‘भांडवलशाहीत बाजाराला काही पूर्वअटी असतात, काही नियतकार्ये असतात याचे पुरेसे आकलनच रशियन धोरणकर्त्यांना नसताना गोर्बाचोव यांनी पेरेस्त्रोइका (खुलेपणा) हे धोरण आणले’ हा निष्कर्ष आकडेवारीच्याच आधारे नव्हे, तर बोरिस येल्तसिन यांच्यासह ११ रशियन धोरणकर्त्यांच्या दीर्घ मुलाखती घेऊन काढणाऱ्या पद्मा देसाई या पहिल्या अर्थशास्त्रज्ञ. भारताच्या पंचवार्षिक योजना आणि ‘बोकारो स्टील’सारखे मोठे सार्वजनिक उद्योग यांचाही अभ्यास त्यांनी केला होता व भारताप्रमाणेच रशियाची आर्थिक वाटचाल १९६० ते २०२० या काळात त्या जाणतेपणी अभ्यासत होत्या. कोलंबिया विद्यापीठात बदलत्या अर्थव्यवस्थांचा अभ्यास करणारे केंद्र त्यांच्या संचालकत्वाखाली स्थापन झाले आणि याच विद्यापीठातील एका अध्यासनाच्या सुप्रतिष्ठ प्राध्यापक होण्याचा मानही त्यांना मिळाला होता. अर्थशास्त्रज्ञ पती जगदीश भगवती यांचा वैचारिक प्रभाव पद्मा यांनी नाकारला नसला तरी, पतीच्या सावलीचा झाकोळ त्यांनी स्वत:च्या संशोधनकार्यावर कधीही येऊ दिला नाही. या पद्मा देसाईंचे निधन २९ एप्रिल रोजी अमेरिकेत झाल्याचे भारतीयांना गेल्या सोमवारी समजले, तेव्हा मात्र अनेकांना ‘ब्रेकिंग आऊट – अॅन इंडियन वूमन्स अमेरिकन जर्नी’ हे आत्मचरित्र आठवले.. ‘भावनिक न होताही भावना कशा व्यक्त कराव्या याचा वस्तुपाठ’ असे त्या आत्मचरित्राचे कौतुक साक्षात गायत्री चक्रवर्ती-स्पिवाक यांनी केले होते! सुरतच्या मध्यमवर्गीय कुटुंबातल्या या मुलीचे वडील इंग्लंडात शिकून आल्यानंतर भारतात अध्यापन करू लागले. मुलीला त्यांनी अर्थशास्त्र शिकण्यासाठी मुंबईला पाठवले. बीएच्या अंतिम परीक्षेत १९५१ मध्ये अर्थशास्त्रात त्या पहिल्या आल्या, शिष्यवृत्तीवर त्यांनी एमए केले, आणि १९५७ साली हार्वर्ड विद्यापीठात पीएच.डी.साठी प्रवेश मिळवला. भारतीय आर्थिक नियोजनावरील प्रबंधाचा अभ्यास करण्यासाठी मायदेशी परतल्या असता त्यांचे (वयाने दोन-तीन वर्षांनी लहान असलेल्या जगदीश भगवतींशी) लग्न झाले. अर्थशास्त्रज्ञ दाम्पत्य काही काळ दिल्लीत राहिले, पण १९६० च्या दशकाच्या मध्यावर पद्मा अमेरिकेस वास्तव्यासाठीच गेल्या. तेथे ऐन शीतयुद्धाच्या काळात रशियाचा अभ्यास करण्याची धमक त्यांनी दाखवली. रशियाच्या ‘अधिकृत’ आकडेवारीचा ताळमेळ अन्य घटकांशी बसवणे, ही पद्धती त्यांनी विकसित केली. बर्कलेच्या ‘युक्ला’ अथवा पुढे कोलंबिया विद्यापीठात शिकवत असतानाच, हार्वर्डच्या रशिया-अभ्यास केंद्राचेही काम १९८५ पर्यंत केले. अमेरिकन म्हणूनच त्या जगल्या, मुलगी सुनयना ही स्वेच्छेने अमेरिकी नौदलात अधिकारी होते आहे याचाही पद्मा यांनी आनंदच मानला आणि वयाची ऐंशी पार केल्यानंतर त्या स्वत:चे आणि पतीचेही वाढदिवसही थाटात, पण अर्थशास्त्रज्ञ आणि धोरणतज्ज्ञ यांच्यासह साजरा करू लागल्या. वयाच्या सत्तरीपर्यंत युरोपातील अनेक देश तसेच भारत आणि अमेरिकेतील अनेक शहरे यांत व्याख्याने वा संशोधनासाठी सतत फिरत असणाऱ्या पद्मा देसाई गेले दशकभर कोलंबिया विद्यापीठाच्या परिसरातच दिसत. आत्मचरित्राचे प्रकाशन २०१२ मध्ये दिल्लीत झाले, तोच भारतीय शिष्यांच्या उपस्थितीत झालेला मोठा सोहळा ठरला.
व्यक्तिवेध : पद्मा देसाई
बोरिस येल्तसिन यांच्यासह ११ रशियन धोरणकर्त्यांच्या दीर्घ मुलाखती घेऊन काढणाऱ्या पद्मा देसाई या पहिल्या अर्थशास्त्रज्ञ.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 08-05-2023 at 00:02 IST
मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Padma desai economist conducting interviews with russian policymakers ysh