विज्ञान- तंत्रज्ञान यांच्या संगमांमुळे जागतिक सत्तेचा लंबक झुलता राहिला तो कसा आणि त्यातून जग वसाहतवादापर्यंत कसे पोहोचले, याचा वेध ‘तंत्रकारण’ या लेखमालेच्या या तिसऱ्या भागात… कोणत्याही देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीचा मार्ग तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आकार घेतो. तंत्रज्ञानाचे मानवी जीवन सुलभ करणे हे सर्वात मूलभूत ध्येय असते. अगदी सुरुवातीच्या काळात मानवी निरीक्षण, कुतूहल आणि गरज यांची तंत्रज्ञान विकासात प्रमुख भूमिका होती. पुढे त्याचा एका प्रणालीअंतर्गत विकास होऊन विज्ञान या शाखेचा उदय झाला. म्हणजेच तंत्रज्ञान-विकास नैसर्गिक होता तर विज्ञानाच्या विकासासाठी व्यवस्थेला प्रयत्न करावे लागले, ज्याची परिणती गुंतागुंतीच्या तंत्रज्ञान विकासात झाली. या विज्ञान- तंत्रज्ञान यांच्या संगमांमुळे जागतिक सत्तेचा लंबक झुलता राहिला. प्राचीन काळी भारतीय उपखंड हा नागरीकरणाचे आणि अर्थकारणाचे केंद्रबिंदू होता. त्यानंतर इस्लामच्या सुवर्ण युगात (८ वे ते १३ वे शतक) बगदाद, कैरो आदी शहरे खलिफाच्या नेतृत्वाखाली उदयास आली. त्याहीपुढे, युरोपीय प्रबोधन काळानंतर झालेल्या सुधारणांना युरोपमधील सत्तेचे गणित बदलले आणि पाश्चिमात्य राष्ट्रे राजकारण, अर्थकारण, सांस्कृतिक ठसा यांमध्ये अग्रेसर बनली. बारकाईने पाहिल्यास उमगेल की जिथे विज्ञान-तंत्रज्ञानाचा विकास झाला तिथले समाजाचे-राजकारणाचे आयाम बदलून गेले आणि ते समाज समृद्ध झाले. उलटपक्षी ज्याक्षणी त्या समाजाने आपली कवाडे चिकित्सक विचारांसाठी बंद केली, आपली शक्ती स्वकौतुकात खर्च करण्यास सुरुवात केली, त्यांच्या अध:पतनास सुरुवात झाली.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : ट्रम्प यांचा ग्रीनलँडहट्ट

donald trump s desire to acquire greenland
अन्वयार्थ : ट्रम्प यांचा ग्रीनलँडहट्ट
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
अग्रलेख : ‘मौसम’ है आशिकाना…
Amit Shah in BJP Shirdi Convention news in marathi
अग्रलेख : दबंग… दयावान?
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
Walmik Karad wife reaction On Mcoca
“मनोज जरांगे समाजकंटक, त्यानं..”, वाल्मिक कराडच्या पत्नीचा आक्रोश; बजरंग सोनवणे, अंजली दमानियांवर केले आरोप
Loksatta editorial about investment decline in Maharashtra
अग्रलेख: महाराष्ट्र मंदावू लागला…
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?

प्राचीन भारतीय विज्ञानात प्लास्टिक सर्जरीपासून आर्यभट्टपर्यंत विज्ञान-तंत्रज्ञानाचा महान वारसा असताना तो लुप्त कसा झाला? गुप्त काळातील विज्ञानाधिष्ठित समाज लवकरच अंधश्रद्धांच्या विश्वात कसा गुरफटत गेला? एका विचारानुसार भारतातील वैज्ञानिक दृष्टी ही केवळ तत्कालीन अभिजात वर्गापुरती सीमित होती. ती जनमानसात कधी रुजलीच नाही किंबहुना रुजू दिली गेली नाही. सुरुवातीला जेव्हा तंत्रज्ञान राज्य उभारणीच्या कार्यात मदत करत होते तेव्हा साम्राज्यांनीही या वैज्ञानिकांना आश्रय दिला. मात्र चिकित्सक वृत्ती साम्राज्यावरील अंधविश्वासाला तडा देण्याची ताकद बाळगते हे जेव्हा लक्षात आले तेव्हा तंत्रज्ञानाचा राजाश्रय दुरापास्त झाला. आधीच मूठभर असणारी या वर्गाची तज्ज्ञता लयाला गेली. हे केवळ भारतातच नव्हे तर ग्रीक-रोमन साम्राज्य, बगदादची अब्बासी खिलाफत यांच्याही बाबतीत झाले. मात्र भारतात आणखी एक बाब या नाशाला कारणीभूत ठरली, ती म्हणजे जातींची उतरंड! अल बिरुनी आपल्या प्रसिद्ध किताब-उल-हिंद या ग्रंथात म्हणतो की ‘भारतीय लोक स्वत:ला सर्वात चतुर समजतात. त्यांचा वैज्ञानिक वारसा लक्षात घेतला तर ते कदाचित खरे असेलही! मात्र या अभिमानाबरोबर एक अहंकार येतो. हे लोक आपल्या जातीबाहेरील लोकांसदेखील ज्ञान वाटण्यास उत्सुक नसतात. या अहंभावामुळे बाहेरील ज्ञानास आपली कवाडे बंद केल्यामुळे यांच्या प्रगतीची दारेदेखील बंद झाली आहेत.’ काही लोक या टीकेच्या खोलात जाताना अल-बिरुनीचे नाव आणि धर्म शोधतील. मात्र तुर्की आक्रमण आणि विध्वंसाच्या वरवंट्याखाली भारतीय समाजाचे आणि विज्ञान तंत्रज्ञानाचे होणारे नुकसान त्याने जाणले होते आणि मुहम्मद गझनवीचाही तो टीकाकार होता.

