वैद्याकीय पेशा आणि सार्वजनिक आरोग्य या क्षेत्रांमधला आदर्शवाद असतो कसा, हे स्वत:च्या कारकीर्दीतून फौची सांगतात…

तारीख होती २३ जानेवारी (२०२०) … म्हणजे तोवर ‘त्या नव्या रोगा’नं चीनमध्ये २५ बळी घेतले होते आणि ८०० चिनी लोक या रोगानं बाधित होते; पण तेव्हाच ‘चीनमध्ये १००० खाटांचं रुग्णालय खास या नव्या रोगासाठी उभारलं जात आहे’ असं एक छायाचित्र पाहिलं, आणि माझ्या डोक्यात धोक्याची घंटा घणघणली!’- हाच अनुभव कुणालाही त्या वेळी आला असता, पण पुस्तकात तो सांगणारे डॉ. अँथनी फौची हे १९८४ ते २०२२ असा दीर्घ काळ अमेरिकेच्या ‘राष्ट्रीय अधिहर्षता (अॅलर्जी) व साथरोग संस्थे’चे प्रमुख होते आणि २३ जानेवारीनंतर सहाव्याच दिवशी, २९ जानेवारीस त्यांच्यावर अमेरिकेला ‘कोविड-१९’पासून वाचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गेली… ‘मी १९८० मधला ‘एचआयव्ही’ (एड्स) पाहिला, २००२ आणि २००३ मध्ये ‘सार्स’ या विचित्र श्वसनरोगाचे प्रकार हाताळले, २०१४ चा जीवघेणा ‘इबोला’ आणि गर्भांवरही परिणाम करणारा २०१५चा ‘झिका’देखील पाहिला, पण २०१९ च्या डिसेंबरापासून चीनच्या वुहान शहरात सुरू झालेला हा नवा रोग तेव्हा तरी माझ्या आकलनापल्याडचा होता’ अशी कबुलीही ते ‘ऑन कॉल’ या पुस्तकात देतात. पुढे या रोगाचं आकलन कसं होत गेलं- आणि ‘संपर्क टाळणे’ हाच उपाय असूनसुद्धा डोनाल्ड ट्रम्पसारख्या राष्ट्राध्यक्षानं आमचं म्हणणं कसं झुगारलं, वेळोवेळी आमची जाहीर निंदानालस्तीच कशी केली आणि ‘काही नाही, हा फ्लूचाच एक प्रकार आहे’ असं ट्रम्प म्हणत राहिले, हाही भाग या पुस्तकात येतो!

loksatta editorial on lancet report claims half of indian adults are physically unfit
अग्रलेख : …आरोग्य तेथे वास करी!
lessons from spain picasso rashid khan and culture
अन्यथा : पिकासो, रशीद खान आणि संस्कृती ! स्पेनचे धडे : १
loksatta editorial Financial audit report presented in session of Maharashtra Legislative Assembly
अग्रलेख: ‘महा’पणास आव्हान!
loksatta editorial about indira gandhi declared emergency in 1975
अग्रलेख : असणे, नसणे आणि भासणे!
patna high court
अग्रलेख : ‘आबादी…’ आबाद?
loksatta editorial on ekanth shinde and ajit camps disappointment over the allocation of cabinet berths
अग्रलेख : उपयोगशून्यांची उपेक्षा!
Loksatta editorial BJP Lok Sabha election results Prime Minister Narendra Modi
अग्रलेख: रघूराज थक्कीत होऊनि पाहे…
loksatta editorial on intention of centre to levy gst on petrol diesel
अग्रलेख : अवघा अपंगत्वी आनंद!  

