नवी लोकसभा अस्तित्वात येऊन सहा महिने झाल्यानंतर सदस्यांचं आसनस्थान निश्चित झालं आहे. नव्या सदस्यांना मागच्या बाकांवर बसावं लागतं, जुन्या सदस्यांना पुढच्या रांगेत स्थान दिलं जातं. यावेळी जुन्या सदस्यांचं आसनस्थान बदललं आहे. विशेषत: विरोधी सदस्य विखुरले गेले आहेत असं दिसतंय. आसनस्थान आणि क्रमांक निश्चित होण्याआधी अखिलेश यादव शेवटच्या आठव्या ब्लॉकमध्ये पहिल्या रांगेत बसायचे, त्यांच्या शेजारी अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद बसायचे. ही जागा विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या शेजारी होती. इथून ‘सप’च्या नेत्यांना हलवण्यात आलं आहे, ते थेट सहाव्या ब्लॉकमध्ये गेलेत. त्यांना पुन्हा आठव्या ब्लॉकमध्ये आणण्याची विनंती काँग्रेसनं लोकसभाध्यक्षांना केली होती पण, आसनस्थानात बदल झालेला नाही. या ब्लॉकच्या दुसऱ्या रांगेत कणीमोळी आणि सुप्रिया सुळे बसत असत, त्यांना आता सातव्या ब्लॉकच्या दुसऱ्या रांगेत स्थान दिलं गेलंय. सुळेंच्या शेजारील स्थान ठाकरे गटाचे अरविंद सावत यांना दिलंय. आधी दोन्ही शिवसेनेचे सदस्य सहाव्या ब्लॉकमध्ये बसायचे. आता शिंदे गटाचे सदस्य सत्ताधाऱ्यांच्या अधिक जवळ गेलेले दिसतात. त्यांना भाजपच्या सदस्यांच्या शेजारी पाचव्या ब्लॉकमध्ये बसवण्यात आलं आहे. याच ब्लॉकमध्ये चिराग पासवान वगैरे मित्र पक्षांच्या सदस्यांना स्थान दिलं गेलंय. नितीशकुमार यांच्या जनता दल (सं)चे ललन सिंह, जीतन मांझी आदी तिसऱ्या ब्लॉकमध्ये बसतात. पहिल्या ब्लॉकमध्ये मोदी, राजनाथ, अमित शहा, नितीन गडकरी, दुसऱ्या ब्लॉकमध्ये शिवराज सिंह, मनोहरलाल खट्टर यांना स्थान मिळालेलं आहे. जुन्या लोकसभेत तृणमूल काँग्रेसचे खासदार सातव्या ब्लॉकमध्ये बसायचे. गटनेते सुदीप बंदोपाध्याय, कल्याण बॅनर्जी पहिल्या रांगेत दिसायचे. त्यांच्या मागे ‘गुगुल अंकल’ सौगत राय, महुआ मोईत्रा, त्यानंतर काकोली घोष दस्तीदार वगैरे खासदार एकामागून एक बसलेले असत. यावेळी सातव्या ब्लॉकच्या पहिल्या रांगेत काँग्रेसचे गौरव गोगोई आणि के. सुरेश आहेत. तर, अखिलेश यांच्या शेजारी बंदोपाध्याय. कल्याण बॅनर्जी, महुआ मोईत्रा आदी तृणमूल काँग्रेसच्या खासदारांना सहाव्या ब्लॉकमध्ये दुसऱ्या-तिसऱ्या रांगेत स्थान दिलेलं आहे. सर्वाधिक आक्रमक होणाऱ्या विरोधकांवर लोकसभाध्यक्षांची थेट नजर आहे असं दिसतंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : भारतातील मानसिक आरोग्याचे धोरण आणि कायदे

आणि ते अवाक झाले!

