मोनालिसा हे नाव घेतलं की आठवते ती लिओनार्दो दा विंचीच्या चित्रातली गेली काही शतकं पॅरिसमधल्या लुव्र संग्रहालयातल्या भिंतीवरच्या चित्रात बसून गूढ, मंद स्मित करणारी स्त्री. हे समीकरण इतकं फिट्टं की जणू काही दुसरी मोनालिसा असूच शकत नाही.

पण यंदा प्रयागराजच्या कुंभमेळ्यात अवघ्या १६-१७ वर्षांची, सोनेरी डोळ्यांची, खळखळून हसणारी मोनालिसा भोसले रुद्राक्ष वगैरेच्या माळा विकायला आली आणि विंचीच्या कुंचल्याच्या फटकाऱ्यापेक्षा कुणा ब्लॉगरच्या हातातल्या मोबाइलमधला कॅमेरा जास्त प्रभावी ठरला. बघता बघता ‘सोशल मीडिया सेन्सेशन’ ठरलेल्या या पोरीला इतक्या टीव्ही वाहिन्यांच्या आणि ब्लॉगर्सच्या कॅमेऱ्यांना तोंड द्यावं लागायला लागलं, की तिथून पळून जायची तिच्यावर वेळ आली. तरीही ब्लॉगर्स आणि टीव्हीवाल्यांनी तिला एकत्र गाठलंच. आता या सगळ्यांना एकदाच भेटू आणि त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ म्हणून मोनालिसाने त्यांच्या या गराड्याला सामोरं जायचं ठरवलं. त्यात हा तिच्यावर झालेला प्रश्नांचा भडिमार…

हेही वाचा : तंत्रकारण : तंत्राधिष्ठित शिवनीती

तुझं नाव मोनालिसा असंच का आहे?- मला माहीत नाही, आईवडिलांनी ठेवलंय.

तू या माळा का विकतेस?- पैसे कमवून माझ्या बाबाला देण्यासाठी

तुला गेले काही दिवस खूप प्रसिद्धी मिळते आहे, त्याबद्दल तुला काय वाटतं?- छान वाटतं…

तू आता पुढे काय करणार?- माहीत नाही

तुझे डोळे खूप सुंदर आहेत, हे तुला माहीत आहे का?- हो…

तुझे डोळे इतके सुंदर कशामुळे आहेत?- माहीत नाही

तू डोळ्यांत काय घालतेस म्हणून ते सुंदर आहेत?- सुरमा

तू इतकी सुंदर हसतेस ते कशामुळे?- माहीत नाही

तुझं शिक्षण किती झालं आहे?- काही नाही.

का?- शक्य नव्हतं

हेही वाचा : अन्वयार्थ : हत्येचा गुन्हा दाखल कराच

आता तू पुढे काय करणार?- कशाचं?

म्हणजे आता तू इतकी फेमस झाली आहेस, बॉलीवूडची वगैरे ऑफर आली तर स्वीकारणार का? सिनेमात जाऊन काम करणार का?- हो…

तुझा आवडता हिरो कोण?- सलमान खान</p>

त्याने भेटायला बोलावलं तर मुंबईत जाणार का?- हो…

तुला स्वयंपाक करता येतो का?- हो…

काय काय येतं?- सगळं…

मोमो येतात का?- हो…

कुठे शिकलीस?- यूट्यूबवर बघून

आता तुला जगात सगळे लोक ओळखायला लागले आहेत, त्याबद्दल तुला काय वाटतं?- छान वाटतं…

तुझ्या घरात सगळ्यांचे डोळे असे छान कशामुळे आहेत?- माहीत नाही…

तुला कुंभमेळ्यात येऊन कसं वाटतंय?- छान वाटतंय…

हेही वाचा : लोकमानस : विलंब, नाराजीनाट्यांची मालिका

तुझं सगळ्यात पहिल्यांदा शूटिंग करून मीच व्हायरल केलं, ते आठवतंय ना?- हो का? असेल…

तू आता गावी परत चालली आहेस म्हणे, ते खरं आहे का?- हो…

का निघाली आहेस?- माझ्या माळा विकल्या जात नाहीत. म्हणून बाबाने सांगितलं आहे जायला.

पण तू थांबायला हवंस…- मग माझ्या या माळा तुम्ही विकत घ्याल का?

तिच्या या प्रश्नासरशी तिच्याभोवतीचा कॅमेऱ्यावाल्यांचा सगळा गराडा बघता बघता पांगला आणि मोनालिसा एकटीच उभी राहिली. तिच्या हसऱ्या, सुंदर डोळ्यांमध्ये आजकाल रोजच्यासारखी विक्री होत नाही म्हणून अश्रू उभे होते, ते टिपायला मात्र तिथे कोणाचाच कॅमेरा नव्हता.

Story img Loader