‘चार्ली चॅप्लिनच्या चौथ्या पत्नीची तिसरी मुलगी..’ किंवा  ‘चार्ली चॅप्लिनच्या एकंदर ११ अपत्यांपैकी शेवटून तिसरी’ ही ओळख प्रयत्नपूर्वक पुसून टाकण्याचा प्रयत्न तिने अगदी आयुष्यभर केला असेल; पण जगभरच्या अनेक वृत्तपत्रांनी तिची निधनवार्ताही ‘चार्ली चॅप्लिनची मुलगी’ अशीच दिली आहे. तिचा प्रयत्न प्रामाणिक असला तरी तिचे डोळे- नाक- जिवणी यांची ठेवण तिला कशी बदलता येणार होती? किंवा तिची अभिनयाची आवड तरी तिला कशी टाळता येणार होती?

अभिनय म्हणजे काहीतरी वेगळे किंवा विशेष काम, हे तिला लहानपणी तर माहीतच नव्हते. वयाच्या तिसऱ्या वर्षी चार्ली चॅप्लिनच्या ‘लाइमलाइट’ या (१९५२ सालच्या) चित्रपटात ती दिसली, तेव्हा ती तर खेळत होती फक्त. मग १८ वर्षांची झाल्यावर मार्लन ब्रॅण्डो आणि सोफिया लॉरेनच्या प्रमुख भूमिका (आणि चार्ली यांचेच दिग्दर्शन) असलेल्या ‘अ काउंटेस फ्रॉम हाँगकाँग’मध्ये जोसेफीनला छोटेखानी भूमिका मिळाली. पण बाविशीत मात्र तिने स्वतंत्रपणे लहानमोठय़ा भूमिका स्वीकारणे सुरू केले, तोवर चार्ली यांना कारकीर्द गौरवाचे विशेष ‘ऑस्कर’ मिळाले होते पण त्यांची नवनिर्मिती जवळपास थांबलीच होती. ‘एस्केप टु द सन’ या, रशियाच्या वेडय़ा आकर्षणापायी तेथे जाऊ इच्छिणाऱ्या तरुणांची कथा असलेल्या चित्रपटात तिचे अभिनयगुण पहिल्यांदा दिसले. त्याच वर्षी ‘कँटरबरी टेल्स’ या मध्ययुगीन इंग्लंडमध्ये घडणाऱ्या कथापटातही तिने सहभूमिका केली. मात्र तिला जणू मार्ग सापडला तो ‘ल ओडय़ूर द फॉव’ या चित्रपटातील मुख्य भूमिकेतून! हा चित्रपट अर्थातच फ्रेंच. पुढे तिने फ्रेंच चित्रपटच अधिक केले. ही भाषा तिला अनेक वर्षांपासून अवगत होती. ‘नुइ रूज’ हा फ्रेंच चित्रपट तर ‘द श्ॉडोमॅन’ या नावाने इंग्रजीतही प्रदर्शित झाला आणि दोन्हीमध्ये अर्थातच तिची मुख्य स्त्रीभूमिका होती. मात्र पुढला फ्रेंच चित्रपटही गुन्हेगारी, थरार अशाच स्वरूपाचा मिळाला आणि तोही तिने स्वीकारला, त्यामुळे कदाचित तिच्यावर फ्रेंच प्रेक्षकांनी, ‘थरारपटांची नायिका’ असा शिक्काच मारून टाकला असले. पण किमान इथे तिला अमक्याची मुलगी या शिक्क्यापासून थोडे तरी दूर जाता येणार होते.

शक्य तितक्या दूर ती गेली. अमेरिकेत परत न येता कॅनडात गेली आणि तिथल्या फ्रेंच चित्रपटांत किंवा चित्रवाणी मालिकांमध्ये कामे करू लागली. यापैकी सर्वात लक्षणी ठरली ती १९८४ साली अर्नेस्ट हेमिंग्वेबद्दलच्या ‘द बे बॉय’ या मालिकेतील तिने साकारलेली, हेमिंग्वेच्या पहिल्या पत्नीची (हेडली रिचर्डसन हिची) भूमिका. अगदी १९९५ पर्यंत तिने लहानमोठय़ा भूमिका स्वीकारल्या. नंतर मात्र निवृत्ती पत्करली. फ्रान्स, कॅनडा ते पुन्हा अमेरिका या प्रवासात तिचे   एकापाठोपाठ दोन संसार झाले, तीन मुलेही झाली. मरणाने जोसेफीनला तीन भाऊ आणि चार बहिणी यांच्या आधी गाठले. या भावंडांपैकी तिघे चित्रपट क्षेत्रात होते. नोबेल पारितोषिकाचे मानकरी नाटककार युजीन ओनील हे या भावंडांचे आजोबा- आईचे वडील. त्यामुळे चार्ली नसते, तरी ‘युजीन ओनीलची नात’ असा शिक्का तिच्यावर जगाने मारलाच असता!

Story img Loader