पी. चिदम्बरम
युद्धात आणि प्रेमात सगळे काही क्षम्य असते, असे मानले जाते. आजकाल राजकारणाचाही त्यात समावेश झाला आहे. युद्ध आणि प्रेमातले सगळे पैलू राजकारणातही दिसायला लागले आहेत..
काही आठवडयांपूर्वी या स्तंभातील एका लेखात मी कायद्याचे राज्य असणे आणि कायद्याने राज्य करणे यातील फरक स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. कायद्याचे राज्य असणे या संकल्पनेत कायदा सर्वोच्च असतो आणि सर्व राज्यकर्ते त्याला बांधील असतात. कायद्याने राज्य करणे या संकल्पनेत राज्यकर्ते सर्वोच्च असतात आणि कायदा त्यांचा सेवक असतो आणि सेवकाला कधीही बदलता येते. वस्ती करणे आणि समुदायाने राहणे या कल्पना रुजल्यापासून मानवाने जगण्यासंदर्भातले नियम करायला आणि अंगीकारायला सुरुवात केली.
युद्धाचे नियम
युद्धाचे म्हणून नियम असतात. दोन महायुद्धांनंतर, चार जिनिव्हा अधिवेशने आणि त्यांचा मसुदा सर्व १९६ राज्यांनी स्वीकारला आणि मंजूर केला. ही यंत्रणा आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदे तयार करते. थोडक्यात, ते चार नियम सांगतात:
* संघर्षांच्या वेळी आजारी आणि जखमी लोकांचे तसेच वैद्यकीय आणि धार्मिक कर्मचाऱ्यांचे संरक्षण करा.
* समुद्रातील युद्धात जखमी झालेल्यांची, आजारी पडलेल्यांची आणि उद्ध्वस्त जहाजावर असलेल्यांची काळजी घ्या.
* युद्ध कैद्यांना मानवतेने वागवा.
* व्यापलेल्या प्रदेशातील नागरिकांसह सर्व नागरिकांचे संरक्षण करा.
तथापि, व्हिएतनाम, इराक आणि लिबियामधील युद्धांमध्ये या नियमांचे उल्लंघन करण्यात आले. रशिया आणि युक्रेन तसेच इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धांमध्ये या नियमांचे उल्लंघन केले जाते. बलात्कार आणि लूटमार सर्रास सुरू आहे. रशियाने युक्रेनमधील रुग्णालये, शाळा आणि नागरी वस्त्यांवर बॉम्बफेक तसेच क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. २४ जानेवारी २०२४ रोजी ६५ युक्रेनियन युद्धकैदी आणि नऊ कर्मचारी घेऊन जाणारे एक रशियन विमान पाडण्यात आले आणि विमानातील सर्व लोकांचा मृत्यू झाला. रशियाने केलेला दहशतवादी कृत्याचा आरोप युक्रेनने फेटाळला आहे. इस्रायल-हमास युद्धात, हमासने ७ ऑक्टोबर, २०२३ रोजी सध्याचा संघर्ष सुरू केला. गाझामधून दक्षिण इस्रायलवर अचानक हल्ला केला. त्यात १२०० हून अधिक लोक मारले गेले आणि २४० जणांना ओलीस केले गेले. गेले चार महिने इस्रायलनेही अत्यंत कडवा आणि जोरदार प्रतिकार केला आहे. अरुंद गाझा पट्टीत पॅलेस्टिनींची कोंडी केली आहे आणि २५ हजार जण ठार झाल्याची नोंद आहे.
हेही वाचा >>> आधार देणारे अदृश्य खांब हीच खरी संपत्ती
या दोन्ही युद्धांमध्ये चारही बाजूंनी प्रत्येक नियमाचे उल्लंघन झाले आहे. युद्धाच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास, व्यक्ती आणि राज्यांवर संयुक्त राष्ट्रांच्या न्यायालयात खटला चालवला जाऊ शकतो. गाझामध्ये नरसंहार कराराचे उल्लंघन केल्याबद्दल दक्षिण आफ्रिकेने इस्रायलला आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचले आहे.
तमिळनाडूमधील ख्रिस्तपूर्व ३०० वर्षांपूर्वी रचल्या गेलेल्या आणि आजही संगम साहित्य या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पद्यामध्ये युद्धाच्या नियमांवर एक सुंदर कविता आहे.
