‘मेरा नाम आओ, मेरे पास आओ’ अशा फिल्मी (ये गुलिस्ताँ हमारा- १९७२) गाण्याला ‘विनोदी’ मानणे ही जेव्हा भारताच्या तथाकथित ‘मुख्य भूमी’ची ईशान्येकडल्या राज्यांबद्दलची अक्कल होती, तेव्हा नागालँडमधील आओ जमातीमधील २७ वर्षांच्या तेमसुला आओ यांनी लग्न, संसार, मुले सांभाळूनही इंग्रजी वाङ्मयात पदव्युत्तर शिक्षणाची वाट शोधली होतीच, पण त्या लिहूसुद्धा लागल्या होत्या. हे लेखन सहजच इंग्रजीत झाले, कारण एकतर आओंच्या मातृभाषेची लिपी रोमन, दुसरे म्हणजे तेमसुला यांचे शिक्षण इंग्रजीतून झाले आणि पहिली- शिक्षिकेची नोकरीही त्यांनी इंग्रजी शाळेतच केली. पाच भावंडांच्या लहानपणीच त्यांचे आई-वडील गेल्यामुळे नातेवाईकांनी तेमसुला यांची सोय कुणा वसतिशाळेत केली, तिथेच वाढल्याने इंग्रजीत व्यक्त होणे सुरुवातीला भाग पडले, मग अंगवळणी पडले.
या अंगीकृत भाषेतून त्यांनी नागा लोकजीवनाकडे, मानसिकतेकडे आणि प्रश्नांकडेही लक्ष वेधणारे साहित्य लिहिले. ‘भाषेत’ आणि ‘संस्कृतीमध्ये लिहिणे’ या भिन्न रीती असतात, हे सिद्धच केले. नागा संस्कृतीत लिहिणाऱ्या या इंग्रजी लेखिकेची निधनवार्ता रविववारी, ९ ऑक्टोबरला आली. संस्कृती अनादि असते, तशीच समकालीनही! त्यामुळे नागालँडची राजकीय अस्थिरता, धुमसता िहसाचार यांचेही प्रतििबब तेमसुला यांच्या लेखनात दिसू लागले, पण ते प्रचारकी पद्धतीने नव्हे. त्यांच्या ‘लेटर’ या कथेतला नायक आपण आता अतिरेक्यांना सामील झालो आहोत, असे स्वत:च्याच गावकऱ्यांना सांगून, त्यांच्याकडून खंडणी उकळतो.. पण प्रत्यक्षात, या नायकालाच अतिरेक्यांनी लुटल्यामुळे हतबल होऊन, मुलाच्या उच्चशिक्षणाची पुंजी पुन्हा उभारण्याच्या तगमगीतून त्याने अतिरेकी असल्याचा बनाव रचल्याचे उघड होते! ही कथा असलेल्या ‘लॅबर्नन फॉर माय हेड’ या संग्रहाला २०१३ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, पण त्याआधीच साहित्य अकादमीला त्यांच्या कार्याचे मोल उमगले असावे. या देशव्यापी अकादमीच्या अनेक चर्चासत्रांमध्ये, ईशान्य भारताचा चेहरा म्हणून तेमसुलाच दिसत. त्यांचा ‘साँग्स दॅट टेल’ हा पहिला कवितासंग्रह १९८८ सालचा.
पुढल्या काव्यसंग्रहांची नावेही ‘साँग्ज दॅट ट्राय टु से’, ‘साँग्ज ऑफ मेनी मूड्स’, ‘साँग्ज फ्रॉम हिअर अँड देअर’, ‘साँग्ज फ्रॉम अदर लाइफ’ अशी- कवितेतून जीवनसंगीताचे सूर-ताल शोधणारी. कविता आणि कथांमध्ये जम बसू लागल्यावर पुढली पिढी घडवण्याच्या वयात, समीक्षेतही त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. ‘ऑन बीइंग अ नागा’ हा त्यांचा मानववंशशास्त्रीय संदर्भग्रंथ प्रसिद्ध आहे. नागांच्या आठ जमातींचाच नव्हे तर ईशान्येतील अन्य समाजांच्याही वाङ्मयाचा आदर आणि अभ्यास करून, त्यातील साहित्यसत्त्व नेमके टिपण्याकडे त्यांचा कल असे. हे अगदी सहज, कोणत्याही अभिनिवेशाविना त्यांनी केले, पण त्यांचे कार्य आजच्या, कोणत्याही भाषेतल्या ‘देशीवादी’ लेखकांनीही धडे गिरवावेत असे ठरले. केंद्र शासनाने त्यांना २००७ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. साहित्यात समाजजीवनाचे चित्रण करायचे आणि सामाजिक कार्यातही सक्रिय राहायचे, हा त्यांचा सहजस्वभाव होता. या अर्थाने तेमसुला या कृतिशील लेखिका ठरल्या. नागालँडचे लोकजीवन त्यांच्यामुळे केवळ देशातच नव्हे, तर विदेशातही साहित्याद्वारे पोहोचले. त्यांच्या कविता कदाचित अतिभावुक ठरवल्या जातील, पण दोन कथासंग्रह, एक कादंबरी, आठवणींचा संग्रह आणि अनुभवांच्या लेखांचे त्यांचे पुस्तक साहित्यरसिकांसह समाज आणि संस्कृतीच्या अभ्यासकांनाही उपयुक्त ठरेल.