खोलात गेल्यास असे दिसून येईल की अरब राज्यकर्त्यांनी जिथे आक्रमणे केली तिथले वैज्ञानिक ज्ञान उपसण्यास सुरुवात केली. ग्रीसपासून भारतीय उपखंड पुढे चीनपर्यंत त्यांनी गणित, रसायन, धातू इत्यादी शास्त्रांची भाषांतरे केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ११-१२ व्या शतकापर्यंत जेवढी भाषांतरे अरब-तुर्की आक्रमकांनी केली त्यामध्ये एखादेच पुस्तक समाजशास्त्र, साहित्य, नाटक, कविता वगैरे गोष्टींचे असेल. या ज्ञान लालसेबरोबर बगदादची खिलाफत वैभवाच्या परमोच्च बिंदूवर पोहोचली होती. याला आणखी एक गोष्ट कारणीभूत होती ती म्हणजे राजा आणि प्रजा यांच्यासाठी समान भाषेचा वापर! यामुळे विज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या. सर्वांना कळेल अशा भाषेत वैज्ञानिक साहित्य उपलब्ध झाले, ज्याचा वापर त्या लोकांनी आपापल्या परीने तांत्रिक प्रगतीमध्ये केला. खगोलशास्त्राच्या अभ्यासामुळे गणिताच्या विकासाला आवश्यक प्रेरणा मिळाली. अरबांनी भारतीय दशमान पद्धत स्वीकारली आणि मोठ्या प्रमाणावर ती प्रचलित केली, इतके की गोदामातील कारकून आणि व्यापारीही त्यांच्या व्यवहारात या अंकांचा वापर करू लागले. अरबांनी भारतीय बीजगणित आणि त्रिकोणमितीवरील ग्रंथांचे भाषांतर करून त्यांचा उपयोग अनेक भौतिक व व्यावहारिक समस्यांच्या सोडवणुकीसाठी केला.

मध्ययुगात भारतीय साम्राज्यांचा दृष्टिकोन विज्ञान तंत्रज्ञान विकासासाठी फारच दुर्दैवी होता. समाज धार्मिक, जातीय आणि वैचारिक मागासलेपणामध्ये बंदिस्त होता. मुघल सम्राट जहांगीर याला पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी छापलेली पुस्तके दाखविली तेव्हा ‘ती अनाकर्षक आहेत’ या सबबीखाली ती परत केली गेली. त्यातून होणाऱ्या ज्ञानप्रसाराच्या सुलभतेचे महत्त्व लक्षात आले नाही. दुसरीकडे पोर्तुगीजांनी भेट दिलेला जगाचा नकाशादेखील ‘समजायला अवघड आहे’ म्हणून परत केला गेला. जेव्हा पोर्तुगीज भारतीय ज्ञानाचे भाषांतर करीत होते तेव्हा ही बेफिकिरी म्हणजे कर्मदरिद्रीपणाच होता. युद्धशास्त्रात तुर्की आक्रमणाबरोबर बंदुकीची दारू, तोफांचा वापर यांमुळे महत्त्वपूर्ण बदल झाले. मात्र मोठमोठ्या तोफा बनवण्याच्या स्पर्धेपुढे ते तुर्की ज्ञान उपयुक्तता हरवून बसले. कधीकाळी प्रचंड आकारासाठी नावाजलेली भारतीय जहाजे प्रगत उपकरणांच्या अभावी पाश्चात्त्य आरमारासमोर पोकळ वाटू लागली. बख्तियार खिलजीने ओदंतपुरी, नालंदा आणि विक्रमशिला विद्यापीठांत केलेल्या जाळपोळीने भारतीय प्राचीन ज्ञानाचा समृद्ध ठेवा कायमचा अस्तंगत झाला. अगदी नवे विचार जे प्राचीन काळापासून अस्तित्वात होते त्यांचीही चिकित्सक छाननी भारतीय व्यवस्थेकडून झाली नाही. योगायोगाने उपखंडातील हिंदू नागरीकरण आणि मध्यपूर्वेतील मुस्लीम साम्राज्य या दोघांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अस्ताची कारणे आपल्याला सारखीच दिसतील- वैज्ञानिक आदर्शवादाचा अभाव, गर्विष्ठता, धार्मिक अंधश्रद्धा, मूलतत्त्ववाद हे सर्व अंतर्गत घटक आणि बाह्य घटक म्हणजे परकीय आक्रमणे!!

