स्वेन गोरान एरिकसन यांच्यापेक्षा महान आणि बहुपैलू प्रशिक्षक फुटबॉलमध्ये कित्येक होऊन गेलेत. स्वेन उत्तम प्रशिक्षक होते, तरी त्यांची गणना या खेळातील महानतम प्रशिक्षकांमध्ये होत नाही. पण एका बाबतीत त्यांने एकमेवाद्वितीयत्व कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. इंग्लंडच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचे ते पहिले बिगर-इंग्लिश प्रशिक्षक होते. ही अत्यंत आव्हानात्मक आणि व्यामिश्र जबाबदारी होती. ती उचलण्यासाठी इंग्लंड किंवा अगदी ब्रिटनबाहेरील एखाद्या व्यक्तीचा शोध घ्यावा लागणे हीच बातमी होती. स्वेन गोरान एरिकसन या स्वीडनच्या व्यक्तीने ती जबाबदारी उचलली तेव्हा इंग्लिश फुटबॉल संघाला यश मिळवून देण्यापेक्षाही मोठे आव्हान होते, इंग्लिश फुटबॉलप्रेमींच्या आभाळभर अपेक्षा पूर्ण करण्याचे! इंग्लिश फुटबॉलप्रेमी म्हणजे पृथ्वीतलावरील अजब रसायन. इंग्लंडचा फुटबॉल संघ हा मैदानावर केवळ जिंकण्यासाठीच खेळला पाहिजे अशी यांची ठाम समजूत आणि अपेक्षा. भारतीय क्रिकेट संघाविषयी भारतीय क्रिकेटप्रेमींची असते, तशीच. बरे, संघाची कामगिरी सुमार झाली की अपयशाचे खापर खेळाडूंपेक्षा प्रशिक्षकाच्या माथीच अधिक फोडले जाते. या असल्या व्यवस्थेत नशीब आजमावण्याचे धाडस स्वेन गोरान एरिकसन यांनी दाखवले.

हेही वाचा : व्यक्तिवेध: जनरल (नि.) एस. पद्मानाभन

त्यांची कामगिरी वाईट नव्हती. जानेवारी २००१ ते जुलै २००६ दरम्यान ते इंग्लंडचे प्रशिक्षक होते. या काळात इंग्लंडने विश्वचषक २००२ आणि २००६, तसेच युरो २००४ या स्पर्धांमध्ये उपान्त्यपूर्व फेरी गाठली. इतक्या सातत्याने इंग्लिश संघ त्याआधी चमकत नव्हता. मात्र, एरिकसन यांच्या हाताखाली त्या इंग्लिश संघातून डेव्हिड बेकहॅम, स्टीव्हन जेरार्ड, पॉल स्कोल्स, फ्रँक लॅम्पार्ड, रिओ फर्डिनांड, जॉन टेरी असे उत्तम फुटबॉलपटू खेळले. त्यांची एकत्रित गुणवत्ता पाहता, एरिकसन यांनी आणखी काही तरी भव्यदिव्य जिंकून दाखवायला हवे होते, ही अपेक्षा अस्थानी ठरत नाही. तरीदेखील या ‘सुवर्ण पिढी’ला एका संघात सामावून त्यानुसार व्यूहरचना आखणे हे स्वतंत्र आव्हान होते. इंग्लिश फुटबॉलप्रेमींनी किंवा माध्यमांनी या आव्हानाकडे फारसे लक्ष दिलेले दिसत नाही. या समूहातील प्रत्येक फुटबॉलपटू स्वतंत्र प्रतिभेचा आणि वलयांकित होता. त्यांच्यात क्लबकडून खेळण्याची मानसिकता मुरलेली असते. पण राष्ट्रीय संघात एकत्र खेळणे फारसे मानवणारे नसते. एरिकसन यांच्या इंग्लिश संघाच्या प्रशिक्षकपदाचे मूल्यमापन या संदर्भात केले पाहिजे. टॅब्लॉइड इंग्लिश माध्यमांनी त्यांच्या खासगी जीवनातील भानगडी चव्हाट्यावर आणल्या. इंग्लंडचे प्रशिक्षक म्हणून करार संपण्याच्या दोन वर्षे आधीच त्यांनी राजीनामा दिला. तरी त्याबद्दल कटुता बाळगली नाही. क्लब स्तरावर त्यांची कामगिरी अधिक यशस्वी ठरली. इटलीच्या लाझिओ क्लबला युरोपियन अजिंक्यपद मिळवून दिले. इटली, पोर्तुगाल, इंग्लंडमधील १२ क्लबचे ते प्रशिक्षक होते आणि १८ अजिंक्यपदे या क्लबांच्या नावे नोंदवली गेली. एरिकसन यांचे नुकतेच निधन झाले.