प्रति, निर्माता व दिग्दर्शक, पंचायत वेबसिरीज,
असे निदर्शनास आले की तुम्ही सिरीजमध्ये स्वातंत्र्यदिनी एका आमदाराच्या हातून कबुतर उडवले, पण ते लगेच खाली पडून मरण पावले. हे दृश्य दाखवण्यामागचा तुमचा उद्देश आमदाराची मानहानी करण्याचा होता की स्वातंत्र्यदिनी शांतीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला असा होता हे तातडीने स्पष्ट करावे. त्याचे कारण असे की आमच्या जिल्ह्यात गेल्या १५ ऑगस्टला हेच दृश्य पुन्हा ‘रिक्रिएट’ करण्याची पण त्यात कबुतर मरणार नाही तर उडेल याची काळजी घेण्याची जबाबदारी मुख्यालयातील राजशिष्टाचार विभागाच्या तहसीलदारावर सोपवली होती. त्यांच्या जबाबानुसार हे कार्य तडीस नेण्यासाठी तुमच्याशी संपर्क साधला. तुम्ही चित्रीकरण करत असलेल्या स्थळाला भेट दिली. तुम्ही ज्या कबुतरवाल्याचा संपर्क क्रमांक दिला त्याच्याशी संपर्क साधला व भाडे ठरवून त्यांच्या येण्याची व्यवस्था केली. या लोकप्रिय सिनमध्ये थोडा बदल असल्याने ऐनवेळी गडबड होऊ नये म्हणून तुम्ही दोन साहाय्यक दिमतीला दिले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झेंडावंदन झाल्यावर कबुतर उडवण्याचा कार्यक्रम झाला पण सिरीजप्रमाणेच कबुतर थोडा काळ उडून खाली पडले. सुदैवाने ते मृत पावले नाही. आमच्या सीनमध्ये आमदारांच्या ऐवजी पोलीस अधीक्षकांच्या हातून हा प्रकार घडला. यामुळे केवळ जिल्हाच नाही तर संपूर्ण राज्यातील प्रशासकीय यंत्रणेला मानहानी सहन करावी लागली. हे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी तुम्ही मदत करताना हयगय केली अशी आमची ठाम धारणा झाली आहे. त्यासाठी तुम्हाला जबाबदार धरून ही नोटीस बजावण्यात येत आहे. २४ तासांच्या आत स्पष्टीकरण द्यावे अन्यथा तुम्हाला काहीही म्हणायचे नाही हे गृहीत धरून तुमच्या सिरीजचे प्रसारण तात्काळ थांबवण्याचे कायदेशीर आदेश देण्यात येतील.
आपला ,
जिल्हा दंडाधिकारी, मुंगेली (छत्तीसगड)
हेही वाचा >>> संविधानभान: धन विधेयकाची वैशिष्ट्ये
प्रति, मा. जिल्हा दंडाधिकारी,
तुमची नोटीस मिळाली. घडलेला प्रकार वाचून आमच्या राष्ट्रप्रेमी मनांना अपार वेदना झाल्या. आम्ही तुम्हाला चांगल्या भावनेतून सहकार्य केले. मात्र कबुतरवाल्याचा संपर्क देताना थोडी चूक झाली. आमचा नेहमीचा कबुतरवाला बाहेरगावी गेला होता व तुमची तातडी लक्षात घेता आम्ही धावपळ करून दुसरा शोधला. तेव्हा आम्ही त्याची पार्श्वभूमी तपासली नाही. आता चौकशी केली असता तो पक्का काँग्रेसी व नेहरूवादी असल्याचे निदर्शनास आले. त्याने कबुतरांनासुद्धा कुणाच्या हातून उडायचे व कुणाच्या हातून उडल्यावर खाली पडण्याचे नाटक करायचे हे शिकवून ठेवले आहे. राष्ट्रवादी लोकांच्या कार्यक्रमाचा विचका करायचा असा कट त्यानेच आखला असल्याचे आमच्या चौकशीत आढळून आले आहे. शांतीचे प्रतीक केवळ गांधी व नेहरू होते, इतर कुणी नाही असे कबुतराच्या माध्यमातून जनमानसावर बिंबवण्याचा हा डाव आहे. त्यामुळे आमच्यावर कारवाई करण्याऐवजी त्या कबुतरवाल्यावर कारवाई करून याला नेहरू जबाबदार असा निष्कर्ष काढून हे प्रकरण बंद करावे अशी विनंती करत आहोत. आपला,
– निर्माता व दिग्दर्शक हे पत्र मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकत पोलीस अधीक्षकांना फोन करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले. अर्थात नेहरूंनाही यात गुंतवा असे सांगण्यास ते विसरले नाहीत.