या माणसांची जातपात, त्यांची सांपत्तिक स्थिती, त्यांचं गाव… यातलं काहीही न पाहता त्यांच्याकडे पाहायचंय, अशी मागणी पराग सोनारघरे याच्या कलाकृती गेली काही वर्षं सातत्यानं आणि वाढत्या सुरात करताहेत…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रंग लावण्याच्या किंवा कमी करण्याच्या/ घासण्याच्या/ थर चढवण्याच्या अशा कोणत्याही क्रियेला – ती क्रिया करण्यामागच्या विचाराला आणि त्यातून उलगडणाऱ्या प्रतिमेला कोणतंही रंगचित्र पाहताना महत्त्व द्यायला हवं… ‘पेटिंग’ पाहिल्याचं समाधान त्याशिवाय मिळूच शकत नाही. मग ते चित्र कुठल्याही काळातलं किंवा कोणत्याही दृश्यरूपाचं असो. माणसाचं चित्र असो की पूर्णत: अमूर्त चित्र असो, रंग कसा लावला आहे, याकडे प्रेक्षकानं पाहायला हवंच. त्याशिवाय आपण त्या विशिष्ट चित्राच्या ‘प्रदेशा’त जात नाही- रंगांनी साकारलेल्या त्या टापूतून आपण फिरत नाही. किंवा ‘जेजे’तले कलाध्यापक आणि चित्रकार सुधाकर यादव यांचा शब्द वापरायचा तर चित्राची ‘त्वचा’ आपल्याला कळत नाही.

चित्रातला माणूस पाहताना आपण हा कोणत्या प्रकारचा माणूस असेल- स्त्रीलिंगी की पुंल्लिंगी, देशी की विदेशी, गरीब की श्रीमंत, यांसारखे तपशील कुणीही न शिकवता आपापल्या संस्कृतींतून ओळखत असतो. त्यामुळे सोनेरी चौकटीतल्या आणि तैलरंगांतल्या एखाद्या व्यक्तिचित्राकडे पाहताना उदाहरणार्थ, ‘सर नारायण चंदावरकर (१८५५-१९२३) यांचे व्यक्तिचित्र’ अशी माहिती न वाचतासुद्धा आपल्याला हे गेल्या शतकाच्या पूर्वार्धातले कोणीतरी हुशार आणि इंग्रजीवर प्रभुत्व असणारे, ब्रिटिशांकडून मानमरातब मिळवणारे वगैरे गृहस्थ असावेत एवढं आपणा मराठी माणसांना नुसतं वरवर/ लांबून पाहूनसुद्धा कळतं. आणखी बारकाईनं पाहणाऱ्यांना ते चित्र कोणत्या काळातलं आहे, चित्रकारानं ते रंगवताना स्वातंत्र्य घेतलं आहे की निव्वळ ऑर्डरप्रमाणे चित्र रंगवून दिलं आहे, हे रंगलेपनाकडे पाहिल्यानंतर कळेल. आता मुख्य विषयाकडे येऊ.

हेही वाचा >>> कलाकारण : एका केळियाने…

पराग सोनारघरे याच्या चित्रातही माणसंच आहेत. ती गरीब माणसं आहेत किंवा खेड्यात वाढलेली आणि चकाचक शहरात विजोड दिसणारी माणसं आहेत असं प्रथमदर्शनी वाटेल. ही माणसं रंगानं गोरी नाहीत, म्हणून त्यांना गरीब/ खेडवळ ठरवणाऱ्या संस्कृतीत परागच्या या चित्रांचे बहुतेक प्रेक्षक वाढलेले आहेत. पण पराग मात्र माणसांकडे निराळ्या दृष्टीनं पाहतो. केवळ ‘रंगचित्रकार’ म्हणून पाहतो. या मजकुरासह पराग सोनारघरेची दोनच चित्रं आहेत. त्यापैकी एकाही चित्रामध्ये संपूर्ण माणूस किंवा चेहरा दिसत नाही, हे उघडच आहे. पण याआधी परागनं ‘फुल फिगर’ म्हणतात तशी माणसांची चित्रं रंगवलेली आहेत. त्यांपैकी तीन चित्रं वस्त्रहीन पुरुषांची. ते तिघेही वयानं किमान साठीच्या पुढले. जराजर्जरतेच्या खुणा- सुरकुत्या- त्यांच्या अंगावर दिसताहेत. त्या चित्रांकडे निरखून पाहताना, सुरकुत्यांचा कमीअधिकपणा, पायांवरल्या भेगा यांचे त्रिमित आभास (डायमेन्शनॅलिटी) रंगवण्याकडे परागनं लक्ष केंद्रित केलेलं दिसतं. पण ते तेवढंच नाही. या माणसांचा वर्ण/ वर्ग याच्याशी परागला फारसं कर्तव्य नसूनसुद्धा तो अगदी त्यांचा होऊन त्यांची चित्रं रंगवतोय आणि या चित्रांकडे जरा वेळ थांबून, शांतपणे पाहताना आपल्यालाही आता या चित्रांमधली माणसं आपली वाटताहेत, असं प्रेक्षकाला वाटू लागतं. ते का वाटतं?

कारण पराग अक्षरश: त्या माणसांच्या त्वचेला, त्यामागच्या हाडामांसाला आपल्या डोळ्यांचा स्पर्श घडवतो! हा स्पर्श एकदा घडला की मग आपण त्या माणसांच्या त्वचेमध्ये संचार करू लागतो. हात पाहताना त्यावरचा एकेक केस, त्या केसांची उगमस्थानं, प्रत्येक केसाच्या अवतीभोवती जणू टेकड्यांसारखा पसरलेला सुरकुत्यांचा प्रदेश… या सगळ्यावरून आपली नजर संचार करू लागते. हा परागच्या चित्रांचा अनुभव आहे. तो देण्यासाठी अर्थातच, एकेका चित्रासाठी परागचे तीन तीन महिने खर्च झालेले आहेत.

