प्रस्तुत लेख ‘नवभारत’ मासिकाच्या जून १९४८ च्या अंकात प्रकाशित झाला होता. तेव्हा त्याला उपशीर्षक देत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी सूचित केले होते की, ‘मानसशास्त्र, मनोविकृती विज्ञान व नीतिशास्त्र यांच्या दृष्टीने केलेली मीमांसा’. वेदअभ्यासक तर्कतीर्थ सर्व ज्ञान-विज्ञानाचे वाचक व व्यासंगी होते. मानसशास्त्र त्यांनी वैज्ञानिक पद्धतीने अभ्यासले होते आणि तेही इंग्रजीमधून वाचून. कारण, त्या काळात मानसशास्त्रसारख्या विज्ञानाचे मराठी ग्रंथ उपलब्ध नव्हते. मी १९७१ला पदवीधर झालो, त्या काळातही इंग्रजी ग्रंथ वाचून प्राध्यापक ते मराठीत शिकवत नि विद्यार्थीही इंग्रजी ग्रंथ वाचून मराठीत उत्तरे लिहीत. मानसशास्त्र, समाजशास्त्र, शिक्षणशास्त्रविषयक डॉ. दांडेकर, डॉ. संगवे, प्रा. डांगे यांचे मराठी ग्रंथ येणे ही त्या काळात नवलाईची गोष्ट होती. या लेखास फाळणीनंतरचे धार्मिक दंगे व महात्मा गांधी हत्येनंतरची महाराष्ट्रातील जातीय जाळपोळ यांची पार्श्वभूमी होती.

यात तर्कतीर्थांनी विस्ताराने स्पष्ट केले आहे की, हिंदुस्थानात व महाराष्ट्रातील राजकारणात आजाराची चिन्हे भरपूर दिसू लागली आहेत. हा आजार मानसिक आहे, म्हणजे सामाजिकदृष्ट्या तो सांस्कृतिक आहे. या चिन्हांचे निदान सामाजिक मानसशास्त्रीयदृष्ट्याच केले पाहिजे. हिंदू- मुसलमानांची यादवी, गांधी हत्या, ब्राह्मण-ब्राह्मणेतर विग्रह (भेद), व्यापाऱ्यांची जनभक्षक राक्षसी धनतृष्णा, दडपशाही करणारे कायदे, एकमेकास चीरवैरी समजणारे राजकीय पक्षोपपक्ष ही सर्व मानसिक रोगाच्या साथीने येथील संस्कृती ग्रासलेली असल्याची निदर्शक चिन्हे होत. विवेकभ्रंश, बुद्धिवादाचा नाश, हीन वा उच्चभावना वा विकारांना आव्हान देणारी आणि क्षुब्ध करणारी सामाजिक व राजकीय आंदोलने ही सांस्कृतिक मनोव्याधी (कल्चरल मेंटल डिसऑर्डर) असल्याची लक्षणे होत. ज्या समाजामध्ये वा राष्ट्रांमध्ये बुद्धिप्रधान शिक्षण व बौद्धिक चळवळी यांना प्राधान्य नसते, तेथे सांस्कृतिक मूल्ये श्रद्धारूढ असतात व गतानुगतिकतेच्या नियमाने दृढमूल झालेली असतात. हिंदुस्थान किंवा महाराष्ट्रातील सांस्कृतिक मूल्ये याच पद्धतीने बनली आहेत.

सामाजिक मानसशास्त्र हे व्यक्ती मानसशास्त्रावर आधारित आहे. त्यामुळे व्यक्ती मनोव्याधी व समाज मनोव्याधी समानच असतात. विरुद्ध भावनांच्या संघर्षाचा निकाल न लागल्यास मज्जातंतूंमध्ये क्षीणता उत्पन्न होते. ही क्षीणता दीर्घकाळ राहिली की तिचे रूपांतर विकृतीत होते. सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचा निरास दीर्घकाळ न झाल्यास समाजदौर्बल्य निर्माण होऊन बऱ्याचदा गुन्हेगारी, पालकवृत्ती, उन्माद (सायकोसिस) यांचा उगम होतो.

हिंदुस्थानातील हिंदू-मुसलमानांची संस्कृती व त्यांच्या सामाजिक संस्था यांची घडण श्रद्धेच्या पायावर उभी आहे. येथील राजकीय पक्ष कार्यकर्त्यांत वैज्ञानिक दृष्टी, बुद्धिवाद, औदार्य, परमतसहिष्णुता यांचा अभाव आहे. त्यांच्या चळवळींची स्फुरणे वा प्रेरणा धार्मिक संप्रदायांच्या एकांतिक, कडव्या, सोवळ्या-ओवळ्या स्वरूपाच्या आहेत. जुनी संस्कृती व नव्या चळवळी यांच्या भूमिका परस्परविरोधी आहेत. येथील राजकीय व सामाजिक चळवळींना बौद्धिक पाठबळ न मिळाल्याने, पारंपरिक भावना दीर्घकाळ दडपल्या गेल्यामुळे, त्या भावनांची एकप्रकारे वाढच होत आली आहे. त्यामुळे त्यांना अनुकूल घटना, प्रसंग, वातावरण मिळताच त्या भावना उग्र रूप धारण करतात. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव या नैतिक मूल्यांवर व बुद्धिवादावर अधिष्ठित लोकसत्तेशी विसंगत दोन भिन्न धार्मिक संस्कृती येथे नांदत असल्याने भावविरोधांना बऱ्याचदा अक्राळविक्राळ रूप प्राप्त होते.

हल्लीच्या भारतीय संस्कृतीत सामाजिक नैतिक जाणिवेचा अभाव दिसून येतो. मनुष्य मूलत: बुद्धिवाद व नैतिकतेचा अधिकारी आहे. मानव्य हेच बुद्धिवादाचे व नैतिकतेचे केंद्र सार आणि आदर्श आहे. मानव्याच्या विरोधी असलेल्या सामाजिक संस्था अनैतिक होत त्या संस्था विशिष्ट मानवी गटाला वा समुदायाला तात्पुरत्या हितप्रद ठरल्या, तरी त्या नरकाचे द्वारच असतात. म्हणून सर्व मानवव्यापी मूल्यांना बाधक अशा जातिभेद, धर्मभेद, संस्कृतिभेद, राष्ट्रभेद, खंडभेद अशा भावनांबाबत खबरदारी घेऊन त्यांची शुद्धी केली पाहिजे. ती केली नाही तर महाराष्ट्रीय राजकारण सध्या जडलेल्या व्याधीतून मुक्त होणार नाही. हे तर्कतीर्थांचे विचार पाऊणशे वर्षांपूर्वीचे; पण आजपर्यंतच्या आपल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक प्रवासात या चरित्रात फरक न दिसणे शल्यकारी खरे!

डॉ. सुनीलकुमार लवटे

drsklawate@gmail