‘कलाकृतीचा अनुभव’ हा शब्दप्रयोग सार्वत्रिक आहे. पण ‘अनुभव हीच कलाकृती’ हे काय? ‘हिरवा’ आणि ‘फिकट भगवा’ या रंगांचे जे अनुभवाधारित संदर्भ भारतीयांना माहीत असतात, ते युरोपीयांच्या गावीही नसणार. इथंच त्या ‘फिकट भगव्या’चं रहस्य दडलं होतं…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

योगी आदित्यनाथ यांच्या सदऱ्यांचा रंग आठवून पाहा. (हे असलं काही आठवत नसेल, तर गूगलवरल्या त्यांच्या फोटोंपैकी कोणत्या फोटोत सदऱ्याचा रंग सर्वांत फिकट आहे, हे शोधून पाहा) तो जो फिकट भगवा रंग आहे, तसा रंग एका मोठ्या दालनाच्या आत- भिंतींवर पसरलेला असल्याचं पंधरावीस फुटांच्या अंतरावरूनही दिसत होतं. हे दालन चहूकडून बंद आहे, एकच चिंचोळा रस्ता त्या दालनाकडे जातो आहे आणि तो मार्ग पार केला तरीही त्या दालनाच्या आत आपण जाऊ शकणार नाही… कारण सुमारे चार- साडेचार फूट उंचीची भिंतच जिथं तो छन्नमार्ग संपून दालन सुरू होतं तिथंच घातली गेली आहे, हेसुद्धा दिसत होतं. (ते वर्ष होतं २०१५. म्हणजे आदित्यनाथ ऊर्फ अजयसिंह बिष्ट हे खासदार होते, फार प्रसिद्ध वगैरे नव्हते. पण तेव्हा आणि त्याआधीपासून महाराष्ट्रातही स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणारे काही जण तितक्याच फिकट भगव्या छटेचा सदरा घालत असत, हे त्या दालनातल्या भिंतींवर पसरलेला रंग लांबूनच पाहून म्यां भारतीय प्रेक्षकाला आठवू लागलं होतं) …तर त्या दालनाकडे नेणारा एकमेव मार्ग होता हिरवा. त्या ‘फिकट भगव्या खोली’कडे जाण्यासाठी तो गल्लीसारखा छन्नमार्ग (म्हणजे कॉरिडॉर/ पॅसेज) ओलांडण्याची आमची वेळ येईस्तोवर आम्ही प्रेक्षक ज्या भागात थांबलो होतो, तिथल्या तर भिंती हिरव्याच आणि त्यांवरला प्रकाशही हिरवा. शांत वाटत होतं, हिरव्या भिंतींपाशी हिरवा प्रकाश अंगावर घेताना. छन्नमार्गातून दोघेतिघे बाहेर येताहेत, नवे दोघेतिघे आत जाताहेत, असं सुरू असताना कधी तरी तो मार्ग पार करून, त्या साडेचार फुटी कठड्यापर्यंत पोहोचलो. तिथं आणखी काही तरी दिसलं… वाटलं होतं त्यापेक्षा निराळं!

ते काय दिसलं, हे नंतर कळेलच. पण वरच्या परिच्छेदातला अनुभव कसा काय घेता आला याबद्दल आधी सांगितलं पाहिजे. पामेला रोझेनक्रान्झ ही स्विस-जर्मन दृश्यकलावंत. २०१५ च्या ‘व्हेनिस बिएनाले’त, स्वित्झर्लंडच्या दालनातली एकमेव दृश्यकलावंत म्हणून निवडण्यात आलं होतं. या दालनाची रचना लक्षात घेऊन पामेला रोझेनक्रान्झ हिनं जे काही केलं, त्या ‘कलाकृती’चा हा अनुभव होता.

हेही वाचा >>> व्यक्तिवेध: त्सुंग दाओ ली

किंवा पामेला रोझेनक्रान्झ हिच्या कलाकृतींबद्दल आजवर जे काही लिहिलं गेलंय त्याआधारे असं ठामपणे म्हणता येईल की, तिनं जे काही केलं त्याचा ‘अनुभव म्हणजेच तिची कलाकृती होती’.

‘कलाकृतीचा अनुभव’ हा शब्दप्रयोग सार्वत्रिक आहे. पण ‘अनुभव हीच कलाकृती’ हे काय? ते समजून घेण्यासाठी, २००७ साली मांडला गेलेल्या ‘स्पेक्युलेटिव्ह रिअॅलिझम’ या विचारव्यूहाकडे खुद्द पामेला रोझेनक्रान्झच बोट दाखवतात. चौघा युरोपीय तत्त्वज्ञान-अभ्यासकांनी ‘स्पेक्युलेटिव्ह रिअॅलिझम’मधून इमॅन्युएल काण्टच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला. अनुभवाला काण्टनं संकल्पनेचं सार्थ प्रमाण मानलं होतं (काण्टनं आणखीही बरंच काही मानलं, मांडलं होतं पण इथल्या विवेचनासाठी इतकंच सध्या लक्षात ठेवू). तर ‘स्पेक्युलेटिव्ह रिअॅलिझम’वाल्या त्या चौघांनी जे मांडलं त्याचा लघुसारांश असा की- एखादी संकल्पना सार्थ नसूही शकते, तरीही तिचाही अनुभव घेता येऊ शकतोच आणि अभौतिक, अतार्किक असा ‘बोध’ या अनुभवातून होऊ शकतो! …या अर्थानं पामेला रोझेनक्रान्झ म्हणतात की, त्यांची ही कलाकृती आणि अन्य कलाकृतीसुद्धा ‘स्पेक्युलेटिव्ह रिअॅलिझम’वर आधारित आहेत.