हेही वाचा >>> कलाकारण : कुठून कुठे जाणार हे इस्रायली?

आज जे प्रेक्षक साधारण चाळिशीत वा त्यापुढले आहेत, त्यांनी चित्रपटांची किंवा नेत्यांची, हाती रंगवलेली प्रचंड मोठ्ठी पोस्टरं कधी ना कधी पाहिली असतील. त्यातले ते सपाट रंग, आकर्षकच वाटले पाहिजेत अशा हिशेबानं रंगवलेले ते गोरेगुलाबी चेहरे, विशेषत: गालफडांवरचा गुलाबीपणा हे सारं आपण पाहून सोडून दिलेलं असेल. त्याहीपेक्षा जे प्रेक्षक तरुण आहेत, त्यांच्यापैकी काहीजणांनी मुंबईच्या ससून गोदीत २०१७ साली पहिल्यांदा भरलेल्या ‘स्टार्ट’ या पब्लिक आर्ट (सार्वजनिक कला) महोत्सवात ऑस्ट्रेलियन चित्रकार गुइडो व्हान हेल्टेन याची चित्रं पाहिली असतील. त्यानंही इथं मुंबईच्याच कोळी- मच्छीमार- समाजातल्या तीन महिलांचे चेहरे भलेमोठे रेखाटले होते. फक्त काळ्या छटा वापरून ते रंगवले होते. हा गुइडोसुद्धा सुरकुत्या रंगवतो, पण त्यासाठी काळ्या छटांखेरीज काहीही वापरत नाही. त्यामुळे आपण ‘चित्र’ पाहतो आहोत किंवा रेखाटन पाहतो आहोत, हे गुइडोची चित्रं पाहताना सतत जाणवत राहातं. तुम्ही कोणत्याही वयाचे असाल, तरी अनेक छायाचित्रकारांनी आजवर टिपलेल्या सुरकुतीदार देहांची चित्रं तुम्हाला आठवत असतीलच. प्रेक्षक म्हणून घेता आलेल्या/ येणाऱ्या या सर्व अनुभवांपेक्षा पराग सोनारघरेची चित्रं पाहण्याचा अनुभव फारच निराळा ठरतो.

पराग सोनारघरेच्या चित्रांमध्ये मानवी देह असला, तरीसुद्धा ही चित्रं त्या विशिष्ट माणसांबद्दल काहीही सांगत नाहीत. सांगू इच्छित नाहीत. त्याऐवजी, प्रेक्षकानं या देहांकडे किंवा देहाच्या अंशांकडे पाहताना मानवी त्वचेचा विचार करावा, अशी या चित्रांची रचना आहे. गेली अनेक वर्षं पराग अशाच प्रकारे काम करतो. त्याची चित्रं दाखवणाऱ्या ‘गॅलरी अभय मस्कारा’ या कुलाब्याच्या एका पास्ता लेनमधल्या कलादालनाची अख्खी बाहेरची भिंतसुद्धा परागनं रंगवलीय, कोची बिएनालेमध्ये (२०१८ सालची खेप. विषयांतर : दर दोन वर्षांनी कोची इथं भरणारं हे महाप्रदर्शन आता २०२५ मध्ये भरणार आहे.) परागनं अगदी शहरातल्या – कुठलंही काही संरक्षण वगैरे नसलेल्या दोन मोठ्या भिंती रंगवल्या. अत्यंत बारीकसारीक तपशीलही या भिंतींवर परागनं रंगवले. या मजकुरासोबतच्या छायाचित्रांपैकी एक परागचं रंगकाम सुरू असतानाचं, तर दुसरं कोची शहरात, बिएनाले संपल्यानंतर या चित्राची भिंत तिथल्या लोकांच्या अंगवळणी पडल्यानंतरचं. याच मजकुरासह परागचं जे तिसरं चित्र आहे, ते मात्र ताजं- सध्या मुंबईत, त्याच मस्कारा गॅलरीत भरलेल्या प्रदर्शनात हे चित्र आहे. इथं दोन हातांचे अगदी जवळून पाहिलेले तपशील दिसताहेत. ते मानवी देहाचे भाग आहेत, हेसुद्धा चटकन कळणार नाही, असं हे दोन कॅनव्हास एकत्र जोडून केलेलं (डिप्टिक) चित्र.

या चित्रातून पराग आता मानवी देहाकडे, त्वचेकडे पाहण्याची वाट अमूर्ताकडे नेताना दिसतो. चित्रात दिसते ती त्वचा आहे हेही, परागची आधीची चित्रं माहीत असल्याशिवाय चटकन ओळखू येणार नाही. त्याहीपेक्षा, अमूर्तचित्र पाहाताना जो निव्वळ रेषा, आकार, घनता, अवकाश यांना पाहण्याचा आणि अनेकदा अ-वर्णनीयच ठरणारा अनुभव येतो, तसा अनुभव देणारी ही चित्रं आहेत.

अर्थातच परागला ‘व्यक्तिचित्रकार’ किंवा ‘अमूर्तचित्रकार’ यापैकी काहीही म्हणवून घ्यायला आवडणार नाही. पण माणसानं माणसाकडे अमूर्ताच्या पातळीवर कसं पाहावं, याचा एक धडा मात्र पराग सोनारघरेच्या कलाकृतींमुळे निश्चितपणे मिळू लागलेला आहे.

abhijit.tamhane @expressindia.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parag sonarghare artworks parag sonarghare paintings exhibition at the maskara gallery zws