दिल्लीवाला
काँग्रेसमध्ये सध्या बैठकाच बैठका होत आहेत. बदलाचं सत्र सुरू झालेलं दिसतंय. मध्य प्रदेशमध्ये जितू पटवारींना प्रदेशाध्यक्ष करून कमलनाथांचं राज्य खालसा केलं. इंदौरच्या राऊ मतदारसंघातून पटवारींना पराभव स्वीकारावा लागला तरी, तरुण पिढीकडं नेतृत्व देण्याची हीच वेळ होती. खरं तर विधानसभा निवडणुकीआधी वर्षभर तरी पटवारींकडं मध्य प्रदेशची सूत्रं सोपवायला हवी होती अशी चर्चा आता होताना दिसते. राज्यातील काँग्रेसचे तरुण नेते म्हणाले की, आमच्याकडं जमिनीवर उतरून काम करणाऱ्या नेत्यांकडं नेतृत्व सोपवलं जातं.. तेवढयात त्यांना कोणी तरी विचारलं की, तुम्ही लोकसभा निवडणूक लढणार का?, त्यावर ते म्हणाले की, मग, राज्यात प्रचार कोण करणार?.. या नेत्याविरोधात कितीही बोललं गेलं असलं तरी, महाराष्ट्रात हाच नेता धडाक्यात प्रचार करणारा आहे, हे दिल्लीतही वरिष्ठांना पटलेलं आहे. त्यामुळं या नेत्याविरोधात कोणी कितीही तक्रारी केल्या तरी या नेत्याला काहीच फरक पडत नाही! असं दिसतंय की, लोकसभेसाठी पुण्याची जागा काँग्रेस लढवेल. तिथं यावेळी भाजपशी साटंलोटं करणाऱ्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही. पुण्याची जागा खरोखरच काँग्रेसनं लढवली तर जंगी लढाई होईल. नांदेड कदाचित अशोक चव्हाण लढवू शकतील. सोलापूरमधून काँग्रेसच्या श्रेष्ठींना सुशीलकुमार शिंदेंनी मैदानात उतरावं असं वाटत असलं तरी त्यांची मुलगी प्रणेती शिंदेंना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ नागपूरमधून फोडून कार्यकर्त्यांना योग्य संदेश दिलेला आहे. नागपूर सभेच्या आयोजनाबद्दल खरगेंनी प्रदेशाध्यक्ष-प्रभारी आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत प्रचंड प्रदेश काँग्रेसचं प्रचंड कौतुक केलं असं म्हणतात. या सभेत खरगेंनी मराठीमध्ये भाषण करून लोकांचीही मनं जिंकली होती. खरगे मराठीमध्ये संवाद साधू शकतात. त्यांना कर्नाटकप्रमाणं महाराष्ट्राचं राजकारणही माहिती आहे, तिथले नेतेही माहिती आहेत. त्याचा फायदा जागावाटपामध्येही होऊ शकेल. शिवाय, कर्नाटकमध्ये मतदारसंघनिहाय आखणी करून काँग्रेसने विजय मिळवला तशी रणनीती लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातही केली जाऊ शकते. यावेळी महाराष्ट्रातून लोकसभेत विरोधी खासदारांचा आकडा वाढेल हे निश्चित.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा