पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘नीट’ परीक्षेतील कथित गोंधळांवरून राजकीय वाद पेटला असून काँग्रेसने केंद्र सरकारवर टीकेचा भडिमार सुरूच ठेवला आहे. भाजपने गुरुवारी या आरोपांना प्रत्युत्तर देतानाच घोटाळ्याचा सूत्रधार तेजस्वी यादव यांचा निकटवर्ती असल्याचा आरोप केला. दुसरीकडे ही परीक्षाच रद्द करण्यासाठी दाखल याचिकांवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार व राष्ट्रीय चाचणी संस्थेला (एनटीए) नोटीस बजावली.

‘नीट’ परीक्षा रद्द करण्याची मागणी करीत देशभरात विद्यार्थ्यांची आंदोलने सुरू असताना राजकीय वातावरणही तापले आहे. ‘यूजीसी-नेट’ परीक्षा रद्द होणे व ‘नीट’मधील घोळ पाहता निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मानसिकदृष्ट्या कोलमडलेले आहेत, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी गुरुवारी हल्ला चढविला. देशातील शैक्षणिक संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ताब्यात घेणे, हे पेपरफुटीचे मुख्य कारण आहे असा आरोपही त्यांनी केला. युक्रेन-रशिया युद्ध पंतप्रधानांनी थांबवल्याचे सांगितले जाते, मग पेपरफुटी का थांबवत नाही, असा खोचक सवालही त्यांनी केला. यावर प्रतिहल्ला चढवत ‘ज्या व्यक्तीला तिसऱ्या प्रयत्नातही लोकसभेच्या शंभर जागा जिंकता आल्या नाहीत, ते विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी कसे होतील,’ असा सवाल भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केला.

दुसरीकडे, ‘नीट’ परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल असून धीरज सिंह यांनी ५ मे रोजी झालेली परीक्षा नव्याने घेण्याची मागणी केली आहे. या याचिकेवरून गुरुवारी न्यायालयाने केंद्र सरकार व एनटीएला नोटीस बजावली. याखेरीज अन्य याचिकाकर्त्यांनाही आपले म्हणणे मांडण्यास न्यायालयाने सांगितले आहे. मात्र विद्यार्थ्यांची समूपदेशन प्रक्रिया थांबविण्यास न्यायालयाने नकार दिला. याप्रकरणी ८ जुलै रौजी सुनावणी होणार आहे.

हेही वाचा >>>जम्मू आणि काश्मीरमध्ये पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; म्हणाले, “लवकरच…”

विविध प्रवेश परीक्षांमध्ये अनियमिततेचा आरोप करत, विद्यार्थ्यांनी गुरुवारी नवी दिल्लीत निदर्शने केली.

एनटीए’च्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी

राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या कारभाराची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली. मात्र ‘नीट’ परीक्षा नव्याने घेण्याची विरोधकांची मागणी फेटाळून लावताना अपवादात्मक घटनांमुळे योग्य पद्धतीने परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त केले. ‘यूजीसी-नेट’ परीक्षेचा पेपर फुटल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आल्याचे प्रधान यांनी सांगितले. याप्रकरणी दोषी आढळणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जाईल, असे सांगतानाच विरोधकांनी याचे राजकारण करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

सरकारने उत्तर द्यावेअभाविप

युजीसी नेट परीक्षा रद्द होणे तसेच नीट परीक्षेतील पेपरफुटी यावरून संघ परिवारातील विद्यार्थी संघटना असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सरकारने याबाबत उत्तर द्यावे अशी भूमिका घेतली आहे. हे गोंधळ पाहता परीक्षा घेण्याबाबत राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या(एनटीए) विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे अभाविपचे राष्ट्रीय सरचिटणीस याज्ञवल्क्य शुक्ला यांनी नमूद केले. या प्रकाराची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

तीस लाख रुपयांत पेपर?

●या प्रकरणाची बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. आणखी दोन संशयितांची तपासणी करण्यात आली असून त्यांच्याकडून धनादेश जप्त करण्यात आल्याचे उपमहानिरीक्षक मानवजीत सिंह यांनी सांगितले.

●प्रत्येक विद्यार्थ्याला पेपर देण्याच्या बदल्यात तीस लाख रुपये मागितल्याचा संशय आहे. असे पुढील तारखेचे सहा धनादेश जप्त करण्यात आल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे यांनी स्पष्ट केले.

●सहा उमेदवारांनाही चौकशीसाठी बोलावल्याचे सूत्रांनी सांगितले. या निकालात ६७ विद्यार्थ्यांना सर्वाधिक गुण आहेत. बिहारमध्ये पेपर फुटल्याचा आरोप आहे.

तेजस्वी यादवांवर आरोप

●बिहारचे उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा यांनी ‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी थेट बिहारचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यावर निशाणा साधला.

●यादव यांच्याशी संबंधित अधिकाऱ्याने या प्रकरणातील मुख्य आरोपी सिकंदर प्रसाद येवेंडू याच्या निवासाची व्यवस्था केली होती, असा दावा सिन्हा यांनी गुरुवारी केला.

●आपल्याकडे याचे तपशील असून याची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. याबाबत वारंवार संपर्क साधूनही राष्ट्रीय जनता दलाकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नसल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.


नीट’ तसेच अन्य परीक्षांमधील अनियमिततेची विशेष चौकशी पथकामार्फत चौकशी करावी. तंत्रज्ञानात सुधारणा होऊनही अशा परीक्षांच्या आयोजनात समस्या का येतात? शेतकरी, महिला तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत सरकार संवेदनशील नाही.सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Politics from neet bjp response to rahul gandhi criticism amy
Show comments