पानगळीनंतर निष्पर्ण झालेली झाडे झडून जातात. जणू शुष्क अशा देहाचा सांगाडा उरतो. सुनसान दुपारी तर शिवारभर सन्नाटा पसरल्याचेच चित्र असते. मग काही दिवस जातात. झाडाच्या हडकुळ्या देहावर पोपटी, तांबूस कोवळी पाने दिसू लागतात. पाहता पाहता ही झाडे पाना-फुलांनी डवरून येतात. आंब्याची झाडे मोहरतात. धुंदफुंद करणारा गंध शिवारात दरवळू लागतो. जिथे पाण्याचा थेंबही नाही अशा उजाड माळरानावर पळस फुलून येतो. या झाडाला हिरवे पान कुठे दिसत नाही पण पेटत्या पलित्यांप्रमाणे लाल भडक अशी अग्नीची पात त्याच्या सर्वांगावर दिसू लागते. भगभगीत दुपारी डोळ्यांना आगीचे लोळ दिसू लागतात. रानात इतरही फुलांच्या झाडांना बहर आलेला असतो. वसंत फुलून येतो तेव्हा सृष्टीत सगळीकडे नाना रंग असे उधळले जातात… तसा रंगांना धर्म कुठे असतो? याचा शोध घ्यायचा तर अमीर खुसरोपर्यंत जावं लागेल.
महान सूफी संत निजामुद्दीन औलिया हे आपल्या लाडक्या भाच्याच्या मृत्यूच्या प्रसंगानंतर खूप उदास झाले होते. कशातच त्यांचं मन लागेना. ते एकटे एकटे राहू लागले. त्यांची ही मन:स्थिती पाहून त्यांचा शिष्योत्तम असलेल्या अमीर खुसरोंसह सर्वच शिष्य विचारात पडले. उदासीने घेरलेल्या या मन:स्थितीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी काय करावे याचा विचार करू लागले. त्याच वेळी काही महिला घोळक्याने वसंतोत्सव साजरा करत असल्याचे आणि हातात पिवळ्या धम्म फुलांचे घोस घेऊन देवालयाकडे जात असल्याचे खुसरो यांनी पाहिले. त्यांनीही अगदी त्याच पद्धतीने आपल्या केसात फुलांचे घोस खोवले आणि नाचत गात ते ख्वाजा निजामुद्दीन यांच्यासमोर गेले. त्यांचे हे हर्षोत्फुल्ल रूप पाहून निजामुद्दीन यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू परतले. ‘आज रचो है बसंत निजाम घर, दुनिया सब मिले गवले बसंत’ हा खुसरो यांचा कलाम या वसंतोत्सवासाठी. ही गोष्ट तशी तेराव्या चौदाव्या शतकातली. तेव्हापासून आजही दिल्लीतल्या ख्वाजा निजामुद्दीन औलिया यांच्या दर्ग्यावर वसंत पंचमी साजरी होते. सगळीकडे पिवळ्या धम्म फुलांची आरास असते. मोहरीची फुले, सूर्यफूल आणि झेंडूच्या फुलांनी सगळा परिसर पिवळ्या रंगात न्हाऊन निघालेला असतो. अनेक नामांकित कव्वाल या ठिकाणी येतात. त्यांच्या गळ्यातही पिवळे रुमाल असतात. डोक्यालाही पिवळे वस्त्र गुंडाळलेले असते. हा ‘सुफी बसंत’ आजही अविरतपणे सुरूच आहे.
तेराव्या शतकात जन्मलेल्या अमीर खुसरो यांचा मृत्यू इसवी सन १३२५ चा. त्यांना जाऊन ९०० वर्षे झाली. फारसीसह हिंदवी भाषेतही त्यांनी विपुल रचना केल्या. ज्या आजही प्रचंड लोकप्रिय आहेत. कव्वालीचे तर त्यांना जनकच मानले जाते. संगीतकार म्हणूनही त्यांचं काम आहे. ख्वाजा निजामुद्दीन यांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या अमीर खुसरो यांच्या रचनेत रंगांचा आविष्कार जागोजागी दिसतो.
मोहे अपने ही रंग मे रंग दे रंगीले
तो तू साहेब मेरा महबूब ए इलाही
हमारी चदरिया पिया की पगरिया
दोनो बसंती रंग दे
जो तु मांगे रंग की रंगाई
मेरा जोबन गिरवी रखले
आपल्या आध्यात्मिक गुरूच्या प्रेमाराधनेत इतकं रंगून जायचं की स्वत:चं वेगळं अस्तित्वच राहू नये. स्वत:चा पूर्ण विलय व्हावा, एकरूप व्हावे अशा प्रकारचे भाव खुसरो यांच्या आणखीही काही रचनांमध्ये आहेत. त्यांचे कितीतरी कलाम कव्वालीच्या रूपात गायले जातात. ‘छाप तिलक सब छिनी रे मोसे नैना मिलाई के’ ही त्यांची रचना नुसरत फतेह अली खान, फरीद अय्याज, अबिदा परवीनपासून ते रिचा शर्मापर्यंत अनेकांनी अगदी तन्मयतेने जीव ओतून गायली आहे. यातही ‘बलबल जाऊं मै तोरे रंग रजवा, अपनी सी रंग दिन्ही रे मोसे नैना मिलाइके’ यासारख्या ओळी रंगांची उधळण करतातच. ‘रैनी चढी रसूल की सो रंग मौला के हाथ, जिसके कपरे रंग दिये सोधन धन वाके भाग’… इथेही रंग आहेच.
