श्रीलंकेचे अध्यक्ष अनुराकुमार दिसानायके यांनी अध्यक्षीय निवडणुकीपाठोपाठ आता पार्लमेंटच्या निवडणुकीतही घवघवीत यश मिळवून त्या देशाच्या राजकारणावरील पकड मजबूत केली आहे. दिसानायके हे मूळचे मार्क्सवादी विचारांचे. एके काळी त्यांच्या जनता विमुक्ती पेरामुना (जेव्हीपी) या पक्षानेही सिंहला वर्चस्ववादी राजकारणाची कास धरली होती. पण रक्तलांच्छित वांशिक हिंसाचारातून श्रीलंकनांच्या हाती काहीच लागले नाही, याची जाणीव होऊन मनपरिवर्तन झालेल्या मोजक्या राजकारण्यांपैकी ते एक. त्यांच्या पक्षाने बनवलेल्या राजकीय आघाडीला ताज्या निवडणुकीत दोनतृतीयांशपेक्षा अधिक जागा मिळाल्या. कारण श्रीलंकेच्या उत्तरेस तमिळबहुल जाफना भागातही त्यांच्या पक्षाने काही जागा जिंकल्या. हा वांशिक दुभंगाचा राजकीय साकव ओलांडल्यामुळेच त्यांना असे घवघवीत यश मिळाले. एका अर्थी वंशवादी राजकारण करणाऱ्या पक्षांना – सिंहला आणि तमिळ अशा दोन्ही – मिळालेला हा एक धडाच आहे. श्रीलंकेच्या नवीन पार्लमेंटमध्ये मिळालेल्या जागांवर नजर टाकल्यास या देशाचे राजकारण कोणत्या दिशेने झुकत आहे याचा अंदाज बांधता येईल. जनता विमुक्ती पेरामुनाप्रणीत नॅशनल पीपल्स पॉवर आघाडीला १६० जागा मिळाल्या. मावळत्या पार्लमेंटमध्ये विरोधी पक्ष असलेल्या समागी जन बलावेगया या पक्षाला ४० जागा मिळाल्या. इलन्काइ तमिळ अरासू कात्ची या सर्वांत मोठ्या तमिळ पक्षाला सहा जागा मिळाल्या. मावळते अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांच्या न्यू डेमोक्रॅटिक फ्रंटला अवघ्या चार आणि माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्या पक्षाला तर अवघ्या दोन जागा मिळाल्या. मावळत्या पार्लमेंटमध्ये राजपक्षे यांच्या पक्षाला बहुमत होते. लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम (एलटीटीई) या संघटनेचा नेता प्रभाकरन याच्या नि:पातानंतर झालेल्या निवडणुकीतही लोकप्रियतेच्या लाटेचा इतका फायदा महिंदा राजपक्षे यांना झाला नव्हता. २२५-सदस्यीय पार्लमेंटमध्ये जेव्हीपीइतके बहुमत त्यावेळी राजपक्षेंना मिळाले नव्हते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा