पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशियाभेटीकडे बाह्यजगताचे आणि त्यातही रशियाविरोधी अमेरिकाप्रणीत आघाडीचे बारीक लक्ष लागलेले होते. भेटीस प्रारंभ झाला त्या दिवशीच म्हणजे सोमवारी रशियाच्या ४० क्षेपणास्त्रांचा वर्षाव युक्रेनवर झाला. यात प्राधान्याने राजधानी कीएव्हला लक्ष्य करण्यात आले. एका क्षेपणास्त्राने युक्रेनमधील सर्वांत मोठ्या बालरोग रुग्णालयाचा वेध घेतला. यात दोन मुलांचा मृत्यू झाला असून, अनेक मुले जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये ३८ नागरिक मृत्युमुखी पडले, त्यांतील २७ एकट्या कीएव्हमध्ये मारले गेले. युद्ध सुरू झाल्यानंतरचे काही महिने वगळल्यास युक्रेनच्या राजधानीवरील हा सर्वांत भीषण हल्ला ठरला. मोदी यांच्या रशियाभेटीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारपासून वॉशिंग्टनमध्ये उत्तर अटलांटिक करार संघटनेची (नेटो) परिषद सुरू होत असून, तिच्या कार्यक्रमपत्रिकेत युक्रेन हाच विषय आहे. ती परिषद आणि पंतप्रधानांची रशियाभेट या बाबी किमान काही महिने आधी नियोजित तरी होत्या. पण युक्रेनवरील हल्ल्यांबाबत तसे म्हणता येणार नाही. युक्रेनवर क्षेपणास्त्र वर्षावाबाबत असे काही नियोजन वगैरे असू शकत नाही. युक्रेनच्या राजधानीला लक्ष्य करण्याबाबत आणि त्या देशावर चाळीसेक क्षेपणास्त्रे डागण्याबाबत पूर्वकल्पना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना देण्यात आली असणारच. मोदी रशियात येताहेत हेही त्यांना ठाऊक होते. तरीही मोदींच्या भेटीवेळीच अशा प्रकारे रक्तपात घडवून आणून पुतिन यांनी त्यांच्या घनिष्ठ मित्राची पंचाईत केली खास! कारण अमेरिका आणि मित्रदेश मोदींकडे ‘या युद्धखोर’ मित्राच्या भेटीला तुम्ही या काळात जाताच कसे, अशी अप्रत्यक्ष विचारणा करू शकतात. भारत आणि रशिया यांची मैत्री इतकी दृढ आहे, तर रशियाला किमान हल्ल्यांची तीव्रता कमी करण्याविषयी भारत का सुचवू शकत नाही, असा प्रश्न काही विश्लेषक उपस्थित करतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा