारी यंत्रणा, अण्वस्त्रे किमान वेळात अचूकपणे वाहून नेणारी वहनक्षमता म्हणजेच क्षेपणास्त्र यंत्रणा आणि आण्विक धोरण म्हणजेच आण्विक तंत्रज्ञानाचा आणि अस्त्रांचा वापर कोणत्या कारणासाठी करायचा याचे नियम या सर्व गोष्टींचा अंतर्भाव होतो. संहारक क्षमतेचे नवनवीन विक्रम रचल्यानंतर राष्ट्रांनी क्षेपणास्त्र तंत्राकडे आपला मोर्चा वळविला. पहिला अणुहल्ला हा विमानातून बॉम्ब नेऊन करण्यात आला होता. त्यातच नागासाकी येथील हल्ला नियोजित ठिकाणाहून तीन किलोमीटर दूरवर होऊन त्याची परिणामकारकता कमी झाली. यापासून बोध घेत मोठ्या प्रमाणावर अण्वस्त्रे वाहून नेणारी क्षेपणास्त्रे विकसित करण्याची स्पर्धा अमेरिका आणि सोविएतमध्ये सुरू झाली. सुरुवातीला वाहून नेण्याचे अंतर हे तांत्रिक कुशलतेचे प्रतीक होते. त्यातूनच मग आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा विकास झाला. पुढे जाऊन मारकक्षमतेपेक्षा अचूकता हे क्षेपणास्त्र विकासाचे परिमाण बनले. त्यातूनच क्षेपणास्त्रांची बॅलिस्टिक म्हणजे एकदा मारा केल्यानंतर बंदुकीच्या गोळीसारखे सुटणारे आणि क्रूझ म्हणजेच डागल्यानंतरही प्रत्येक टप्प्यावर नियंत्रण होणारे असे दोन प्रकार विकसित झाले. अभ्यासकांनुसार क्रूझ क्षेपणास्त्राच्या जमान्यात संगणकीकृत क्षेपणास्त्र व्यवस्था विकसित होऊन जुने तंत्रज्ञान मागे पडले आणि सोव्हिएतचा लष्करी प्रभाव ओसरायला सुरुवात झाली. १९८० नंतर अमेरिकेने तंत्रज्ञान आणि शस्त्र विकासावर भर देत सोव्हिएतला लष्करी बाबींवर खर्च करण्यासाठी भाग पाडले जेणेकरून आधीच खिळखिळी झालेली सोविएत अर्थव्यवस्था आणखी डबघाईला येऊन त्याची परिणती सोव्हिएतच्या विघटनात झाली.
आदेश आणि नियंत्रण
अण्वस्त्रांची आणखी एक चित्तवेधक बाजू म्हणजे आदेश आणि नियंत्रण (कमांड अॅण्ड कंट्रोल)! १९६२ मध्ये सोव्हिएत यंत्रणेतील बिघाडामुळे ‘अमेरिकेने अण्वस्त्रे डागली’ असा संदेश क्युबामध्ये असणाऱ्या एका सोव्हिएत पाणबुडीला गेला. मात्र दैव बलवत्तर म्हणून खात्री झाल्याशिवाय तो संदेश नाविक अधिकारी वासिली आर्खीपोव याने वरिष्ठांना दिला नाही. तिसऱ्या महायुद्धाचा हा धोका टळल्यानंतर अण्वस्त्रांचे नियंत्रण कुणाकडे असेल याचे महत्त्व. अधोरेखित झाले. लष्करी आणि नागरी नेतृत्वामध्ये हा अंतिम अधिकार बऱ्याच देशांमध्ये कळीचा मुद्दा आहे. विशेषत: पाकिस्तानने अण्वस्त्रसज्जता प्राप्त केल्यानंतर दहशतवाद्यांच्या हातात ती जाण्याचा धोका कायम जगाला भेडसावत आहे. २०२२ मध्ये भारताकडून चुकीने एक ब्राह्मोस क्षेपणास्त्र पाकिस्तानमध्ये डागले गेले. सुदैवाने त्यावर स्फोटके नव्हती. त्यातच सायबर हल्ल्याचा धोका, विविध संगणकीय व्हायरसचा विकास, कृत्रिम तंत्रज्ञान यामुळे या आदेश आणि नियंत्रण प्रणालीवर प्रभाव टाकणारे कारक वाढले आहेत. ज्यामुळे आण्विक तज्ज्ञांना वाढत्या चिंतेने ग्रासून टाकले आहे.
