अहंकार टाळा, असा उघड सल्ला देणाऱ्या भागवतांकडे वाक्चातुर्य असल्याची उदाहरणे अनेक असूनसुद्धा हे असे कसे झाले…

मोहन भागवत यांना कधी काय बोलावे याची विलक्षण समज आहे. ते जाहीररीत्या बोलतात कमी, पण बोलण्यासाठी दिवस- प्रसंग निवडण्याचे चातुर्य त्यांच्याकडे भरपूर. त्यांच्या भाषणातले शब्दही अगदी चपखल असतात (अर्थात ते हिंदी शब्द मी इंग्रजी भाषांतरातूनच वाचू शकतो). माझ्यासह अनेक जण भागवतांच्या विचारांशी अजिबात सहमत नसले तरीही त्यांची भाषणे विशेषत: २०१४ नंतर लक्षणीय आणि महत्त्वाचीही ठरताहेत, हे कुणालाही नाकारता येणार नाही.

भागवत यांचा शब्द हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकृत वक्तव्य मानले जाते. केवळ ते सरसंघचालक आहेत म्हणून नव्हे, तर रा. स्व. संघाची संघटनात्मक रचनाही याला कारणीभूत आहे. ही संघटना एकचालकानुवर्ती, म्हणजे प्रमुखपदाला अनन्य महत्त्व. त्यामुळे भागवतांची भाषणे गांभीर्याने ऐकली जातच होती, पण अलीकडच्या काळात हे गांभीर्य वाढले आहे.

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर ‘अहंकार न बाळगता, मर्यादा पाळून काम करा’ हा नागपूरच्या संघ कार्यकर्ता शिबिरात त्यांनी केलेल्या भाषणातील महत्त्वाचा संदेश होता. ते आणखी काय म्हणाले पाहा :

हेही वाचा >>> बुकरायण: ‘काळ्या’ पेन्सिलीची नैतिक जबाबदारी…

संयत कानपिचक्या

(१) या निवडणुकीच्या प्रचारात ज्या प्रकारे असत्य आणि शिवराळ भाषा वापरली गेली, त्याने राजकीय पक्षांच्या आजवरच्या सभ्यतेचे सारे संकेत मोडले. दोन्ही बाजूंनी ज्या प्रकारे आपला पट्टा घट्ट करून हल्ले केले आहेत, त्यामुळे फूट पडेल, सामाजिक आणि मानसिक दरी वाढेल.

(२) राजकीय स्पर्धक हे विरोधक नसतात. ते तुमच्यापेक्षा निराळा दृष्टिकोन मांडत असतात. विपक्षाला ‘विरोधी पक्ष’ न म्हणता ‘प्रतिपक्ष’ म्हणून, त्यांचा दृष्टिकोनही समजून घेणे हे लोकशाहीचे लक्षण.

(३) जो आपले कर्तव्य बजावताना मर्यादा पाळतो, ज्याला आपल्या कार्याचा अभिमान असूनही ‘मी’पणापासून अलिप्त राहतो, जो अहंकाररहित असतो – अशी व्यक्ती खरोखरच सेवक म्हणण्यास पात्र आहे.

‘मोदींना देण्यात आलेल्या कानपिचक्या’ याच अर्थाने भागवत यांच्या या तिन्ही मुद्द्यांची चर्चा झाली, हे वेगळे सांगणे न लगे.

भागवतांनी यानंतरचे भाषण लगेच जुलैमध्ये केले. ‘‘काही लोक आधी सुपरमॅन (महापुरुष), त्यानंतर पूजनीय आणि नंतर देव बनू पाहत आहेत’’, असे झारखंडमधील गुमला येथे भागवत म्हणाले. मोदी यांनी निवडणुकीपूर्वीच एका मुलाखतीत, आपला जन्म जैविक प्रक्रियेने झालेला नसल्याचे विधान केले होते(!) आणि त्यामुळे मोदी हे स्वत:ला ईश्वरी अंश वा अवतार समजत असल्याची चर्चा सुरू झाली होती; या पार्श्वभूमीवर भागवतांनी मोदींना मर्यादेची जाणीव या भाषणातून करून दिली, असेच मानले गेले.

