पंछी.. नदिया.. पवन के झोके, कोई सरहद इन्हे ना रोके.. इतके अलवार शब्द फिल्मी गाण्यासाठी लिहू शकणारा कवी वेळ पडते तेव्हा समोरच्याला ठणकावून सांगणारी भूमिका घेऊ शकतो, एवढेच जावेद अख्तर यांच्या पाकिस्तानातील ‘त्या गाजलेल्या’ वक्तव्याचे महत्त्व नाही, तर ते त्यापेक्षाही बरेच अधिक आहे. राष्ट्रवादाच्या तथाकथित कल्पनांनी गेला काही काळ धुमाकूळ घातलेला असताना थेट पाकिस्तानात जाऊन तो देश दहशतवादाची पाठराखण कशी करतो हे सांगणे, तेही ज्यांना आपल्याकडील तथाकथित देशभक्त निव्वळ धर्मापायी ‘कायमस्वरूपी दहशतवादी’ समजतात, अशा धर्मामधल्या व्यक्तीने, हे धाडसच. तेही आजच्या सामाजिक, धार्मिक ध्रुवीकरणाच्या काळात फार गरजेचे असलेले धाडस. देशातील मुस्लिमांकडे सरसकट एकाच चष्म्यातून बघणाऱ्या काही लोकांनी आपल्या राष्ट्रप्रेमाच्या, देशभक्तीच्या कल्पना चांगला चष्मा लावून तपासून घ्याव्यात ही गरजच त्यातून व्यक्त होते. देशभरात एकीकडे बेताल वक्तव्यांना आणि सुमारपणाला अक्षरश ऊत आलेला असताना शब्दांचे नैतिक आणि सामाजिक वजन काय असते, याची उदाहरणे अलीकडच्या काळात अगदी विरळाच आहेत. कोणत्याही समाजाला चार खडे बोल सुनावू शकणारा नैतिक आवाज बनण्याची ताकद कलावंतांमध्ये असते ती अशी. जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात जाऊन तिथल्या समाजाला ते ऐकवले हे जितके महत्त्वाचे तितकेच ते इथल्या समाजासाठीही महत्त्वाचे आहे.
उर्दू कवी फैज अहमद फैज यांच्या स्मृतिदिनानिमित्त पाकिस्तानात लाहोर येथे आयोजित करण्यात आलेल्या फैज महोत्सवात जावेद अख्तर यांनी केलेल्या वक्तव्याला टाळय़ा मिळाल्या असल्या तरी नंतर तिथल्या कलाकारांनी आणि वेगवेगळय़ा क्षेत्रांमधल्या लोकांनी जावेद अख्तर यांच्याविरोधात भूमिका नोंदवणे हे अपेक्षितच होते. आपल्या देशात येऊन कुणीतरी आपल्या विरोधात बोलतो आणि आपण टाळय़ा कसल्या वाजवतो, यांना मुळात इथे यायला व्हिसा कुणी दिला या पातळीवरच्या त्या प्रतिक्रिया खरे तर वैफल्य व्यक्त करणाऱ्याच आहेत. कारण अख्तर यांनी सुनावलेले खडे बोलच त्या ताकदीचे आहेत. ‘तुम्ही अनेकदा पाकिस्तानात आला आहात. तुम्ही परत जाल तेव्हा तुमच्या लोकांना सांगाल का की, पाकिस्तानी चांगले लोक आहेत?’ या प्रश्नावर जावेद अख्तर यांनी सांगितले की, ‘‘आपण एकमेकांना दोष देणं थांबवलं पाहिजे, त्यामुळे कोणतीही समस्या सुटणार नाही. एकूणच सध्या जे वातावरण तापले आहे ते कमी व्हायला पाहिजे. आम्ही मुंबईकर आहोत, तेव्हा मुंबईवर कशा पद्धतीने हल्ला झाला होता, ते आम्ही पाहिले आहे. ते लोक नॉर्वे किंवा इजिप्तमधून आलेले नव्हते. ते अजूनही तुमच्या देशात मोकाट फिरत आहेत आणि ही खदखद एखाद्या भारतीयाच्या मनात असेल तर त्याचे तुम्ही वाईट वाटून घ्यायला नको’’.
पाकिस्तानी जनतेला जावेद अख्तर यांच्या या वक्तव्याबद्दल जे काही वाटले असेल ते वाटो; पण भारतात, हिंदू मुस्लीम संबंधांच्या संदर्भात अख्तर यांनी घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. एकीकडे मुस्लिमांना सरसकट देशद्रोही, दहशतवादी मानायचे, ऊठसूट मग तुम्ही पाकिस्तानात चालते का होत नाही, असे विचारायचे, त्यांना इथे राहायचे असेल तर त्यांनी दुय्यम नागरिक होऊन राहावे अशी अपेक्षा करायची असेच आपल्याकडील गेल्या काही वर्षांमधले वातावरण आहे, हे कुणीही नाकारणार नाही. तसे मानणाऱ्यांचे प्रतिनिधी पाकिस्तानात जाऊन भले केक कापून येतील, पण सामान्यांच्या पातळीवर दिशाभूल करण्याचे प्रयोग गेली काही वर्षे सुरू आहेत. असे असताना तितक्या सबळ सामाजिक- सांस्कृतिक नेतृत्वाच्या अभावी असेल किंवा आणखी कशामुळे असेल, पण हा देश आमचाही आहे, भारताविरोधात दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानबद्दल आम्हालाही तितकाच राग आहे, हे मुस्लीम समाजातूनही यायला हवे तितक्या खणखणीतपणे कधीच आले नाही, हेही तितकेच खरे. ते सगळे जावेद अख्तर यांनी केले. ‘इथल्या मुस्लिमांचा मूळ देश’ मानल्या जाणाऱ्या पाकिस्तानात जाऊन त्यांना ‘तुमचा देश आम्हाला त्रास देणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय’ देतो हे सांगणे, हा त्यांचा मास्टर स्ट्रोक नाही, तर त्यांची देशभक्ती सिद्ध करणारा सर्जिकल स्ट्राइकच आहे. ‘हम देखेंगे’ असे बजावणाऱ्या फैज यांच्या स्मृतीसोहळय़ात जाऊन तो करणे हा योगायोग मात्र अजिबात नाही.