दक्षिण आशियातील अमेरिकेचा घनिष्ठ सहकारी हे बिरुद गेल्या काही वर्षांमध्ये पाकिस्तानऐवजी भारताला मिळू लागले असले, तरीही अमेरिकी अध्यक्षांनी पाकिस्तानविषयी नुकतेच केलेले वक्तव्य असाधारणच म्हटले पाहिजे. ‘अण्वस्त्रांच्या हाताळणीविषयी कोणतीही संलग्नता नसल्यामुळे अण्वस्त्रसज्ज पाकिस्तान हा जगातील सर्वात धोकादायक टापू ठरतो,’ असे नि:संदिग्ध विधान अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी शुक्रवारी रात्री केले. खरे तर त्यांचे लक्ष गेले काही दिवस रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अण्वस्त्रांबाबत दिलेल्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष धमक्यांकडे वेधले गेले होते. अमेरिका आणि तिच्या नाटो सहकाऱ्यांसाठी रशियाच्या अण्वस्त्र धमक्या हा सध्या विलक्षण चिंतेचा आणि चिंतनाचा विषय ठरतो. पण यातही बायडेन यांना पाकिस्तानातील अण्वस्त्रस्थितीविषयी बोलावेसे वाटते, हे लक्षणीय आहे.
अमेरिका-पाकिस्तान यांच्यातील संबंध हल्ली पुन्हा सुधारण्याच्या वाटेवर आहेत, असे पाकिस्तानातील सामरिक आणि राजनयिक विश्लेषकांना वाटते. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो झरदारी आणि लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा हे अलीकडेच अमेरिकेत जाऊन आले. पाकिस्तानकडील अमेरिकी बनावटीच्या एफ-१६ विमानांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी निधी पुरवण्याचे अमेरिकेने कबूल केले आहे. या सगळय़ा घडामोडी पाकिस्तानसाठी आश्वासक म्हणाव्यात अशाच. परंतु आपल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या सभेत बोलताना बायडेन यांनी, द्विराष्ट्रीय संबंधांचा विचार न करता, व्यापक परिप्रेक्ष्यावर भाष्य केले आहे. यात पाकिस्तानला धोकादायक टापू संबोधताना त्यांनी तेथील राजकीय आणि लष्करी नेतृत्वावर अविश्वास दाखवताना, या दोहोंतील परस्पर संलग्नतेच्या अभावावरही (नो कोहेजन) बोट ठेवले आहे. हे गंभीर निरीक्षण आहे. अण्वस्त्रे वापरण्याआधी ती सुरक्षित बाळगावी लागतात आणि ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी राजकीय नेतृत्व आणि लष्कर अशा दोहोंची असते. पण सशक्त लोकशाही व्यवस्थेत अण्वस्त्रांचा ताबा सर्वार्थाने राजकीय नेतृत्वाकडे असावा असा संकेत आहे. बायडेन यांनी भाषण करताना मनात आले म्हणून पाकिस्तानचा उल्लेख खचितच केलेला नाही. पाकिस्तानात लष्करच सर्वशक्तिमान आहे हे सर्वज्ञात आहे. परंतु पाकिस्तानात राजकीय पक्षांना तेथील कारभार हाकणे जमलेलेच नाही, हे बायडेन यांना उमगले आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टी, पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ) आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पार्टी या तिन्ही प्रमुख पक्षांना सक्षम नेतृत्व देता आलेले नाही.
जनरल बाजवा पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत. त्यांनी पुढील निवडणुकीपर्यंत म्हणजे २०२३च्या मध्यापर्यंत पदावर राहावे, अशी अपेक्षा तेहरीक-ए-इन्साफ पार्टीचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान इम्रान खान व्यक्त करतात. मागील खेपेस लष्कराच्या मदतीनेच ते सत्तेवर आले, या आरोपाची ही पुष्टीच ठरत नाही काय? परंतु या सगळय़ा परिस्थितीला केवळ पाकिस्तानातील नेतृत्वच जबाबदार आहे, असे मानण्याचे कारण नाही. या पातकाचा वाटा काही प्रमाणात अमेरिकेचाही आहेच. नवीन सहस्रकाच्या पहिल्या दशकात दहशतवादविरोधी लढय़ातील ‘सहकारी’ म्हणून आणि तत्पूर्वी भारताविषयीचा आकस म्हणून पाकिस्तानच्या अण्वस्त्रसिद्धतेकडे काणाडोळा करण्याचे धोरण अजिबात फळलेले नाही, हे एखादा अमेरिकी अध्यक्ष कधी मान्य करणार? अमेरिकेच्या विसविशीत, धरसोड धोरणांमुळेच पाकिस्तानी समाजातून जिहादी तत्त्वांचा समूळ नायनाट होऊ शकला नाही. आज त्यामुळेच अण्वस्त्रे असुरक्षित परिस्थितीत आहेत, हा बायडेन यांच्या ‘पाकताडना’चा मथितार्थ.