‘रहें ना रहें हम, महका करेंगे’ हे लता मंगेशकर यांचे गाणे ज्या वर्षी ‘बिनाका गीतमाले’त तिसाव्या क्रमांकावर होते, त्या १९६६ सालात ‘तितली उडी, उड जो चली..’ हे शारदा यांनी गायलेले गाणे एकविसाव्या क्रमांकावर होते.. गीतमालेतले सर्वोच्च गाणे त्या वर्षी मोहम्मद रफींचे ‘बहारों फूल बरसाओ’ ठरले, पण त्याच वर्षीच्या ‘फिल्मफेअर’ पुरस्कारांमध्ये ‘बहारों..’च्या तोडीस तोड मते ‘तितली उडी..’ला मिळाली आणि त्या वर्षीपासून, ‘सर्वोत्कृष्ट एकल गायन’ हा पुरस्कार अखेर गायक आणि गायिका असा विभागला गेला! गीता दत्त, सुमन कल्याणपूर यांसारख्या अनेकानेक गायिकांना ज्या काळात जणू ‘महालक्ष्मीची’ वक्रदृष्टी सहन करावी लागत होती, अशा काळात हिंदीतल्या महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये गाण्याची संधी मिळवणाऱ्या आणि अखेपर्यंत हिंदी चित्रपटगीतांच्या सुवर्णकाळावर प्रेम करणाऱ्या शारदा बुधवारी, १४ जून रोजी मुंबईत निवर्तल्या.

‘दुनिया की सैर कर लो..’मधला त्यांचा आवाज अनेकांना अभारतीय वाटला असेल.. किंवा आणखी काही कारणे असतील, पण हे गाणे शारदा यांच्या आवाजासह नेमके आठवते. खेळाडूसारखा उत्साह त्यांच्या गळय़ात होता. त्यामुळेही असेल पण पुढल्या काळात अनेक कॅबरे-गीते त्यांच्या वाटय़ाला आली. त्याहीपैकी एका गाण्यावर त्यांनी १९७०चा फिल्मफेअर (‘सर्वोत्कृष्ट एकल गायन- गायिका’ हा त्यांच्यामुळेच सुरू झालेला) पुरस्कार मिळवलाच. हा चटकन टिपेला जाऊ शकणारा आणि तिथेच राहणारा आवाज किमान १५ वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत गुंजत राहिला होता, शंकर-जयकिशनसारख्या संगीतकारांसह काम करत होता! पती सौंदरराजन यांच्या नोकरीमुळे क्रांतिपूर्व इराणात- तेहरानमध्ये राहणाऱ्या या गाननिपुण गृहिणीला राज कपूर यांच्या स्वागतासाठी तिथेच झालेल्या सोहळय़ात गाण्याची संधी मिळाली आणि मग ‘राज कपूर यांनी सांगितलेय, मुंबईला ये- मी जाणारच’ अशा हट्टापायी त्यांनी आवाजाची चाचणी दिली.

तोवर त्यांच्या आवडत्या गायिका होत्या नूरजहाँ, अमीरबाई कर्नाटकी, जोहराबाई अंबालावली, उमादेवी.. तिथून थेट ‘दुनिया की सैर’ त्यांच्या आवाजात आणण्याची किमया शंकर-जयकिशन यांची. शारदा यांचा खेळकर, काहीसा उच्छृंखल पण उत्साही आवाज दु:खी गाणी गाताना केवळ उदासच नव्हे तर गूढसुद्धा वाटे. ‘जब भी ये दिल उदास होता है..’ या गाण्यात हाच गूढपणा आहे. पण या आवाजाचा पुरेपूर वापर शंकर-जयकिशन यांनीच (टोपणनावाने) संगीत दिलेल्या ‘ती मी नव्हेच’ या मराठी चित्रपटात झाला.. कसा? हे अनुभवण्यासाठी ‘हिव्र्या हिव्र्या रंगाची झाडी घनदाट..’ हे त्यातील गाणे पुन्हा ऐकावेच.. ‘रंगा’तला ‘गा’ ऐकताना खंडाळय़ाच्या घाटातसुद्धा गोव्याचे आवाजच आठवतील. चंचल चालीतून आवाजाच्या खेळाला इतका वाव हिंदीतल्या ‘तितली उडी’मध्येही होता. मिर्झा गालिब यांच्या गजलांना स्वत चाली देऊन त्या गायल्याने संगीतकार म्हणूनही त्यांची ओळख उरली आहे.  तमिळनाडूत १९३३ मध्ये जन्मलेली अय्यंगार मुलगी किशोरवयात पहिले हिंदी गाणे ऐकते आणि पुढे गायिका होते,  या स्वत:च्या स्वप्नवत प्रवासावर त्या समाधानी होत्या. अखेरच्या दिवसांत मात्र त्यांना कर्करोगाने घेरले होते.