गोम अशी की, या कलाकृतीला खुद्द पामेला रोझेनक्रान्झही कलाकृती म्हणत नव्हत्या. ‘अवर प्रॉडक्ट’ हेच या कलाकृतीचं शीर्षक होतं आणि अनेक गम्य-अगम्य अशा रासायनिक पदार्थांचा वापर त्यातल्या रंगांसाठी झाल्याचं त्यासोबतच्या पुस्तिकेत नमूद होतं. पण ज्याअर्थी व्हेनिस बिएनाले नामक दृश्यकलेच्या महाप्रदर्शनात, एका देशानं कलादर्शनासाठीच या बिएनालेच्या आवारामध्ये उभारलेल्या बांधीव कायमस्वरूपी दालनात या ‘अवर प्रॉडक्ट’चं प्रदर्शन होत होतं, त्याअर्थी याकडे ‘कलाकृती’ म्हणून पाहावं अशी संस्थात्मक अपेक्षा तरी होती. पामेला रोझेनक्रान्झ यांना फक्त अनुभव- सुविधा उभारायची होती आणि तिला त्या ‘अवर प्रॉडक्ट’ म्हणत होत्या. पण त्यांनी रंग तर विचारपूर्वक निवडलेले होते. कसला विचार असेल त्यामागे?

‘हिरवा’ आणि ‘फिकट भगवा’ या रंगांचे जे अनुभवाधारित संदर्भ भारतीयांना माहीत असतात, ते युरोपीयांच्या गावीही नसणार. इथंच त्या ‘फिकट भगव्या’चं रहस्य दडलं होतं. जो रंग भारतीय प्रेक्षकाला ‘फिकट भगवा’ दिसला (आणि इथल्या दोन फोटोंपैकी ज्यात माणसं नाहीत तो फोटो रंगीत स्वरूपात पाहिलात तर तुम्हालाही ‘फिकट भगवा’च दिसेल) तो मुळात ‘गुलाबी, गोऱ्या युरोपीय त्वचेचा रंग’ म्हणून वापरला गेल्याचं काही युरोपीय समीक्षक छातीठोकपणे सांगत होते. त्यापैकी तिघाचौघांचं या प्रकारचं लिखाण आजही इंटरनेटवर आढळतं. त्यांच्या म्हणण्यात तथ्य नव्हतंच असं नाही, कारण कॅम्लिनच्या ४८ खडूंच्या रंगपेटीत ‘अंगी रंग’ म्हणून जो असतो तसाही हा रंग होता… शिवाय, पुढे त्या कठडाबंद दालनामध्ये आणखीही काय काय घडत होतं.

म्हणजे, तिथं त्या ‘अंगी रंगा’च्या अधिक गडद छटेचं पाणी किंवा अपारदर्शक द्रव्य होतं. तो रंग दक्षिण आशियाई, दक्षिण अमेरिकी, उत्तर अमेरिकेतले मूलनिवासी यांच्या त्वचेचा म्हणता येईल असा. त्यावर भरपूर प्रकाश असल्यानं भिंतीवर या रंगाची जी आभा फाकलेली होती ती ‘फिकट भगव्या’ रंगासारखी होती, इतकंच. इथे त्या रंगाचा रहस्यभेद पूर्ण होतो. पण ते अपारदर्शक द्रव्य… नीट पाहिल्यास त्यामध्ये दिसणारी अधूनमधूनच अधिक गडद छटेचा रंग पसरवू पाहणारी कारंजी, यापैकी कोणत्याही कारंज्याचा फवारा पाण्याच्या पातळीहून वर उडत नसल्यानं आतल्या आतच बुडबुडे आणि लाटा यांचा होणारा खेळ… त्या पाण्याचा रंग काही तासांनी गडद होणार आणि काही तासांनी पुन्हा फिकट होणार याची जाणीव… हे सारं काय असू शकतं? युरोपीय उत्तर एकदम तय्यार होतं! हा म्हणजे वर्णसंकराचा अनुभव होता, अर्थात २०१५ च्या युरोपच्या संदर्भात.

ते संदर्भ आजही बदललेले नाहीत. युरोपीय देशांत युरोपबाहेरून स्थलांतर वाढतं आहे. वर्णसंकराची भीती अटळ आहे…ती किती जणांना वाटते, यावर युरोपच्या प्रगत/अप्रगतपणाचं मोजमाप अवलंबून आहे. हाच तो, ‘सार्थ नसलेल्या संकल्पने’चा अनुभव. तो ज्या रचनेनं दिला, तिला कलाकृती मानायला काहीच हरकत नाही- कारण ‘कलाकृतीनं दिलेल्या अनुभवाचा एकंदर व्यापक जीवनानुभवातल्या कशाशी तरी काही तरी संबंध हवा’ हा आग्रह ती कलाकृती पूर्ण करते असं म्हणता येईल. पण… तो अनुभव युरोपीय होता!

म्हणजे तो ‘आपला’ नव्हता ‘त्यांचा’ होता; ‘देशी’ नव्हता… वगैरे. तेवढ्यावरून, ती युरोपीय कलाकृती युरोपीयेतरांना अनुभव द्यायला असमर्थ होती, असं आपण कसं काय ठरवणार?

कारण ‘फिकट भगवा आणि गडद हिरवा’ असं म्हटल्यावर कोणता विचार करणाऱ्या भारतीयांना राग येणार, हे देशप्रेमी भारतीय म्हणून आपल्याला माहीत नसतं का?

(छायाचित्रं : अभिजीत ताम्हणे)

abhijit.tamhane @expressindia.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pamela rosenkranz s paintings artwork by pamela rosenkranz zws