फक्त ट्रम्प नव्हे, १९८४ पासून रोनाल्ड रेगन, थोरले बुश, क्लिंटन, धाकले बुश, ओबामा हे सारेच राष्ट्राध्यक्ष फौची यांनी पाहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या पुस्तकात काय असणार, याबद्दल अमेरिकनांनाच काय पण अमेरिकेबद्दल कुतूहल असणाऱ्या कुणालाही उत्कंठा असणार हे उघड आहे. हे पुस्तक १८ जून रोजी आलं, त्याचं स्वागत सर्वच महत्त्वाच्या अमेरिकी वृत्तपत्रांनी, एमएसएनबीसी आणि हफिंग्टन पोस्टसारख्या संकेतस्थळांनी केलं, अधिक गंभीर नियतकालिकांनी या पुस्तकाचे भागच छापले आणि ३६ डॉलर किमतीचं हे ४०० हून अधिक पानी पुस्तक आपल्याकडेही दोन हजार रुपयांच्या पुढल्या किमतीला उपलब्ध होऊ लागलं. या आत्मचरित्रातून – दिसणारे फौची हे सभ्य, सत्शील डॉक्टर आणि जोखीम पत्करणारे प्रशासकही आहेत.

हेही वाचा >>> अन्वयार्थ: दोनचाकी ‘टॅक्सी’ला हवा नियमांचा ब्रेक…

त्यांनी एक जोखीम पत्करली नसती, तर जगाचं नुकसान झालं असतं! ती हकीकत तर या पुस्तकात आहेच. कोविडच्याही आधी, ‘एड्स’ झपाट्यानं पसरू लागला होता तेव्हाची ही जोखीम. हा रोग नुसता जीवघेणा नाही तर पोखरून काढत, हाल करून मारणारा आहे याची पुरेपूर जाणीव झाल्यामुळे फौची एचआयव्हीवर औषध/ उपचारयोजना शोधण्यासाठी अनेक कंपन्यांना प्रोत्साहन देत होते. ‘अॅझिडोथामिडाइन’ अर्थात ‘एझेडटी’ घेतल्यानं प्रतिकारशक्तीवरचा हल्ला कमी होऊ शकतो, त्यामुळे रोगानं पोखरलं जाण्याची शक्यता नाहीशी होऊ शकते, अशी आशा दिसू लागल्यावर फौचींनी काही रुग्णांवर प्रयोग सुरू केले. पण प्रमाण किती हे ठरलं नसल्यामुळे रुग्ण जिवानिशी जातच राहिले, तेव्हा त्यांच्यावर टीकेची झोड उठली. यापैकी खंद्या टीकाकारांनाच फौचींनी चर्चेला बोलावलं- ‘एड्स रुग्णांचा जीव औषधानंच गेला असं नाही. औषधाविनाही जीव जाताहेत’ हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. या टीकाकारांमध्ये समलिंगींच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संघटना अर्थातच पुढे होत्या, त्यांनाच फौचींनी आवाहन केलं- स्वयंसेवक द्या, त्यांच्यावर आम्ही प्रयोग करू! यावर पहिला आक्षेप आला तो आतूनच- ‘एक डॉक्टर म्हणून आपण रुग्णांवर वाटेल तसे प्रयोग कसे काय करू शकतो?’ – फौची याबद्दल पुस्तकात लिहितात, डॉक्टरी पेशाशी प्रामाणिक राहूनच हा आक्षेप घेतला गेला, हे मला माहीत आहे- पण त्याहीपेक्षा, संकट समोर दिसत असताना मार्ग शोधावाच लागेल, त्याची गरज अधिक आहे. त्यामुळे मी नम्रपणे संबंधित डॉक्टरला सांगितलं की, तुला पटत नसेल तर तू दुसरी नोकरी पाहायला सुरुवात कर.

फौचींचे एड्सबाबतचे प्रयोग ‘वाटेल तसे’ नव्हते, हे कालांतरानं सिद्ध झालं. उपचारयोजनेची दिशा योग्य ठरली आणि आजही भारतासह अनेक देशांत या प्रकारचे उपचार वापरले जातात. फौचींनी ‘शोध’ कशाचाही लावला नसला तरी, प्रशासक म्हणून योग्य नियोजनाचं काम केलं होतं. मात्र आजही ‘एझेडटी’ औषधानंच अधिक एचआयव्हीग्रस्त मेले’ असा तद्दन खोटा प्रचार अधूनमधून होत असतो.

