मला विचार करायला भाग पाडतात, ते लोक मला आवडतात. त्यांच्या सगळ्याच मुद्द्यांशी मी सहमत असतोच असं नाही, त्यांचे काही मुद्दे मला पटतही नाहीत. पण ते मला थोडं थांबायला, पुन्हा पुन्हा विचार करायला लावतात, त्यातून मला आनंद मिळतो. माझ्या आजूबाजूला असलेल्यांमध्ये असे फार थोडे आहेत. त्यात एन. आर. नारायणमूर्ती आणि एस. एन. सुब्रह्मण्यम यांच्यासारखे लोक आहेत याबद्दल आपण कृतज्ञ असले पाहिजे. प्रदीर्घ आणि महत्त्वपूर्ण कारकीर्दीच्या माध्यमातून त्यांनी जगात आपले स्थान निर्माण केले आहे. ते दोघेही त्यांना जे वाटते ते निडरपणे बोलतात. ते दोघेही काय बोलतात याकडे लोकांचे लक्ष असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वेगळा दृष्टिकोन

नारायणमूर्ती आणि सुब्रह्मण्यम या दोघांनाही त्यांच्याकडे असलेली संपत्ती वारशाने मिळाली नाही. तसेच कर्मचारी/औद्याोगिक कामगारांप्रमाणे त्यांना वेतन किंवा पगार मिळत नाही. ते उत्तम व्यावसायिक आहेत. अभियंत्यापासून ते पहिल्या पिढीतील उद्याोजक असा त्यांचा प्रवास आहे. त्यामुळे, त्यांच्या उद्याोगांच्या नफ्यात त्यांचा वाटा आहे. साहजिकच ज्यांना उद्याोगाचा वारसा मिळालेला असतो त्यांच्यापेक्षा किंवा कर्मचाऱ्यांपेक्षा त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. परिणामी, काम आणि रोजचे जगणे यातील संतुलनाबद्दलचा त्यांचा दृष्टिकोनदेखील वेगळा आहे.

ज्यांना घरातूनच वारसा मिळालेला असतो त्यांना त्यांच्या व्यावसायिक कारकीर्दीची सुरुवात तळातून करावी लागत नाही. हा या व्यवसायाचा वारसदार आहे आणि एक ना एक दिवस तो सर्वोच्च स्थानी बसणार आहे, हे त्याला स्वत:ला आणि त्या व्यवसायातील इतर सगळ्यांना माहीत असते. साधारणपणे एक डझनभर काही जुनी कुटुंबे वगळता बहुतेक उर्वरित वारसांनी संपत्ती निर्माण केली नाही, असे दिसते.

हेही वाचा : बुकमार्क : ‘जोडी नंबर १’चे फसलेले आडाखे!

दुर्दैवाने, त्यांच्यापैकी काहींनी तर असलेली संपत्ती नष्ट केली. १९९१ पूर्वीची भारतातील प्रमुख १० व्यावसायिक घराणी आणि आजची अशी तुलना करा. पहिल्या पिढीतील उद्याोजकांनी संपत्ती निर्माण केली आहे. कामगार आणि कर्मचाऱ्यांचा विचार केला तर, त्यापैकी बहुतेक जण वेतन/पगार (आणि नियतकालिक सुधारणा) मिळवण्यात समाधानी आहेत. त्यांच्याकडे त्यांच्या सध्याच्या स्थितीपेक्षा पुढे जाण्याची कौशल्ये किंवा महत्त्वाकांक्षा नाही. नारायणमूर्ती आणि सुब्रह्मण्यम यांच्या आठवड्यात किती तास काम करावे यावरील टिप्पण्यांवर प्रामुख्याने अशा वारसदारांनी आणि कर्मचाऱ्यांनीच टीका केली आहे, असे मला दिसते आहे.

काय चुकले?

