सत्यजित तांबे
इतर अनेक देश आपली दिवाळी साजरी करू लागले आहेत, म्हणजे भारतीय संस्कृतीची पताका खरोखरच जगभर फडकू लागली असे म्हणायचे का, हा प्रश्न या पुस्तकामुळे पुन्हा पडतो..
दिवाळी हा खास भारतीय सण. इथल्या मातीत रुजलेला. पण १०० हून अधिक देशांनी यंदा दिवाळी साजरी केली. दुबई, इंडोनेशिया, मलेशिया, बांगलादेश, श्रीलंका, अमेरिका आणि इंग्लंड या देशांचाही यात समावेश आहे. न्यू यॉर्कच्या महापौरांनी नुकतीच घोषणा केली आहे की पुढील वर्षांपासून दिवाळीला तिथल्या शाळांना सुट्टी दिली जाणार आहे. भारताचा हा असा सांस्कृतिक वारसा इतरांना कळावा यासाठी पडद्यामागे राहूनदेखील संघटनात्मक साहाय्य केले जात आहे. यासाठीचे उदाहरण द्यायचे झाले तर देशाचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेल्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे (इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स- आयसीसीआर) देता येईल. अशा संस्थांद्वारे होणारे संस्कृतीचे आदानप्रदान दोन देशांतील संबंध बळकट करण्यास मदत करणारे ठरते.
‘कनेक्टिंग थ्रू कल्चर : अॅन ओव्हरवू ऑफ इंडियाज सॉफ्ट पॉवर स्ट्रेंग्थ’ हे पुस्तक आयसीसीआरचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे आणि सच्चिदानंद जोशी (कार्यकारी प्रमुख, इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्स) यांनी संपादित केले आहे. कुंभमेळा, दसरा, नवरात्र, दुर्गा पूजा, दिवाळी, छठ पूजा, बैसाखी, नवरोझ, ईद, ख्रिसमस किंवा भारताच्या विविध भागांत साजरे होणारे उत्सव हे विविध पंथ, धर्माची मंडळी भारतात एकरूप झाल्याचे दाखवतात, हे या पुस्तकाद्वारे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘द इंटर्नल फेस्टिव्हल कॉल्ड भारत’ या लेखक श्याम बॅनर्जी यांनी लिहिलेल्या भागात म्हटले आहे की, कॅलिडोस्कोपसारखी (विविध रंगांच्या, आकारांच्या तुकडय़ांपासून बनणारी बदलती नक्षी दाखवणाऱ्या ‘शोभादर्शका’ सारखी) भारतीय एकता ही उत्सवांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे कोणीही दाखवू शकत नाही. हे सण-उत्सव सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि राजकीय सीमा पुसून टाकण्याचे प्रभावी माध्यम ठरतात. याच पुस्तकात म्हटले आहे की, संस्कृतीच्या माध्यमातून जगाशी जोडले जाणे ही प्राथमिकता आहे. यासाठी आपला गौरवशाली वारसा पारंपरिक ज्ञान याचे जतन करणे अत्यावश्यक आहेत. शिवाय हा वारसा आणि पारंपरिक ज्ञान पुढच्या पिढय़ांना कळावे यासाठी प्रयत्न होणे हेदेखील आवश्यक आहे.
मनुष्यबळाचा प्रभाव
भारतामध्ये निर्माण झालेले बुद्धिकौशल्य इतर राष्ट्रांमध्ये जाते तेव्हा ते आपल्यासोबत आपली संस्कृतीही सोबत घेऊन जात असते. या सणांची परदेशात दखल घेतली जाते हे अधोरेखित झाले ते २००९ साली प्रथमच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओमाबा यांच्या ओव्हल ऑफिसमध्ये दिवाळीनिमित्त दीप प्रज्ज्वलित करण्यात आला तेव्हा. इथून परदेशातील दीपोत्सवाने वेगळी वाट धरली. यामागची कारणे अर्थातच वेगळी आहेत. त्यापैकी एक कारण म्हणजे परदेशात जाऊन तेथील समाजात काम करून भारतीयांनी दिलेले योगदान. अमेरिकेत जवळपास ४० लाख भारतीय वंशाचे नागरिक राहतात. त्यांच्यामध्ये डॉक्टर आहेत, उद्योजक आहेत, अभियंते आहते. या सगळ्यांनी तिथल्या अर्थव्यवस्थेला हातभार लावला आहे आणि ती बळकट व्हावी यासाठी पुष्कळ प्रयत्न केले आहेत. फक्त अमेरिकाच नाही तर विविध देशांत पसरलेल्या भारतीय वंशाच्या नागरिकांच्या बाबतीत हे सांगता येते.
जगभरात आणि खासकरून आशियाई देशांमध्ये लोकसंख्येचा विस्फोट होतो आहे. भारताचीच लोकसंख्या ही २०२२ पर्यंत जवळपास १४० कोटींच्या घरात पोहोचली आहे. ही फार अभिमानाची बाब मानता येणार नाही मात्र ही लोकसंख्या हे आपल्यासाठी मनुष्यबळ आहे आणि परदेशी कंपन्यांसाठी मोठी बाजारपेठ. फेसबुकचे संस्थापक मार्क झकबरबर्ग भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला आले होते, कारण त्यांना हे माहीत आहे की मेटाच्या फेसबुकचे एकटय़ा भारतामध्ये ३५ कोटींपेक्षा अधिक वापरकर्ते आहेत. संपूर्ण जगात इतके वापरकर्ते इतर कोणत्याही देशात नाहीयेत. अगदी अमेरिकेतही जेमतेम १६ कोटी लोक फेसबुक वापरतात. सर्वाधिक फेसबुक वापरकर्त्यां देशांच्या यादीतील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या देशांतील एकूण वापरकर्त्यांची बेरीज केली तरी ती भारताच्या फेसबुक वापरकर्त्यांपेक्षा अधिक होत नाही. परदेशी कंपन्यांना आणि गुंतवणूकदारांना भारताच्या लोकसंख्येची आणि त्यांच्या क्रयशक्तीची ताकद माहिती आहे. भारतात साजरे होणारे सण-उत्सव हे भारतीयांच्या पैसा खर्च करण्याच्या क्षमतेला म्हणजेच क्रियाशक्तीला चालना देणारे ठरतात. ही बाजारपेठ व्यापारी जगाला आकर्षित करते आहे आणि सणांच्या माध्यमातून त्या ती काबीज करायचा प्रयत्न करताना दिसतात. संपूर्ण जगाने भारतावर लक्ष केंद्रित करावे, भारताचे सामर्थ्य ओळखावे आणि त्याचा योग्य सन्मान करावा यासाठीही हीच ती योग्य वेळ आहे.
‘कनेक्टिंग थ्रू कल्चर : अॅन ओव्हरवू ऑफ इंडियाज सॉफ्ट पॉवर स्ट्रेंग्थ’
संपादक : विनय सहस्रबुद्धे, सच्चिदानंद जोशी
प्रकाशक : विज्डम ट्री
पृष्ठे : २८०, किंमत : ९५० रु.