विरोधकांच्या बाजूने संविधानावरील चर्चा प्रियंका गांधी-वाड्रा सुरू करतील असं भाजपलाही वाटलं नसावं. प्रेक्षक कक्षामध्ये सोनिया गांधी, रॉबर्ट वाड्रा, मुलगा रिहान येऊन बसले होते. राजनाथ सिंह भाषण करत असताना प्रियंका खाली मान घालून काही तरी लिहिताना आणि वाचताना दिसत होत्या. तेव्हा प्रियंका बोलतील याचा अंदाज आला. त्यांचं हे लोकसभेतील पहिलंच भाषण. जाहीर सभेत भाषण देणं आणि संसदेत बोलणं यामध्ये दर्जात्मक फरक असतो. काही जणांना तो कळतही नाही हा भाग वेगळा. असे लोक फड जिंकायला एकटेच पुरेसे असतात! प्रियंका बोलायला उभ्या राहिल्यावर आता सत्ताधारी काय करतील असं वाटू लागलं होतं. राहुल गांधी वा महुआ मोईत्रा या विरोधी खासदारांची कोंडी करण्याची व्यूहरचना भाजपच्या सदस्यांनी तयार केलेली असते. संधी मिळताच ते आक्षेप घेऊन सभागृहात विरोधकांचा खोळंबा करून टाकतात. प्रियंकांवरही हीच वेळ येईल असं वाटू लागलं होतं. पण, झालं भलतंच. प्रियंकांनीच भाजपच्या सदस्यांची कोंडी करून टाकली. प्रियंका ३५ मिनिटे बोलल्या, त्यांच्या भाषणामध्ये फक्त एकदाच भाजपच्या सदस्याने आडकाठी केली. पण, त्याचाही फारसा परिणाम झाला नाही. प्रियंका गंभीर मुद्दा मांडत असताना भाजपपैकी कोणीतरी फिस्कन हसलं, त्यावर प्रियंकांनी त्याची लाज काढली. मग, तर सत्ताधारी कोशात गेल्यासारखे गप्प बसून राहिले. प्रियंका अत्यंत शांतपणे बोलल्या. अनेक मुद्दे भावनिक होते. त्यामुळं सभागृहातील वातावरण आपोआप नरमून गेलं. कोणी प्रियंकांना विरोध करण्याच्या मन:स्थितीत नव्हतं. प्रियंकांनी मोदींचा विषय काढला. नेहरू-गांधींवर बोलल्या. काँग्रेसच्या चुका अप्रत्यक्ष कबूल केल्या. संभलमधील १७-१८ वर्षांचा मुलगा अनाथ झाला, तो माझ्या मुलाच्या वयाचा होता, असं म्हणत कौटुंबिक-घरगुती गोष्टी कराव्यात तशा प्रियंका बोलल्यामुळं भाजपच्या सदस्यांना आक्षेपही घेता येईना. ‘जोर का झटका धिरे से लगे’, असं काहीसं झालं. सगळेच चिडीचूप. विरोधी सदस्यांच्या भाषणावेळी इतकी शांतता कधी पाहिली नव्हती. भाजप सदस्याने प्रियंकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. पण, राहुल गांधींनी इशारा केला की, त्या सदस्याकडं लक्ष देऊ नको, तू बोलत राहा… प्रियंकांनी लगेच आपलं भाषण पुन्हा सुरू केलं. प्रियंकांच्या भाषणावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पूर्णवेळ सभागृहात बसून होते. प्रियंकांच्या भाषणापुढं राजनाथ सिंहांचं भाषण फिकं पडलं हे मान्य करावं लागेल. प्रियंकांचं पहिलंच भाषण यशस्वी झाल्यामुळं काँग्रेसचे खासदार त्याचं अभिनंदन करण्यासाठी धावत होते. राहुल गांधींनी बहिणीला मिठी मारून कौतुक केलं. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांचं भाषण सुरू झालं तरी हे कोडकौतुक सुरू होतं.

हेही वाचा : नव्या सरकारी संसारात ‘नांदा सौख्यभरे’

अरे, का हुआँ

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त एकदा लोकसभेत आलेले दिसले. ते संसदेच्या आपल्या कार्यालयात असतात पण, सभागृहात येत नाहीत. संविधानावरील चर्चेमध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लोकसभेत बोलताना मोदींची आठवण काढली होती. संविधानावर इथे गंभीर चर्चा होत असताना मोदी कुठं आहेत, अशी विचारणा अखिलेश यांनी केली. त्यावर भाजपचे सदस्य काय बोलणार? मोदी तिकडं उत्तर प्रदेशात प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यात मग्न होते! प्रियंका गांधी-वाड्रा यांनीही आपल्या भाषणात मोदी इथं का नाहीत असं विचारलं होतं. ते कधीतरी दहा मिनिटं येतात आणि जातात, असं प्रियंका म्हणाल्या. मोदी बुधवारी लोकसभेत ११ मिनिटे येऊन गेले. लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास चालू होता. सर्व शांतपणे ऐकून घेत होते. भाजपच्या दिल्लीतील खासदाराने रेल्वेमंत्र्यांना प्रश्न केला की, डेहराडूनला जाणारी रेल्वे तुघलकाबादला का थांबत नाही? या खासदाराचा प्रश्न संपलादेखील नव्हता तेवढ्यात सभागृहात टाळ्यांचा गडगडाट झाला. कोणालाही कळलं नाही की टाळ्या नेमक्या कशासाठी वाजवल्या जात आहेत. बहुधा खासदाराला वाटलं असावं की, आपला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि सभागृहातील तमाम खासदारांना तो भावला असावा. हा खासदार अधिक उत्साहानं बोलू लागला. तेवढ्यात पंतप्रधान मोदी सभागृहात येताना दिसले. मग, उलगडा झाला की, मागच्या बाकांवरून होणारा टाळ्यांचा गजर मोदी आले म्हणून होता. मोदी आले तेव्हा समोर विरोधकांच्या बाकांवर ना राहुल गांधी होते, ना प्रियंका गांधी-वाड्रा. मोदी येण्याआधी दोघंही सभागृहाबाहेर गेले होते. कदाचित हीच वेळ साधून मोदी सभागृहात आले की काय माहीत नाही. मोदी बरोबर ११ मिनिटं सभागृहात बसले. ते होते तोपर्यंत भाजपच्या खासदारांच्या अंगात उत्साह संचारला होता. खासदार मोठ्या आवाजात प्रश्न विचारू लागले. तेवढ्यात समोरच्या दारातून प्रियंका गांधी आत येताना दिसल्या. त्या चौथ्या रांगेतील आपल्या बाकावर बसण्यासाठी गेल्या, तेवढ्यात मोदी उठले आणि भाजपच्या सदस्यांना नमस्कार करून बाहेर गेले. ते अजून बाहेर गेलेही नसतील तोपर्यंत मागून जोरात आवाज आला. अगदी अस्सल भोजपुरी स्टाइलमध्ये. अरे, का हुआँ…चल दिए…

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parliament winter session 2024 pm narendra modi and priyanka gandhi vadra speech in lok sabha on constitution css