नारायण मूर्ती यांनी काही काळापूर्वी आठवड्यातून ७० तास काम करण्याचे समर्थन केले होते. तर सुब्रह्मण्यम यांनी आठवड्यातून ९० तास काम करायला हवे, असे म्हटले आहे, असे सांगितले जाते. त्यांनी असे म्हणणे अपमानजनक होते असे मला वाटत नाही. नारायण मूर्ती म्हणाले होते, ‘‘जगात ज्या देशांची उत्पादकता कमी आहे, अशा दैशांपैकी भारत एक आहे. म्हणूनच, माझी विनंती आहे की आपल्या तरुणांनी म्हणावे, ‘हा माझा देश आहे, मला आठवड्यातून ७० तास काम करायचे आहे’.’’ त्यांच्या या विधानांमुळे मोठा वादविवाद झाला, तेव्हा त्यांनी माघार घेण्यास नकार दिला. सुब्रह्मण्यम त्या व्हिडीओमध्ये म्हणतात, ‘‘खरं सांगायचं तर, मी तुम्हाला रविवारी काम करायला लावू शकत नाही याचे मला वाईट वाटते. मी रविवारी काम करतो, मला तुम्हाला काम करायला लावण्यास खूप आनंद होईल.’’

औद्याोगिक कामगारांसाठी ‘आठ तासांचा दिवस’ हा कायदा १९१८ मध्ये जर्मनीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा झाला. तेव्हापासून ‘आठ तास काम, आठ तास मनोरंजन आणि आठ तास विश्रांती’ हा एक सार्वत्रिक नियम बनला आहे. ‘मनोरंजना’साठी दिवसातून आठ तास कोणीही घालवत नाही, हे मला माहीत आहे, पण ८-८-८ ला एक छान वलय आहे. ‘मनोरंजन’ या श्रेणीमध्ये खाणेपिणे, कपडे धुणे, व्यायाम करणे, खेळ खेळणे, चित्रपट पाहणे, वर्तमानपत्रे आणि पुस्तके वाचणे, खरेदी करणे, गप्पाटप्पा हे सगळे येऊ शकते, असे मला वाटते. ‘मनोरंजना’कडे या दृष्टीने पाहिले तर त्यासाठी आठ तास पुरेसे वाटत नाहीत!

हेही वाचा : काळाचे गणित : सरकती संक्रांत

बहुतेक औद्याोगिक कामगारांच्या कामाचे स्वरूप ‘तेच ते’ या प्रकारचे असते. काही जण नवीन कौशल्ये शिकतात आणि अधिक जटिल कामे करण्याची क्षमता मिळवतात. एका जागी बसून काम करणे असे म्हणजे डेस्क जॉब असे कामाचे स्वरूप प्रचलित झाले तेव्हा रोजगार देणाऱ्या व्यावसायिकांनी ८-८-८ या नियमाचे अनुकरण केले. एका जागी बसून काम करणारे म्हणजेच डेस्क जॉब करणारे बहुतेक कर्मचारीदेखील ‘तेच ते’ या स्वरूपाचे काम करतात. म्हणूनच, बहुसंख्य कामगार/कर्मचाऱ्यांसाठी ८-८-८ हा नियम असायला हवा, या मुद्द्याशी मी सहमत आहे. ऑटोमेशन, रोबोटिक्स आणि एआयमुळे उद्या हे नियम बदलून कमी तास काम करा, असा नियमही येऊ शकतो. तेव्हा माणसांनी जास्त तास काम करण्याची गरज नसेल, पण साधने, तंत्रज्ञान आणि प्रणाली यांनी अधिक उत्पादकक्षम होणे आवश्यक ठरेल. नारायण मूर्ती आणि सुब्रह्मण्यम यांनी जे मत मांडले ते अशा कामगार आणि कर्मचाऱ्यांसाठी नव्हते, असे मला वाटते.

