‘एथिइस्ट सोसायटी ऑफ इंडिया’ची स्थापना विशाखापट्टणममध्ये करणारे जय गोपाल हे काही आंध्र प्रदेशातले पहिले इहवादी (नास्तिक) विचारवंत-कार्यकर्ते नव्हते… किंबहुना, गोपाराजु रामचंद्र राव ऊर्फ ‘गोरा’ यांनी १९४१ पासून जे अंधश्रद्धाविरोधी, निरीश्वरवादी कार्य आरंभले, त्याचे गोपाल हे अखेरचे साक्षीदार आणि त्या मुशीतून घडलेले ते अखेरचे कार्यकर्ते, असे म्हणता येईल. त्या अर्थाने, आंध्रातील नास्तिकता-चळवळीच्या इतिहासाचा महत्त्वाचा दुवा त्यांच्या निधनाने निखळला आहे.
हेही वाचा >>> व्यक्तिवेध: ए. रामचंद्रन
त्या इतिहासाचे मूळ पुरुष ‘गोरा’ हे गांधीवादी, पण सार्वजनिक जीवनात पूर्णत: बुद्धिनिष्ठ. त्यामुळे गांधी-आश्रमांच्या जाळ्यापासून फटकून त्यांनी विजयवाडा येथे ‘एथिइस्ट सेंटर’ सुरू केले होते. त्यानंतरच्या पिढीतले जय गोपाल यांचा जन्म नोव्हेंबर १९४७ मधला. वाचनाच्या आवडीमुळे वयाच्या १६ व्या वर्षापर्यंत ‘थिंकर्स लायब्ररी’तली अनेक विचारवंतांची पुस्तके त्यांनी वाचली, समजून घेतली. यापैकी प्रभाव पडला तो पेरियार आणि डॉ. आंबेडकर यांचा. त्यामुळेच स्वत:च्या सवर्ण कुटुंबाशी नाते तुटले आणि ऐन विशीत शिक्षकी पेशातले गोपाल स्वतंत्रपणे जगू लागले. समविचारी मिळत गेले आणि १३ फेब्रुवारी १९७२ रोजी ‘एथिइस्ट सोसायटी ऑफ इंडिया’ची स्थापना झाली . ही संस्था २०११ पासूनच तरुण मंडळी चालवत आहेत. संस्था राज्याबाहेरही जावी, यासाठी गोपाल यांनी प्रयत्न केले. त्यासाठी ठिकठिकाणी व्याख्याने दिली, यातून महाराष्ट्रासह आठ राज्यांत संपर्कजाळे निर्माण झाले. १९७४ पासून ‘एज ऑफ एथिइझम’ हे इंग्रजी, तर ‘नासिक युगम्’ हे तेलुगु नियतकालिक त्यांनी संस्थेतर्फे सुरू केले. तेलुगु मासिक २०११ पर्यंत स्वत: संपादितही केले, पण इंग्रजी ‘एज’ १९७६ मध्येच बंद करावे लागले. सात इंग्रजी आणि २८ तेलुगु पुस्तके त्यांनी लिहिली आणि इतर विद्वानांची आठ पुस्तके संस्थेतर्फे प्रकाशित केली. ‘द मिझरी ऑफ इस्लाम’ हे इस्लाममधील कुप्रथांचा समाचार घेणारे पुस्तक यापैकी महत्त्वाचे. पुढे फ्रिट्झ एरिक होवेल्स यांनी त्याचे जर्मन भाषांतरही केले आणि त्यावरून पोलिश भाषेतही हे पुस्तक गेले! इंग्रजी पुस्तकाला अरब देशांतल्या विवेकवादींकडून प्रतिसाद मिळत राहिला आणि या पुस्तकाच्या एका आवृत्तीला ‘व्हाय आय ॲम नॉट अ मुस्लीम’चे लेखक इब्न वराक यांनी प्रस्तावना लिहिली. भारतात बौद्ध- जैन मतांचा प्रसार झाल्यावर प्रतिक्रांतीच झाली, या मताचे ते पुरस्कर्ते होते पण रशियात २०११ मध्ये भगवद्गीतेवर बंदी आली, तेव्हा “गीता ही भारतीय राज्यघटनेशी विपरीतच असली, तरी तिच्या छापील प्रतींवर बंदी घालणे हे लोकशाहीविरोधी आणि प्रतिगामीच” – असा स्पष्ट विरोध त्यांनी केला होता!