हेही वाचा >>> भूगोलाचा इतिहास: पृथ्वीला जेव्हा ताप येतो…

प्रचाराचा प्रतिध्वनी…

तिसरे भाषण विजयादशमीचे म्हणजे रा. स्व. संघाच्या स्थापना दिन सोहळ्यातले. यंदा संघ १०० व्या वर्षात पदार्पण करत असल्याने परवाच्या १२ ऑक्टोबर रोजी झालेल्या या भाषणाचे महत्त्व अधिक. या भाषणात भागवत यांनी संघाच्या पूर्वापार विचारधारेचाच पुनरुच्चार करण्यावर भर दिल्याचे दिसले. या भाषणात धर्म, संस्कृती, व्यक्तिगत आणि राष्ट्रीय चारित्र्य, सुष्टशक्तींचा वा न्यायाचा/ धर्माचा विजय, स्वाभिमान अशा शब्दांची रेलचेल होती. हमास आणि इस्रायलमधील संहारक संघर्षाचा उल्लेख या भाषणात असला तरी ४३ हजार बळींच्या आकड्याकडे निर्देश नव्हता; जम्मू-काश्मीरमधील निवडणूक निकालाचा उल्लेख असला तरी तेथील नव्या सरकारला शुभेच्छा नव्हत्या; मणिपूरचा उल्लेख केवळ ‘संपूर्ण पूर्वांचल (भारताच्या ईशान्येकडील राज्यांचा समूह) अस्वस्थ आहे’ इतपतच होता.

या भाषणातील बाकीचा सारा भाग हा मात्र मोदींकडून अनेकदा ऐकलेल्या भाषणांसारखाच होता. देशाला अस्थिर करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळते आहे, उदारमतवादी म्हणवणारे (पाश्चात्त्य) देश अन्य देशांमध्ये लोकशाही मार्गाने आलेली सरकारे उलथून लावण्यासाठी कोणताही बेकायदा किंवा हिंसाचारी मार्ग वापरण्याच्या थराला जाऊ शकतात. भारताची प्रतिमा मलिन करण्यासाठी असत्यांचा आणि अपप्रचाराचा आधार काही जण घेत आहे… वगैरे अत्यंत गंभीर आरोप करणारी विधानेही होती. या आरोपांच्या पुष्ट्यर्थ काही पुरावे आहेत की नाही, याचे दुरान्वयानेही सूचन भागवतांच्या भाषणात नव्हते. बांगलादेेशाबद्दलही अशीच विधाने करताना तर भागवतांची रसवंती बहरास आल्याचे दिसले. ‘निरपराध हिंदू समाजावर विनाकारण होणारे अनन्वित अत्याचार’, ‘हिंदूंसह साऱ्याच अल्पसंख्य समाजांना कायमस्वरूपी धोका असल्याची टांगती तलवार’, ‘बांगलादेशींकडून भारतात होणारी बेकायदा घुसखोरी आणि त्यामुळे भारताच्या लोकसंख्येचा ढासळता तोल’ असे मुद्दे तर भागवतांनी मांडलेच; पण ‘जगभरच्या हिंदू समाजाने यातून शिकण्याचा धडा म्हणजे, असंघटित आणि अशक्तांना दुष्टशक्तींचे लक्ष्य बनावे लागते’- अशा आशयाचे, थेट मोदींच्या प्रचारभाषणांचा प्रतिध्वनीच वाटावे असेही विधान भागवतांच्या भाषणात आले.

