नाही… नाही… ही नकळत झालेली चूक नाहीच. हा तर गुन्हाच. तोही गंभीर. त्यामुळे प्रफुल्लभाई यातून तुम्हाला माफी नाहीच. तमाम मराठी जनतेच्या अस्मितेचे प्रतीक असलेला जिरेटोप म्हणजे दांडियात वाटली जाणारी टोपी वाटली की काय तुम्हाला? भलेही तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला जाऊन तुमच्यावर असलेल्या गंभीर गुन्ह्यांतून स्वत:ची सुटका करून घेतली असेल, पण प्रत्येक मराठी माणसाने त्याच्या मनात नोंदवलेल्या या गुन्ह्यातून तुमची सुटका नाही. सत्ताधाऱ्यांच्या दबावात वावरणाऱ्या तपासयंत्रणा सध्या तुम्हाला ‘क्लिनचिट’ देत असतील, पण जनतेच्या न्यायालयात तुम्हाला ती कदापि मिळणार नाही म्हणजे नाही. तुम्ही ज्यांच्या कळपात गेलात त्यांच्याकडे असेल मोठे वॉशिंग मशीन. धुतले जात असतील तिथे डाग, पण सामान्य जनतेजवळ असलेले ‘धुलाई’ यंत्र त्याहून अत्याधुनिक आहे. डाग नेमका कोणता? कशामुळे लागला? सहेतूक की निर्हेतूक? या साऱ्या प्रश्नांची पडताळणी हे यंत्र दर पाच वर्षांनी करत असते. तुमचा डाग (म्हणजे गुन्हा हो) गंभीर. त्यामुळे तो किमान या यंत्रातून तरी पुसला जाणार नाही हे ध्यानात ठेवा. अहो, भेटच द्यायची होती विश्वगुरूंनातर तुमच्या गोंदियात मुबलक मिळणाऱ्या तेंदूपानांचा टोप तरी द्यायचा ! तेवढेच तुमच्या विस्मरणात गेलेल्या बिडी उद्याोगाचे स्मरण साऱ्या देशाला झाले असते.
हेही वाचा >>> अन्वयार्थ : चाबहार करार आणि काही प्रश्न…
मूळचा उद्योग सोडून तुम्ही नाही नाही ते ‘उद्योग’ करायला सुरुवात केली. कधी कथित गुंडाची मालमत्ता घे तर कधी डोळे दिपवणारी विमाने खरेदी कर. त्यावर महाराजप्रेमी मराठी माणूस कधी काही बोलला का? तुम्ही भले व तुमचे ‘ना ना उद्योग’ भले या तटस्थपणे तो तुमच्याकडे बघत राहिला. पण हुजरेगिरी करण्याच्या नादात तुम्ही त्याच्या अस्मितेलाच हात घातलात. आधीच्या पक्षातसुद्धा तुम्ही तेच करत करत थेट साहेबांच्या कानाजवळ जाऊन पोहोचलात. आता या कळपात आल्यावर तेच करण्याच्या नादात तुम्ही मराठी मनांना दुखावले. त्यामुळे आता स्पष्टीकरण देऊन, भविष्यात काळजी घेईन अशी सारवासारव करून या गुन्ह्यातून तुम्हाला सुटका करून घेता येणार नाही. साहेबांच्या कुटुंबातील उभ्या फुटीत तुम्ही ‘कळीच्या नारदाची’ भूमिका बजावली तेव्हाही मराठीजन शांत राहिले. त्याचा वेगळा अर्थ घेत तुम्ही थेट त्यांच्या दैवताचाच अपमान करण्यासाठी धजावलात. ते करताना याच दैवताने हुजरेगिरीच्या विरुद्ध कठोर भूमिका घेतली होती हेही विसरलात. कदाचित हा इतिहास तुम्हाला ठाऊक नसण्याची शक्यता जास्त. तसे असेल तर त्यालाही जबाबदार तुम्हीच. निवडणुकांमध्ये मराठी माणसांची मते मिळवणे म्हणजे मने जिंकणे नाही. त्यासाठी या मनात वसलेली दैवते, प्रतीके, त्यामागचा इतिहास या साऱ्यांचा सखोल अभ्यास करावा लागतो. तो करणे बिडी वळवण्याइतके सोपे नाही. सुधारणावादी संतांची पार्श्वभूमी लाभलेल्या या मराठी प्रदेशाचा जाणता राजा एकच. तो तसेच संत अभ्यासायचे असतील तर त्यांच्या चरित्रांचे गांभीर्यपूर्वक वाचन करायला लागा भाईजी! मराठीत वाचायचा कंटाळा येत असेल तर पदरमोड करून त्याचा गुजरातीत अनुवाद करून वाचा. त्यानंतर तुम्ही असले धाडस करायला धजावणार नाही ही शंभर टक्के खात्री. तर मग लागा आता अभ्यासाला. तोवर माफी नाहीच!