गायी, सज्जन ब्राह्मण, स्त्रिया,
आजारी लोक, विनापत्य लोक
या सर्वांना सुरक्षित ठिकाणी न्या;
इथं युद्ध होणार आहे
राजाने धर्माचा मार्ग सांगितल्यानंतर
तो युद्धात गुंतेल
आणि माझाही बाण पुढे जाईल:
तमिळ कवी कंबन (इ.स.११८०) यांनी श्रीराम आणि रावण यांच्यातील शेवटच्या युद्धाचे जे वर्णन केले आहे, ते वाचून ऐकून मला आजही आश्चर्य वाटते. यात राम रावणाला म्हणतो:
तुझी सगळी शस्त्रे संपली आहेत
आणि तू नि:शस्त्र उभा आहेस
आता मी तुझ्याशी लढलो तर तो धर्म होणार नाही
तेव्हा तू आता जा आणि उद्या परत ये
मगच मी तुझ्याशी लढेन
प्रेमाचे नियम
प्रेमातल्या नियमांवर बरीच पुस्तके आहेत. मला तर वाटतं की जितके प्रेमिक, तितके नियम आणि तितकी पुस्तकं आहेत. रुल्स ऑफ लव्ह किंवा प्रेमाचे नियम हे अशा लोकप्रिय पुस्तकांचे शीर्षक असू शकते. ‘प्रेमाचे सामान्य नियम’, ‘प्रेमाचे आठ नियम’, ‘प्रेमाचे ४० नियम’ अशी प्रेमावरील पुस्तकांची यादी आहे. मी त्यापैकी एकही पुस्तक वाचलेले नाही, हे मी कबूल करतो. पण अशा पुस्तकांचा एक मोठा वाचकवर्ग आहे.
मी प्रेमासंदर्भातले वेगळी अंतदृष्टी देणारे नियम शोधत होतो आणि मला हे नियम सापडले:
* ज्याला तुमच्या प्रेमाची किंमत नाही, अशा कुणावर तरी तुमचे प्रेम वाया घालवू नका. – विल्यम शेक्सपियर
* माणसाने नेहमी प्रेमात असावे. म्हणूनच त्याने कधीही लग्न करू नये.
– ऑस्कर वाइल्ड
* कुणीकुणी प्रेमासाठी काय काय केले हे वाचायचे असते, तेव्हा खुनाची माहिती देणारे स्तंभ वाचावेत.. – जॉर्ज बर्नार्ड शॉ.
* जेव्हा तुम्हाला एखाद्याबद्दल आसक्ती वाटते, तेव्हा त्यातून बाहेर पडणे सोपे असते, पण जेव्हा तुम्ही प्रेमात पडता तेव्हा ते त्यातून बाहेर पडणे आणि पुन्हा उभे राहणे अशक्य असते. – अल्बर्ट आइनस्टाईन
यातली काही विधाने विनोदीही असतील पण ती प्रेमाचे काही किमान नियम सांगतात.
तिरुक्कुरल (ख्रिस्तपूर्व ५०० वर्षे) या माझ्या आवडत्या रचनेमध्ये तत्कालीन तत्त्वज्ञ कवीने प्रेमावर एक पूर्ण विभाग लिहिला आहे. त्यात प्रेमावर २५ प्रकरणे आणि २५० कडवी आहेत. त्यातल्या या काही रचना पहा म्हणजे प्रेमातले नियम तुमच्याही लक्षात येतील.
* प्रेमी युगुलांची नजरानजर होते तेव्हा शब्दांची काहीच गरज नसते.
* शिव्यांमुळे प्रेम संपणार नाही. हे म्हणजे तेलामुळे आग विझेल यावर विश्वास ठेवण्यासारखे आहे.
राजकारणाचे नियम
राजकारणाच्या बाबतीत, राजकारणाचे नियम असणे आणि नियमाने राजकारण करणे यात गोंधळ होऊ नये. कायदा ही वेगळी गोष्ट आहे आणि नियम (ज्या पद्धतीने खेळ खेळला जातो) ही वेगळी गोष्ट आहे. खरे तर, काही सामन्यांमध्ये, अस्तित्वात असलेल्या नियमांना पराभूत करण्यासाठीच अस्तित्वात नसलेल्या नियमांनुसार खेळ खेळला जातो. उदाहरणार्थ, राजकीय पक्षांच्या पक्षांतरांना प्रतिबंध करणारा कायदा अशा प्रकारे वापरला जातो की त्यामुळे अधिक पक्षांतरांना प्रोत्साहन मिळेल. राजकारणातल्या नियमांनुसार तर पंचदेखील एका बाजूकडून खेळात भाग घेऊ शकतात. पक्षांतराच्या खेळात विधानसभाध्यक्षच सहभागी झाले अशीही अनेक प्रकरणे आहेत. शिवाय, साधी गोष्ट गुंतागुंतीच्या पद्धतीने समजावून सांगितली पाहिजे, हा राजकारणाचा नियम आहे. या नियमाबद्दल अधिक माहिती हवी असेल आणि राजकारणाचे नियम समजून घ्यायचे असतील तर सगळयात योग्य माणूस म्हणजे नितीश कुमार.
लेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.
संकेतस्थळ : pchidambaram.in
ट्विटर : @Pchidambaram_IN