याउलट, शेतकरी, विशेषत: स्वत:च शेती करणारे शेतकरी, ८-८-८ हा नियम पाळत नाहीत. शेतीच्या कामात, पहिले आठ तास १० किंवा १२ तासांपर्यंत वाढण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे, डॉक्टर, वकील, न्यायाधीश, वास्तुविशारद, शास्त्रज्ञ, अभिनेते इत्यादी व्यावसायिक दिवसाचे फक्त आठ तास काम करत नाहीत. दिवसाचे १२-१२ तास काम करणारे व्यावसायिक मला माहीत आहेत. बऱ्याच वेळा तर ते शनिवारी आणि रविवारीही काम करतात. काही यशस्वी व्यावसायिक आपण कसे १२- १२ तास काम करायचो ते सांगतात. म्हणूनच, हा नियम आदर्श ठरवून सरसकट सगळ्यांना लावता येत नाही.

स्वत:चा शोध

मला दिवसभरात कितीही तास काम करायला आवडते, पण माझ्या ‘कामा’ च्या व्याख्येत कायद्याचा अभ्यास, संसदीय कामकाज करणे, वाचन, लिहिणे, बोलणे, लोकांचे म्हणणे ऐकणे, पक्ष कार्यकर्त्यांशी बोलणे आणि निवडक सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहणे या गोष्टींचा समावेश आहे. मी झोपलेला नसतो, जागा असतो ते प्रत्येक तास माझ्या लेखी मी कामच करत असतो. कामाचे तास आणि रोजचे जगणे यांचे संतुलन कसे साधायचे याचा प्रत्येकाने आपापल्या पातळीवर शोध घेतला पाहिजे. माझे संतुलन कशामध्ये आहे, ते मला शोधता आले आहे, हे मी आनंदाने सांगू इच्छितो.

हेही वाचा : तळटीपा : आत्मलुब्धांचं वर्गचरित्र!

नारायण मूर्ती आणि सुब्रह्मण्यम यांनी त्यांच्या आयुष्यात प्रचंड यश मिळवले आहे आणि ते सर्वोच्च स्थानीही पोहोचले आहेत. त्यामुळे भारतीयांनी ‘जास्त’ तास काम करावे हे सांगण्याची पात्रता त्यांनी निश्चितच कमावली आहे, असे मला वाटते. काही ट्रोल आणि मीम्समध्ये हे जास्त तास काम करतात कारण त्याचा त्यांना तसा आर्थिक मोबदला मिळतो असा उल्लेख करण्यात आला होता. पण या दोघांच्याही वक्तव्यांचा अशा काही आर्थिक परताव्याशी संबंध आहे असे मला वाटत नाही. मी अशा अनेक स्त्रीपुरुषांना ओळखतो जे अधिकाधिक उत्पन्न किंवा संपत्ती असा विचार करून त्यांचे काम करत नाहीत. ते अतिशय शिस्तप्रिय जीवन जगतात, त्यांचा आहार साधा असतो. ते मद्यापान करत नाहीत, ते अतिआकर्षक नाही, पण नीटनेटके कपडे घालतात आणि ते अत्यंत नम्र आणि दयाळू आहेत. दीर्घ तासांच्या उत्पादक कामामुळे विकसनशील देश खरोखर श्रीमंत होईल आणि लाखो लोकांचे जीवन सुधारेल, असे तरुण पिढीला सांगण्याचा प्रयत्न नारायण मूर्ती आणि सुब्रह्मण्यम करत होते, असे मला वाटते.

माझ्या मते, नारायण मूर्ती आणि सुब्रह्मण्यम जे काही बोलले त्यात वादग्रस्त काहीही नव्हते. जर काही असेलच तर, त्यांची विधाने या विषयावरची कोणतीही चर्चा नसताना अचानक आली आणि त्यांनी लोकांना विचार करायला प्रवृत्त केले. कामाचे तास आणि जगणे यांच्या संतुलनाच्या शोधात अशी सगळी चर्चा झाली तर त्यात काय वाईट आहे?

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: P chidambaram on 70 and 90 hours work in a week narayana murthy l and t chairman subrahmanyan css