दुसरीकडे युरोपमध्ये प्रबोधनानंतर मानववाद हा चिंतनाचा पाया झाला. भौतिक प्रगतीच्या नव्या वाटा शोधण्यास मदत झाली. अरबांनी भाषांतर केलेले तांत्रिक ज्ञान युरोपीयांनी आत्मसात करण्यास सुरुवात झाली. रॉजर बेकनसारख्या तत्त्ववाद्यांनी ‘प्रयोग करा’सारख्या घोषणा देऊन लोकांना उद्यामशील बनविले. पहिल्या औद्याोगिक क्रांतीनंतर अतिरिक्त उत्पादने विकण्यासाठी नवीन बाजारपेठा आणि कच्च्या मालाचे स्राोत शोधण्याची गरज निर्माण झाली. सत्ता बळकट करण्यास आणि स्थैर्य देण्यास तंत्रज्ञानाचा वापर होत आहे हे लक्षात आल्यावर चर्चनेही कर्मठ भूमिका सोडून कल्पक विचार आणि मोहिमांना प्रोत्साहन दिले. त्यातूनच कोलंबस, वास्को दा गामा यांच्या मोहिमांचा पाया रचला गेला. प्रत्यक्ष भूभाग विस्तारीकरणापेक्षा वसाहतवादाचे राजकारण सुरू झाले ज्यामध्ये सामाजिक-राजकीय जबाबदारी टाळून अनिर्बंध आर्थिक फायदे घेणे सुकर झाले. नावीन्यपूर्ण शस्त्रे, शास्त्रे, युद्धपद्धती, उत्पादने आणि प्रशासन व्यवस्था यांचा विकास होऊन पाश्चात्त्य- धार्जिणी जागतिक व्यवस्था उदयास आली. पूर्वेकडील जगात अंगमेहनतीच्या कामांना कधीच प्रतिष्ठा नव्हती. तुलनेत युरोपमधील रोमन साम्राज्यापासून अस्तित्वात असलेल्या स्वातंत्र्य आणि अंगमेहनतीच्या सवयीमुळे नवी तंत्रे आणि उद्यामशीलता यांचा विकास होण्यास मदत झाली. एकेकाळी प्रगत असलेले आशिया, मध्यपूर्व हे प्रदेश बाजूला होऊन युरोपकेंद्रित सत्ताकारण उदयास येण्यात अशाप्रकारे तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली. थोडक्यात, तंत्रज्ञान केवळ साधन म्हणून नव्हे तर त्यामागील विचार, निरीक्षण, प्रयोगशीलता, त्यातून उदयास आलेली सामाजिक व्यवस्था या सर्वांनीच सत्ताकेंद्राचे वहन व बळकटी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दबक्या पावलांनी, कला म्हणून चंचुप्रवेश झालेल्या तंत्रज्ञान या घटकाने आता दमदार मार्गक्रमणा करीत संकुचित साम्राज्याची धूळधाण उडवून देऊन तंत्रज्ञाला आपलेसे करणाऱ्या घटकांना शक्ती प्रदान करणे सुरू केले. विज्ञान- तंत्रज्ञानाच्या इतिहासात सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक घटकांची गुंतागुंत दिसून येते. ज्या समाजांनी नवकल्पना व चिकित्सक विचारांना स्वीकारले, ते समृद्ध झाले; तर बदलांना विरोध करणाऱ्या समाजांचा ऱ्हास झाला. इतिहासाच्या प्रवासातून निरंतर प्रगती, सामाजिक विकास आणि राज्य उभारणीसाठी तंत्रकेंद्रित खुल्या, जिज्ञासू आणि चिकित्सक मनोवृत्तीचा स्वीकार अपरिहार्य आहे, हे स्पष्ट होते.

Story img Loader