सब सखीयन मे चुनर मेरी मैली
देख हसे नरनारी निजाम
अब के बहार चुनर मोरी रंग दे
पिया रखले लाज हमारी निजाम
सृष्टीतल्या रंगाच्या उधळणीचे वर्णन खुसरो करतात तेव्हा त्यातला फुलून आलेला वसंत मोहित करतो.
सकल बनफूल रहि सरसो,
बनबन फुल रही सरसो
अंबवा फुले टेसू फुले,
कोयल बोले डार डार
खुसरो यांच्या आणखी काही रचना गाजलेल्या आहेत. नवविवाहितेची तगमग सांगणारी ‘काहे को ब्याहे बिदेस’ ही त्यांची अशीच लोकप्रिय रचना आहे. एक नवविवाहिता आपल्या पित्याशी यात संवाद करते. मी तुझ्या अंगणातल्या खुंट्याला बांधलेली गाय आहे, बाहेर काढून देण्यासाठी केव्हा तरी हाकली जाणार आहे. मी तुझ्या वेलीची कळी आहे. मी तुझ्या पिंजऱ्यातली चिमणी आहे, सकाळ झाल्यानंतर उडून जाईन. अशा वेगवेगळ्या उदाहरणांच्या रूपात आपल्या पित्याला सांगून ‘काहे को ब्याहे बिदेस’ असा त्या नवविवाहित युवतीचा प्रश्न आहे.
ज़े हाले मिसकीं मकुन त़गा़फुल
दुराय नैना बनाय बतियाँ ।
कि ताबे-हिजरा न दारम् ऐ जां
न लेहु काहे लगाय छतियाँ ॥
शबाने-हिजराँ दराज़ चूं ज़ुल़्फो—
रोज़े वसलत चूं उम्र कोताह।
सखी पिया को जो मैं न देखूँ
तो कैसे काटूँ अँधेरी रतियाँ॥
ही खुसरो यांची रचना एकाच वेळी फारसी आणि हिंदवी या दोन्ही भाषेत आहे. असे अनेक भाषिक प्रयोग त्यांच्या लेखनात सापडतात. ते स्वत: अनेक भाषांचे उत्तम जाणकार होते.
असं सांगतात की अमीर खुसरो हे ज्या दिवशी ख्वाजा निजामुद्दीन यांचे अनुयायी बनले त्या दिवशी होळी होती आणि हा क्षण आपल्या आईला सांगताना खुसरो म्हणाले. ‘आज रंग है ए मा रंग है री, मोहे महबूब के घर रंग है री’… खुसरो यांच्या याच रचनेने बऱ्याच मैफलींची सांगता होते. रंगोत्सवाचे विभ्रम त्यात गुंतवून ठेवतात. अर्थात हा रंग फक्त दृश्य स्वरूपातला, डोळ्यांना दिसणारा नाही. तो आतला आहे. ज्याला ‘अंतरंग’ असेही म्हणता येईल. एकदा का या रंगाशी नाते जुळले की मग आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो आणि आपण असं द्वैत उरतच नाही. स्वत:च्या अस्तित्वाचा पूर्णपणे लोप होतो. बाह्य दिसण्याला काही अर्थच उरत नाही. ‘खुसरो रैन सुहाग की जो में जागी पी के संग, तन मोरा मन पिया का जो दोनो एकही रंग…’ अशी खुसरो यांच्या प्रेमाची व्याख्याच वेगळी आहे. प्रेम हा असा सागर आहे ज्याचा प्रवाह उलटा आहे. ज्याला प्रेमाचा स्पर्श नाही तो या भावसागरात बुडाला आहे आणि जो प्रेमात आकंठ बुडाला आहे त्याने हा भवसागर पार करून पैलतीर गाठले आहे. असं ते म्हणतात.
एके दिवशी अशीच बातमी येते खुसरो यांचे आध्यात्मिक गुरू निजामुद्दीन औलिया यांच्या जाण्याची. त्या वेळची खुसरोंची विमनस्क अवस्था ही अशी होते…
गोरी सोवे सेज पर मुखपर डारे केस
चल खुसरो घर अपने सांझ भई चहू देस
सगळ्या दिशा झाकोळून जातात आणि कसलंसं रितेपण येतं. आयुष्यातला सगळा उजेड संपून अंधारपर्व सुरू झाल्याची जाणीव होते… सहजता हे रंगांचे वैशिष्ट्य आणि डोळ्यांना खुलवणारे सौंदर्य ही त्यांची खासियत. आसमंतात रंग उधळले जातात तेव्हा निळ्या आकाशालाही विलोभनीय असे अस्तर लावले जाते पण रंगांच्या उधळणीतील निरागसता नष्ट होते तेव्हा मात्र रंगांचा भंग होतो. ठासून भरलेला उन्माद आणि त्यातून येणारी दांडगाई जेव्हा अंगावर येते तेव्हा सातही रंग काळवंडू लागतात. इंद्रधनुष्य हळूहळू रंगहीन होऊ लागते. प्रकाश असतो तेव्हा त्यात डोळ्यांना दिसत नसले तरी सातही रंग असतात. ‘सांझ भई चहू देस’ ही अवस्था अंधार वेढू लागल्याची.
लेखक साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक आहेत.
aasaramlomte@gmail.com