‘व्रतस्थ’ हा शब्द आजकाल दुर्मीळ झाला आहे. गोव्याचे रामकृष्णबाब नायक हे अशा दुर्मीळ प्रजातीतले एक होते. वडील केशव नायक यांच्याकडून सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा वसा त्यांना मिळाला, तो त्यांनी चार्टर्ड अकौंटंट झाल्यावरही निष्ठापूर्वक जपला. मुंबईत आल्यावर ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ या प्रामुख्याने मराठी गोंयकारांच्या संस्थेशी त्यांचा निकटचा संबंध आला. १९५४ साली त्यांनी या संस्थेचा कला विभाग सुरू करण्यात पुढाकार घेतला. भिकू पै आंगले, प्रफुल्ला डहाणूकर, दामू केंकरे, आनंद पै आदींच्या साथीने त्यांनी या विभागाची स्थापना केली.
हेही वाचा >>> व्यक्तीवेध : न्या. प्रसन्ना बी. वराळे
या संस्थेतर्फे बसवलेल्या पहिल्याच ‘खडाष्टक’ या नाटकाने महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला. त्यानंतर ‘संगीत संशयकल्लोळ’, ‘सं. शारदा’ आदी नाटकांसह तब्बल चार वर्षे या स्पर्धेत पारितोषिके मिळवून, ‘गोवा हिंदू’ने व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले आणि ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘सं. मत्स्यगंधा’, ‘लेकुरे उदंड जाली’, ‘नटसम्राट’, ‘बॅरिस्टर’, ‘संध्याछाया’, ‘सूर्याची पिल्ले’, ‘सं. शाकुंतलम्’ अशी सरस नाटके सादर केली. अनेक बिनीचे नाटककार, दिग्दर्शक, नेपथ्यकार, संगीत दिग्दर्शक व कलावंत या संस्थेने दिले. वि. वा. शिरवाडकरांच्या ‘नटसम्राट’मधील आप्पासाहेब बेलवलकरांच्या ‘कुणी घर देता का घर?’ ने ज्येष्ठ नागरिकांची व्यथा नायकांच्या हृदयाला भिडली आणि १९८२ पासून त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘स्नेहमंदिर’ या संस्थेची उभारणी हाती घेतली. ‘स्नेहमंदिर’ची पायाभरणीही त्यांनी तात्यासाहेब शिरवाडकरांच्या हस्तेच केली.
हेही वाचा >>> व्यक्तिवेध: फारुख इंजिनीयर
‘आयएनटी’चे दामूभाई जव्हेरी, ‘आविष्कार’चे अरुण काकडे आणि ‘गोवा हिंदू’चे रामकृष्ण नायक यांना खरे तर कलोपासक म्हणणे उचित ठरेल. या तिघांनीही निरपेक्षपणे आणि व्रतस्थपणे रंगभूमीसाठी आपले तन-मन-धन अर्पण केले, असे विजय केंकरे म्हणतात ते काही खोटे नाही. निवृत्तीपश्चात जरी रामकृष्णबाब गोव्यात गेले तरी ते दर महिन्यातले काही दिवस मुंबई असत. ‘स्नेहमंदिर’बरोबरच गोमंत विद्या निकेतन, गोवा मराठी विज्ञान परिषद या संस्थांच्या उभारणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. गोव्यात गरीब मुलांचे शिक्षण, परिचारिका प्रशिक्षण असे उपक्रम त्यांनी राबवले. ‘स्नेहमंदिर’च्या तिशीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘स्थळ : स्नेहमंदिर’ हे तिथल्या रहिवाशांच्या अनुभवांवर आधारित नाटक अभिराम भडकमकर यांच्याकडून लिहून घेऊन, विजय केंकरे यांच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी रंगमंचावर आणले. पुढे नाट्यक्षेत्रातील राजकारण ‘गोवा हिंदू’च्या शिस्तीत बसत नसल्याने या संस्थेची नाट्यनिर्मिती बंद झाली. ज्या ‘स्नेहमंदिर’साठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. एका व्रतस्थ योग्याची ही गाथा संवेदनशील मनांना प्रदीर्घ काळ स्मरणात राहील.