दहीहंडी या ‘साहसी’ खेळादरम्यान सातव्या थरावरून पडलेल्या संदेश दळवी या तरुणाचा डोक्याला दुखापत होऊन झालेला मृत्यू ही अतिशय दुर्दैवी घटना. गेली काही वर्षे दहीहंडीदरम्यान अशा घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. हंडीची उंची वाढवणे, ती फोडण्यासाठी जास्तीत जास्त उंचीचे थर लावणे, त्यासाठीची मोठमोठी बक्षिसे, डीजेचा ठणठणाट, सेलिब्रिटींची उपस्थिती या सगळय़ामधून गेला बराच काळ या उत्सवाचे स्वरूप अतिशय हिणकस होत चालले होते. त्यात जायबंदी होणाऱ्यांचे प्रमाण वाढत जाऊ लागले तसे काही जागरूक नागरिक न्यायालयात गेले आणि २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने गोविंदांचे वय, हंडीची उंची, थरांची संख्या यावर निर्बंध आणले. त्यानंतर या उत्सवाचा उन्माद काही प्रमाणात कमी झाल्यासारखा दिसत होता. करोना निर्बंधांमुळे गेली दोन वर्षे गोकुळाष्टमीचा सार्वजनिक उत्सवच झाला नाही आणि कदाचित काही तरुणांचे जीव, तर काहींचे जायबंदी होणे वाचले. पण महिनाभरापूर्वी राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर दहीहंडीच्या उत्सवावरील सर्व निर्बंध हटवल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे या वर्षी पुन्हा दहीहंडीदरम्यान जायबंदी होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यात या सरकारने या खेळाला साहसी खेळाचा दर्जा देण्यात येणार असल्याचे जाहीर केल्यामुळे चर्चेला वेगळेच आयाम मिळाले आहेत.
वास्तविक कृष्णाने आपल्या सवंगडय़ांसह येऊन दह्यालोण्याची हंडी फोडणे या गोष्टीला फक्त आणि फक्त सांस्कृतिक संदर्भ आहे. पण आज त्याला राजकीय, आर्थिक पैलू मिळून त्याचे एक वेगळेच रसायन तयार होऊन बसले आहे. त्यातील धोके लक्षात घेऊन त्याला विरोध करणाऱ्यांची पंचाईत म्हणजे आज कोणत्याही सांस्कृतिक गोष्टीला विरोध म्हणजे थेट धर्मालाच विरोध असे समीकरण मांडले जाते आणि मग ते सगळे प्रकरण जायचे त्या वळणानेच जाते. दहीहंडीच्या खेळात रचले जाणारे मानवी मनोरे शारीरिक कसरतीचे, कौशल्याचे, तंदुरुस्तीचे निदर्शक आहेत, हे कुणीच अमान्य करणार नाही. तरुणाईला अंगातली रग जिरवण्याचा आनंद हा खेळ देतो, त्यासाठीचा सराव, त्याची गुरुपौर्णिमेपासून केली जाणारी तयारी हे सगळेच त्या त्या पातळीवर, त्या त्या समूहांना आनंददायी असणार यातही शंका नाही. पण एखाद्या गोष्टीत धोके असतात, तेव्हा त्यांची हाताळणीदेखील तितक्याच काळजीपूर्वक करायची असते. हे धोके लक्षात घेऊन न्यायालयाने निर्बंध आणले, पण त्या निर्बंधांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे सांगितले जात आहे. निर्बंध हटवल्याचे सरकार जाहीर करत असेल तर गोविंदांच्या जीवाची जबाबदारी आपोआपच संबंधित सरकारवर येते. त्यासाठी सरकारने काय केले? सहा-सात थर सरसर चढणारी ही हट्टीकट्टी तरुण मुले वरून खाली पडलीच तर त्यांना तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध होती का? त्यांच्या जीवाची, जायबंदी झाल्यास पुढच्या आयुष्याची जबाबदारी कुणाची? उत्सवादरम्यान व्यासपीठावर मिरवणाऱ्या कुठल्या नेत्यांची, सेलिब्रिटींची मुले या पद्धतीने आपला जीव टांगणीला लावताना दिसतात? मग स्वत:ला लोकप्रतिनिधी म्हणवणाऱ्यांनी सामान्यांच्या मुलांना असे जीवघेणे खेळ खेळायला का लावायचे? या खेळातले लोणी खाणारे गोविंदा कुणी भलतेच आहेत, हे सर्वसामान्यांनीदेखील लक्षात घेणे गरजेचे आहे.