तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना रूढार्थाने साहित्यिक संबोधले जात नसले, तरी साहित्याच्या लेख, मुलाखती, भाषणे, पत्रे, प्रबंध, चरित्र, मुलाखती, प्रस्तावना, परीक्षणे, भाषांतर, संपादन, कोशनिर्मिती इ. प्रांतांतील त्यांची मुशाफिरी त्यांना साहित्यिक ठरविण्यास पुरेशी नि पात्र आहे. त्यांची साहित्यातील रूढ ओळख ही विचारवंत, तत्त्वचिंतक, वेदान्ती, संस्कृती व धर्मचिकित्सक अशी आहे नि ती रूढ साहित्यिक पदाच्या वरची श्रेणी मानली जाते. अस्तित्व, ज्ञान, मूल्य, विवेक बुद्धिप्रामाण्य, मानसशास्त्र (विविध ज्ञानशाखा) इत्यादींचा मूलभूत विचार तत्त्वज्ञानात होतो. तत्त्वज्ञान तात्त्विक घटकांची मांडणी करते. जीवनाच्या मूलभूत प्रश्नांचा विचार व चर्चा हे तत्त्वज्ञानाचे क्षेत्र आणि कार्य होय. हे कार्य तर्कतीर्थांनी आपल्या लेखनातून केले असल्यामुळे ते तात्त्विक साहित्यिक म्हणून सिद्ध होतात. वैचारिक लेखन बऱ्याचदा ‘लेख’रूपात केले जाते. तर्कतीर्थांनी लिहिलेल्या लेखांची अधिकृत जंत्री नसली, तरी प्राप्त सुमारे अडीचशे लेख लक्षात घेता, ते लेख सुमारे दोन हजार पृष्ठे व्यापतात. हे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मयातील तीन लेखसंग्रह खंडांवर नुसती दृष्टी फिरवली तरी लक्षात येते. तत्त्वज्ञान, राजकीय, सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक या क्षेत्रांतील विषयांचे वैविध्य त्यांत आहेच; पण लेखांचे स्वरूपही भिन्न आहे. म्हणजे असे की, त्यात शोधनिबंध, विविध लिखित परिसंवादातील मतसंग्रह, व्यक्तिलेख, आत्मपर लेख, प्रवासवर्णन, भाषांतरित लेख, परिषद वृत्तांत असे वैविध्य आढळते. हे वैविध्य त्यांना अष्टपैलू साहित्यिक ठरविण्यास पुरे आहे. अशा लेखांचा प्रातिनिधिक आस्वाद या सप्ताहातील सदर स्तंभातील काही भागांत घेऊन त्यांची वानगी अनुभवू.
यात भारतीय तत्त्वज्ञानातील गुणसंकल्पना, कारणमीमांसा यांसारख्या विषयावर आधारित जसे लेख आहेत, तसेच पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील मार्क्सवादावरही आहेत. राजकीय पक्ष, व्यक्तींचा तुलनात्मक अभ्यास, हे तर्कतीर्थांच्या लेखांचे आपले असे वैशिष्ट्य आहे. काँग्रेस, समाजवादी, हिंदुत्ववादी पक्ष, मुस्लीम लीग, कम्युनिस्ट अशा सर्वांचा त्यांचा अभ्यास दिसतो. मार्क्सवादाचा त्यांनी सर्वांगीण अभ्यास मानवेंद्रनाथ रॉय यांच्या सहवास, साहचर्य नि प्रभावाने केला; तसाच महात्मा गांधींच्या निकट संपर्क नि संबंधामुळे गांधीवादाचाही. भारतीय लोकशाहीसंबंधीचे त्यांचे चिंतन, आंतरराष्ट्रीय राजकारणासंबंधीचे वाचन, प्रवास, भेटी इत्यादींतून ते सक्रिय कार्यकर्ते होते. त्यातील हार आणि प्रहार दोन्ही त्यांनी अनुभवले; पण कटुता ठेवली नाही. आपल्या मतभेद नि मतांतरास त्यांनी कधी वैररूपात आणले नाही. ‘गंगा गये गंगादास, जमुना गये जमुनादास’ असे त्यांचे पाण्यासारखे समायोजित व स्थितिस्थापक व्यक्तिमत्त्व होते. कोणी त्यास विचारविकारी मानील; पण ते विचारविवेकी होते. मतांतरात स्वार्थापेक्षा पारदर्शिता अधिक होती. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित नेहरू, राजेंद्र प्रसाद, जयप्रकाश नारायण, मानवेंद्रनाथ रॉय अशा कितीतरी व्यक्तींचे दर्शन, विचार, संपर्क यांतून तर्कतीर्थांचे व्यक्तिमत्त्व भारावलेले दिसते; पण यात त्यांनी कधी अंधानुकरण, अंधश्रद्धा जोपासली नाही वा भक्तिभावही.
शिक्षण, साहित्य, संस्कृती ही बौद्धिक संपन्नता वाढणारी तत्त्वे असल्याने त्यांचा मनुष्य, समाज, राज्य, राष्ट्र, विश्व असा चढता आलेख त्यांच्या उदारमतवादी व वैश्विक जाणिवांची परिणती असते. भाषा ही ज्ञानवाहक हवी. साहित्य जीवनासाठी हवे. संस्कृती समाजार्थ हवी; पण हे सर्व मानवी असण्यावर त्यांचा भर लेखांमधून दिसून येतो. आस्वादक समीक्षेचे ते समर्थक आहेत. पुराणपंथी विचार मागे टाकण्यावर त्यांचा भर आहे. सारे सांस्कृतिक जीवन स्वातंत्र्य, बंधुता, समता, समाजवाद, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा, अहिंसा, सहिष्णुता, समन्वय इत्यादी गुणांचा, तत्त्वांचा आणि मूल्यांचा परिपोष करणारे हवे, अशी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची धारणा राष्ट्रवाद, मार्क्सवाद, रॉयवाद, गांधीवाद अशा वाटेने निरंतर व्यापकतेकडे जाणारी आहे. त्यामुळे ज्या वेळी ते ज्या विचारधारेचे होते, तिच्याशी एकनिष्ठता त्यांना बहिष्कार, निषेध, अवमान, चिखलफेक इ. झाले तरी विचलित करू शकली नाही.
– डॉ. सुनीलकुमार लवटे
drsklawate@gmail.com