‘विलासी’ हा शब्द लहानपणी वाचलेल्या गोष्टीतल्या ‘विलासी राजा’ वा ‘विलासी जमीनदारा’पासून आपण मराठीजन नकारात्मक अर्थानेच वाचत आलो. पंचतारांकित हॉटेलला आपण ‘विलासी हॉटेल’ म्हणत नाही. पण पाश्चात्त्य पंचतारांकिताच्या पुढली, चांगल्या अर्थाने विलसित झालेली- विलासयुक्त भारतीय जीवनशैली काय असू शकते हे पीआरएस ओबेरॉय यांनी ‘राजविलास’, ‘उदयविलास’, ‘अमरविलास’ या जुन्या महालांतील हॉटेलांनी जगाला दाखवून दिले. पीआरएस ओबेरॉय यांच्या नेतृत्वाखालील ओबेरॉय हॉटेल-समूह शेरेटन, इंटरकाँटिनेन्टल आदी परदेशी समूहांच्या भागीदारीपासून मुक्त झाला आणि स्वत:चा ‘ट्रायडेंट’ हा भागीदार स्थापून ओबेरॉय समूह आठ देशांमध्ये वाढला.  हे पीआरएस – म्हणजे पृथ्वीराजसिंह ऊर्फ ‘बिकी’ ओबेरॉय १४ नोव्हेंबर रोजी निवर्तले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> व्यक्तिवेध : वासुदेव आचार्य

हॉटेल समूहाची मालकी त्यांना वारसाहक्काने मिळाली हे खरे. वडिलांनी सिमल्याचे ‘क्लार्क हॉटेल’ विकत घेण्यासाठी पत्नीचे दागिने पणाला लावले होते, तसे काही पीआरएस यांना करावे लागले नाही. उलट, वडिलांच्याच सांगण्यावरून ३२व्या वर्षांपर्यंत ते विलासी जीवन जगले. भारतातील शालेय शिक्षणानंतर ब्रिटन व स्वित्झर्लंडमध्ये शिक्षणानिमित्ताने राहिलेल्या ‘बिकी’ यांनी ऐन जवानीत युरोप व अमेरिकेतील बहुतेक महत्त्वाच्या हॉटेलांत निवास केला.. तेथील वातावरण, सुविधा यांचा नकळत अभ्यास केला. ‘कलकत्ता वगैरे विसरा.. आता सिंगापूर, हाँगकाँग, टोक्यो ही शहरे किती तरी पुढे चालली आहेत’ असे १९५०च्या दशकात वडिलांना ‘बिकी’ सांगू शकले, ते याच प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षणामुळे! वडीलही ‘सर्वात मोठे हॉटेल नव्हे, सर्वोत्कृष्ट हॉटेल चालवायचे आहे’ या ध्येयानेच या व्यवसायात उतरलेले होते, त्यामुळे तेही ऐकून घेत. पण अंथरूण पाहूनच पाय पसरत. सर्वोत्कृष्टतेचा ध्यास टिकवूनही व्याप वाढवता येईल, हे पीआरएस यांचे म्हणणे हाच तर ओबेरॉयांकडली ‘पिढय़ांतली दरी’ (जनरेशन गॅप). पण दरी असली तरी दुरावा नसतो, हेही या पितापुत्रांनी दाखवून दिले. याचा थेट दृश्य पुरावा म्हणजे मुंबईत नरिमन पॉइंटच्या ‘ओबेरॉय’च्याच आवारात पीआरएस यांनी उभारलेले ‘ट्रायडेन्ट’! १९९०च्या दशकापासून पीआरएस यांच्याकडे व्यवसायाची सूत्रे आली असली तरी, २००२ मध्ये सर्वोच्चपद आले.  २० वर्षांत त्यांनी पसारा वाढवला आणि कीर्तीसुद्धा. या वाढीची कारणे कितीतरी.. एकतर, हॉटेलची जागा निवडण्यापासून ते वास्तुरचनेपर्यंतचा टप्पा हा चोख हवा, असा पीआरएस यांचा आग्रह. दुसरे म्हणजे हॉटेलांतील फर्निचर, गाद्या-गालीचे, हे सारे लोकांना वापरायला सोपे जाईल असे हवे, हा कटाक्ष आणि तिसरे म्हणजे व्यावसायिक किफायत पाहाॉताना दर्जाशी अजिबात तडजोड नाही, हा दंडक. त्यामुळेच खाद्यतेल कंत्राट कुणाला द्यावे, यासाठी तीन-चार देशांचे दौरे चालत, तेही एखाद्या तज्ज्ञाला सोबत घेऊन. ‘पद्मविभूषण’ किताब त्यांना २००८ मध्ये मिळाला, तर त्याआधी हॉटेल व्यवसायिकांच्या देशी/विदेशी संस्थांकडून अनेक सन्मान मिळाले. पुत्र, पुतण्यासारख्या वारसांखेरीज, पीआरएस यांना गुरुस्थानी मानणारे हॉटेलियरही अनेक आहेत.  मात्र त्यांनी पंचतारांकित लग्झरीचे केलेले ‘विलासी’करण हे त्यांचे खरे स्मारक!

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oberoi group chairman prs oberoi profile zws
Show comments