अण्वस्त्रे म्हणजे अस्तित्व
जगातील शस्त्रात्रांवर नजर ठेवणाऱ्या सिप्री ( रकढफक) या संस्थेच्या अहवालानुसार जगामध्ये जानेवारी २०२४ मध्ये १२,१२१ अण्वस्त्रे होती आणि ती संख्या वाढत आहे. विशेषत: चीनने आपल्या साठ्यामध्ये लक्षणीय वाढ करण्यास सुरुवात केली आहे. १९४५ नंतर एकदाही न वापरण्यात आलेल्या या अण्वस्त्रांचे राष्ट्रांना प्रचंड आकर्षण असण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आण्विक जरब! गेली ८० वर्षे मोठा संघर्ष न होण्यामागचे हे महत्त्वाचे कारण! मात्र सध्याच्या युक्रेन आणि इस्राईल युद्धानंतर या जरबेचा पुनर्विचार होण्यास मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली आहे. अण्वस्त्रसज्जता आणि इतर अत्याधुनिक शस्त्रप्रणालींनी विकसित असूनसुद्धा इस्राइलवर हल्ला करण्यास हमास कचरले नाहीत. तर दुसरीकडे युक्रेन कधीकाळी अण्वस्त्रसज्ज असताना त्यांनी त्याचा त्याग करण्याचे ठरवले. आज युक्रेनकडे अण्वस्त्रे असती तर पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला करायचे धाडस दाखवले असते का? तसेच सद्दाम हुसेन यांचा इराक, २००१ चा तालिबानशासित अफगाणिस्तान यांच्याकडे अण्वस्त्रे असती तर अमेरिकेचे त्यांच्यावर हल्ला करायचे धाडस झाले असते का? या दोन गोष्टींची उत्तरे शोधताना उत्तर कोरियाच्या राजवटीची शाश्वतता केवळ अण्वस्त्रांच्या धाकावर अवलंबून आहे हे वास्तवही नजरेस येते. त्याच वेळी चीन आणि तैवान यांच्या संघर्षात अण्वस्त्रांनी तैवानच्या अधीन होणे पसंत केले तर भविष्यातील घडामोडींचा अंदाज बांधणे फारच अवघड होऊन बसेल. बांगलादेश, सीरिया अशा राष्ट्रांमध्ये झालेली क्रांती लक्षात घेता अनेक राष्ट्रांची आणि विशेषत: हुकूमशहांची आण्विक भूक बळावली आहे. एकूणच आण्विक जरब या उद्देशासाठी अण्वस्त्रे प्राप्त करण्याचा खटाटोप आता राजवट शाश्वतता म्हणजेच अस्तित्वासाठी निकडीचा झाला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अण्वस्त्रस्पर्धा हा जागतिक आणखी वेगळाच विषय! जागतिक आण्विक व्यवस्थेला आव्हान देऊन मिळवलेली अण्वस्त्रसज्जता जगासमोर ‘स्थिर-अस्थिरता विरोधाभास’ हा नवीन सिद्धांत घेऊन आली. यामुळे उपखंडात मोठे संघर्ष टाळले गेले मात्र दहशतवादी हल्ले आणि छोट्या चकमकी मात्र नियमित होऊन बसले. यावर अधिक चर्चा पुन्हा कधीतरी करता येईल.
एकूणच अण्वस्त्रांचा चिखल तुडवत राज्यशकट हाकणे ही सर्वच राष्ट्रांची अनिवार्यता आहे. नीना टॅनिनवाल्ड यांनी एकेकाळी प्रतिपादन केले होते की अण्वस्त्र हल्ले रोखण्यात सर्वात मोठा वाटा आहे अण्वस्त्रहल्ल्याविषयी निर्माण झालेल्या घृणतेचा! मात्र स्वयंचलित शस्त्रांच्या उदयानंतर जागतिक नैतिकतेने नवा नीचांक गाठला आहे. सध्याच्या काळात प्रचंड प्रमाणावर होणारे भू-राजकीय बदल अण्वस्त्रांची आकर्षकता वाढवत आहेत. आणि एकदा का स्वप्रतिमेत गुंग झालो की मग वास्तवाचे आणि नैतिकतेचे भान सोडून विनाशाची माती खाणे क्रमप्राप्त होते.
– पंकज फणसे
तंत्रज्ञान आणि राजकारण यांच्या अंत:संबंधाचे विद्यापीठीय संशोधक
phanasepankaj@gmail.com