उद्यमी, श्रीमंत कुटुंबात जन्माला येऊनही त्या उद्योगपसाऱ्यातून बाहेर पडून स्वतःची स्वतंत्र ओळख आणि स्वतंत्र साम्राज्य उभ्या करणाऱ्यांमध्ये नथानियल चार्ल्स ‘जेकब’ रोथशील्ड यांचे नाव आदराने घ्यावे लागेल. मूळ जर्मन आणि नंतर ब्रिटनमध्ये स्थिरावलेले आणि विस्तारलेले रोथशील्ड हे बँकिंग आणि वित्त व्यवसायात युरोपमधील अग्रणी घराणे. जर्मनीच्या फ्रँकफर्टमधील एका यहुदी वस्तीतील नाणेव्यापारी मायर आमशेल रोथशील्ड याने त्याच्या चार पुत्रांना १९व्या शतकाच्या सुरुवातीस व्हिएन्ना, पॅरिस, नेपल्स आणि लंडन येथे पाठवले. त्यांपैकी लंडन येथे आलेल्या नेथन रोथशील्ड यांनी घराण्याच्या नावे बँक सुरू केली. ती वाढवली. त्या काळात रोथशील्ड बँक जगातील सर्वांत मोठी होती आणि नेथन रोथशील्ड यांच्या संपत्तीची तुलना आजच्या काळातील बिल गेट्स यांच्या संपत्तीशी होऊ शकते असा उल्लेख आढळतो. युरोपातील जवळपास सर्व राजघराणी, अमीर-उमराव, सेनानी यांच्याशी उत्तम संबंध प्रस्थापित करून रोथशील्ड यांनी त्यांचे बँकिंग आणि वित्तीय साम्राज्य वाढवले. जेकब रोथशील्ड यांनी प्राथमिक आणि उच्च शिक्षणानंतर (अतिश्रीमंत कुटुंबातील अपत्यांप्रमाणे इटन ते ऑक्सफर्ड अशा प्रवासानंतर) कौटुंबिक बँकिंग व्यवसायात १९६३मध्ये प्रवेश केला.
हेही वाचा >>> व्यक्तिवेध : रविचंद्रन अश्विन
त्यावेळी म्हणजे १९६०च्या दशकात ब्रिटनमधील उच्च वित्त क्षेत्र बंदिस्त स्वरूपाचे होते. अमेरिकेतील धाडसी आणि अवाढव्य भांडवलउभारणीचे मार्ग फारसे चोखाळले जात नव्हते. हे बदलले पाहिजे असे जेकब रोथशील्ड यांना वाटू लागले. जागतिक अर्थकारण, राजकारण, युद्धकारणातले ब्रिटनचे महत्त्व घटू लागले होते. या प्रवासात ब्रिटिश राजघराणे आणि सरकारला अनेक प्रसंगांमध्ये वित्तपुरवठा करणारी (उदा. नेपोलियनविरुद्ध युद्ध, सुएझ कालव्यातील भागभांडवल खरेदी) रोथशील्ड बँकही बदलत्या परिस्थितीनुरूप नवोन्मेषी बनायला हवी, असे जेकब यांचे म्हणणे होते. यासाठी अमेरिकेतील एस. जी. वॉरबर्ग बँकेबरोबर विलीन होण्याचा प्रस्ताव त्यांनी कुटुंबियांसमोर मांडला. जो तीव्रतेने धिक्कारण्यात आला. त्यामुळे जेकब रोथशील्ड यांनी बँकेत रुजू झाल्यानंतर दोनच वर्षांनी म्हणजे १९६५मध्ये स्वतंत्र होण्याचा निर्णय घेतला. रोथशील्ड यांची ओळख केवळ एक बँकचालक म्हणून सीमित राहिली नाही. चित्रसंग्राहक आणि लोकहितकर्ता म्हणूनही ते परिचित होते. इस्रायलमधील अनेक प्रकल्पांचे ते आश्रयदाते होते. इस्रायलचे कायदेमंडळ, सर्वोच्च न्यायालय, नॅशनल लायब्ररी या इमारती त्यांच्याच मदतीने उभ्या राहिल्या. परंतु मदतकर्त्याचे नाव गोपनीय राहील, याची काळजी त्यांनी अनेक वर्षे घेतली. ब्रिटनमधील अनेक जुन्या वास्तूंचा, प्रासादांचा जीर्णोद्धार व जतन हा त्यांचा आणखी एक आवडीचा उद्योग. या वास्तूंमध्ये त्यांच्या संग्रहातील काही हजार चित्रे व कलावस्तू मांडण्यात आल्या आहेत. रुपर्ट मरडॉक, पुतीन-विरोधक मिखाइल खोदोर्कोवस्की यांच्याबरोबरही त्यांनी व्यवहार केले, जे वादग्रस्त ठरले. परंतु बँकिंग आणि दातृत्व या क्षेत्रांमध्ये त्यांनी उमटवलेला ठसा, त्यांच्या मृत्यूनंतरही सहज मिटण्यासारखा नाही.