अशाच प्रकारच्या अफवांचा, त्याहून मोठा फटका फौचींना झेलावा लागला तो कोविडकाळात. इथे तर ट्रम्पसमर्थकांच्या अख्ख्या फळीशी फौचींची गाठ होती. या रोगाबद्दल तुम्ही उगाच घबराट पसरवताय, उपचारांच्या नावाखाली माणसं मारताय अशा बाष्कळ टीकेचा भडिमार त्या समर्थकांकडून होत होता आणि फौची यांच्या पत्नीला, दोन मुलींनासुद्धा अत्यंत गलिच्छ भाषेत समाजमाध्यमी संदेशांची शिकार व्हावं लागलं होतं. फौचींची पत्नी क्रिस्टीन या वैद्याक-नीतीज्ञ म्हणून रुग्णालयात कार्यरत असल्यानं त्यांना ताणतणाव म्हणजे काय याची पूर्ण कल्पना होती, त्यांनी ‘वेळच्यावेळी झोप घे, जेवतखात जा आणि पाण्याची बाटली बरोबर ठेव’ असा सल्ला नवऱ्याला दिला.

हे आत्मचरित्र असलं, तरी कौटुंबिक तपशील फार थोडे आहेत. पहिल्या २० पानांमध्ये बालपण संपतं, दुसऱ्याच प्रकरणापासून कारकीर्दीचा भाग सुरू होतो. न्यू यॉर्कच्या रुग्णालयात कनिष्ठ डॉक्टर म्हणून कामाचा भार पेलताना आलेल्या अनुभवांपासून अनेक किस्से अगदी संयतपणे येतात. त्यातून नीतिमत्तेची चाड असलेलं, नियम पाळणारं आणि आवश्यक तिथेच लोकहितासाठी नियम ओलांडणारं व्यक्तिमत्त्व उलगडतं. हे आत्म-चित्रण जरा जास्तच आदर्शवादी असल्याची टीका आता या पुस्तकावर सुरू झालेली आहे, पण तरीही वैद्याकीय पेशा आणि सार्वजनिक आरोग्य या क्षेत्रांमधला आदर्शवाद असतो कसा, तो आयुष्यभर पाळायचा कसा, याचा वस्तुपाठ म्हणून हे पुस्तक वाचण्यासारखं आहे.

हे ही वाचा…

फ्रान्झ काफ्काच्या स्मृतिशताब्दीचा जून महिना संपायला काही दिवस राहिलेले असताना, नुकत्याच त्याच्या एका अवघ्या एकपानी पत्राचा लिलाव सध्या (२६ जून ते ११ जुलै) इंटरनेटवर सुरू झाला आहे. हे पत्र साधेसुधे नसून आपल्या आजाराची माहिती झाल्यानंतर लेखनात आलेल्या कुंठा अवस्थेचे वर्णन करणारे आहे. मित्राला लिहिलेल्या या एकपानी पत्राची किंमत एक लाख चौदा हजार डॉलर इतकी आहे. याविषयीचे वृत्त वाचण्यासाठीचा दुवा-

https://shorturl.at/6cpnL

प्राध्यापक स्टीव्हन मिदन हे पुरातत्त्वशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी मानवाच्या मेंदूचा इतिहास, शेतीचा इतिहास, संगीताच्या इतिहासाबद्दल ग्रंथ लिहिलेत. त्यांचे ताजे पुस्तक ‘द लँग्वेज पझल’ सध्या गाजत आहे. शब्दांच्या जन्मापासून मानवी भाषा विकसित कशी झाली याचे त्यात विवेचन आहे. या ग्रंथातील एक प्रकरण लहान मुले भाषा आत्मसात करतात त्यावर आहे. त्याचा अंश.

https://shorturl.at/uQwHv

अवनी जोशी यांची ‘बर्न्ट शुगर’ ही कादंबरी अलीकडेच बुकरच्या लघुयादीमध्ये झळकली होती. अवनी जोशी या दुबईमध्ये राहत असल्या तरी ही कादंबरी संपूर्णपणे भारतात, पुण्यात घडते. कादंबरीला पुरस्कार मिळाला नसला, तरी त्यातील कथानकाची चर्चा बराच काळ झाली. नुकताच या पुस्तकातल्या ‘स्मृती’बद्दलचा एक निबंध अमेरिकेतील प्रतिष्ठित साहित्यिक मासिकाच्या ब्लॉगवर आला असून, हा निबंध वाचण्यासाठीचा दुवा- https://shorturl.at/XpD6Z