दृष्टी आणि कोन

वरच्याच परिच्छेदातील अखेरचे विधान ‘हिंदू’च्या ऐवजी ‘मुस्लीम’ असा शब्द वापरून पुन्हा वाचून पाहिल्यास, वक्त्यांना प्रत्येक जातीय दंगलीचे वा संघर्षाचे समर्थनच करायचे होते की काय असा प्रश्न निश्चितपणे उपस्थित होता. भागवत ‘असंघटित आणि अशक्तां’बद्दल जे म्हणाले, ते दुसऱ्या महायुद्धापूर्वीच्या काळात नाझी जर्मनीमध्ये राहात असलेल्या ज्यूंबद्दल जितके खरे तितकेच भारतातले दलित आणि आजचे मुस्लीमही, अमेरिकेतले आफ्रिकावंशीय, गेल्या काही वर्षांतले पॅलेस्टिनी… अशा प्रत्येक अल्पसंख्य समाजाबद्दल, तसेच सर्वकाळ- सर्वदूरच्या स्त्रियांबद्दल लागू पडणारे आहे. यापैकी ‘दुष्टशक्ती’ कोण आणि ‘अशक्त’ कोण हे इतिहासाच्या अनेक टप्प्यांवर, त्या त्या वेळच्या दृष्टीकोनावरच अवलंबून राहिल्याचे दिसले आहे.

भागवत यांच्या याच भाषणातून, रा. स्व. संघाने आजकालच्या राजकीय चर्चांमधली शब्दकळाही आत्मसात केल्याचे दिसून आले. डीप स्टेट, वोकिझम, सांस्कृतिक मार्क्सवादी, दुभंगरेषांची- अर्थात ‘फॉल्ट लाइन्स’ची शोधाशोध आणि आल्टर्नेटिव्ह पॉलिटिक्स हे चलतीतले शब्द त्यांनीही यंदाच्या भाषणात वापरले, पण ‘अर्बन नक्षल’ आणि ‘टुकडे टुकडे गँग’हे शब्दप्रयोग मात्र या भाषणात नव्हते. ‘अरब स्प्रिंग’चा ‘शेजारच्या बांगलादेशात जे काही घडले’ त्याचा उल्लेख एकाच दमात करून भागवतांनी, ‘भारतातही दुष्टशक्तींचे असेच प्रयत्न ठिकठिकाणी सुरू आहेत…’ अशा आशयाचा इशाराही त्यांनी दिला… पण ‘अरब स्प्रिंग’ आंदोलनामागे काय किंवा बांगलादेशातसुद्धा- सर्व प्रमुख राजकीय विरोधकांना तुरुंगात डांबून निवडणूक लावायची आणि मग स्वत:ला ‘लोकनियुक्त सरकार’ म्हणवायचे, असा प्रकार करणाऱ्या सरकारला खेचून काढणाऱ्या बांगलादेशी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे काय, ‘दुष्टशक्ती’ कोणती होती बरे, असा प्रश्न मला पडला. थोडक्यात, भागवतांच्या अगदी अलीकडच्या भाषणातून असे संकेत मिळतात की रा. स्व. संघाने भाजपशी असलेले मतभेद एव्हाना मिटवलेले असावेत. यामुळे, आपल्या प्रचाराला आणि कृतींना रोखणारे कोणीही उरले नसल्याचा साक्षात्कार मोदींना होऊन त्यांची अधिकार-अरेरावी वाढू शकते आणि राजकीय ‘विरोधकां’वर नाही नाही ते आरोप करत राहून महागाई वाढवणारी, विषमतेला आणि वशिलेवादी भांडवलशाहीलाच चालना देणारी, तरुणांना बेरोजगारीच्या खाईत ढकलणारी तसेच जातीपातींमध्ये, धर्मांमध्ये तणाव वाढवणारी धोरणे राबवण्यास संघाकडून त्यांना मुखत्यारी मिळाली आहे असा समज बळावू शकतो. तेव्हा आता मोदींची वक्तव्ये आणि मोदींच्या कृती यांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, हे बरे.