श्रीगणेश चतुर्थी म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थी, दसरा म्हणजे आश्विन (ते आश्विन आहे, अश्विन नाही!) शुद्ध दशमी आणि बलिप्रतिपदा म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा. छान. आणि पुढच्या आठवड्यात येणारी मकर संक्रांत म्हणजे? ती कोणत्या तिथीला असते?
शालिवाहन शकाच्या पौष महिन्यात संक्रांत येते एवढंच ठामपणे म्हणता येतं. बाकी तिथी तर सोडा, ती कृष्ण पक्षात येईल की शुक्ल पक्षात हेदेखील सांगता येत नाही. कधी ती शुद्ध प्रतिपदेला येते तर कधी कृष्ण चतुर्दशीला! हे असं का?
कारण शालिवाहन शकाचे महिने चंद्राच्या भ्रमणावर ठरतात आणि मकर संक्रांत मात्र सूर्याच्या. आता या दोघांचा मेळ कसा बसावा? म्हणून हा सगळा गोंधळ. ज्या दिवशी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो तो दिवस मकर संक्रमणाचा, मकर संक्रांतीचा. हे मकर राशीत प्रवेश म्हणजे नेमकं काय ते समजून घेतलं पाहिजे. पण त्यासाठी आधी या राशी म्हणजे नेमकं काय ते समजून घेतलं पाहिजे.
सूर्याभोवती पृथ्वी फिरते हे सर्वज्ञात आहे, पण पृथ्वीवरून पाहताना पृथ्वीभोवती सूर्य फिरतो असं भासतं. याला सूर्याचं भासमान भ्रमण असं म्हणू. याचे दोन भाग. एक रोज दिसणारं. पहाट झाली. सूर्य उगवला. दिवसभर आकाशात मार्गक्रमण करून संध्याकाळी मावळला. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच चक्र. पण या भासमान भ्रमणाचा आणखी एक भाग आहे.
सूर्य उगवताना ज्या तारकासमूहांच्या पार्श्वभूमीवर तो दिसतो ती जागादेखील रोज बदलते. एक-दोन दिवसांमध्ये सूर्याच्या स्थानातला बदल फार लक्षणीय नसतो. पण महिन्याभरात ही जागा अगदी निश्चितपणे बदललेली दिसते. आणि वर्षभरानंतर सूर्य पुन्हा नेमक्या त्याच तारकासमूहाच्या पार्श्वभूमीवर नेमक्या त्याच जागी दिसू लागतो. थोडक्यात, वर्षभरात सूर्य या विविध तारकासमूहांमधून भ्रमण करतो आहे असं भासतं. वर्षभरात सूर्याच्या या भासमान भ्रमणाचा जो मार्ग त्याला ‘क्रांतिवृत्त’ असं म्हणतात.
आता पुढचा प्रश्न असा आला की, या क्रांतिवृत्तावर सूर्याचं नेमकं स्थान कसं सांगायचं? मग त्यासाठी या क्रांतिवृत्ताचे बारा भाग पाडले आहेत. या बारा भागांना नावं देणं आलं. त्या प्रत्येक भागात दिसणाऱ्या तारकासमूहातले तारे काल्पनिक रेषांनी जोडले (हे म्हणजे लहानपणी ‘बिंदू जोडून आकृती तयार करा’ असा खेळ असायचा तसंच झालं!) तर तयार होणाऱ्या आकृतीचं पृथ्वीवरच्या विविध गोष्टींशी साधर्म्य आहे असं लक्षात आलं आणि नावांचा प्रश्न सुटला. मग ज्या तारकासमूहातली आकृती मेंढ्यासारखी दिसत होती त्याला नाव दिलं मेष, वगैरे वगैरे.
अनेकांना असं वाटतं की, राशींनी या अथांग अंतराळाचे बारा भाग केले आहेत. तसं मुळीच नाही. राशी या केवळ सूर्याच्या भासमान भ्रमणमार्गाचे भाग आहेत. आणि सूर्याचा भासमान भ्रमणमार्ग हा या अथांग अंतराळावर मारलेला एक छोटासा काल्पनिक पट्टा आहे. सोबत आकृती दिली आहे. ती पाहिलीत म्हणजे हा मुद्दा स्पष्ट होईल.
सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणजे नेमकं काय होतं ते आता लक्षात आलं असेल. ज्या तारकासमूहातल्या ताऱ्यांचे ठिपके काल्पनिक रेषांनी जोडल्यावर मगरीसारखी आकृती दिसते त्या तारकासमूहात आता सूर्यनारायण दिसू लागला! आपण पतंग उडवून आणि तिळगूळ खाऊन साजरी करतो ती ही खगोलीय घटना!