ट्रम्प यांच्या विजयामुळे आणखी एक तगडा नेता निवडून आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील सर्वात जुन्या लोकशाहीपैकी एक असलेल्या अमेरिकेच्या लोकशाही निवडणुकीत निष्पक्ष आणि चौफेर विजय मिळवला. अमेरिकेतील निवडणूक प्रक्रियेच्या वैधतेवर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी बहुसंख्य प्रातिनिधिक मते जिंकली: * डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना प्रातिनिधिक २२६ मते मिळाली तर ट्रम्प यांना २९५. * कमला हॅरिस यांनी ६८.१५ दशलक्ष प्रत्यक्ष मते जिंकली तर ट्रम्प यांनी ७२.५ दशलक्ष. या निवडणुकीवर रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व दिसून आले. या पक्षाने सिनेटवर नियंत्रण मिळविले आणि त्यामुळे प्रतिनिधीगृहावरही आता त्याचेच नियंत्रण असेल.
थोडक्यात ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षासाठी हा सर्वसमावेशक आणि जबरदस्त विजय होता.
निवडणूकपूर्व चाचण्यांचे अंदाज पूर्णपणे चुकीचे ठरले. प्रत्यक्षातले निकाल त्या अंदाजांच्या जवळपासही नव्हते. जी सात राज्ये निर्णायक ठरतील असे सांगितले जात होते, ती निर्णायक ठरली, पण ट्रम्प यांच्या बाजूने.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत, मतांमधील फरक लक्षणीय होता.
मेक अमेरिका ग्रेट अगेन?
बहुतेक सर्व स्वतंत्र निरीक्षक आणि बहुतेक सर्व नि:पक्षपाती प्रसारमाध्यमांचे असे म्हणणे होते की, ट्रम्प यांची निवडणूक मोहीम आणि त्यांची भाषणे स्त्रीद्वेषी, वर्णद्वेषी, अपमानास्पद आणि फूट पाडणारी होती. पण बहुसंख्य अमेरिकन जनतेला त्याची पर्वा नव्हती. स्थलांतरित, महागाई आणि गुन्हेगारी हेच त्यांचे अधिक चिंतेचे मुद्दे होते. पण महागाई सोडली तर बाकीचे दोन मुद्दे त्यांच्या दृष्टीनेही ‘रोजीरोटीचे’ नसतात; तर ‘जगण्यामरण्याचे’ असतात. ‘आपल्यासारखे नसलेल्या लोकांची’ म्हणजे स्थलांतरितांची भरमार झाली आहे, असे अमेरिकेतील गोऱ्या अमेरिकी ख्रिाश्चन नागरिकांना वाटते. एवढेच नाही तर आता जुन्या स्थलांतरितांना (प्रामुख्याने लॅटिनो मतदार) सुद्धा नव्या स्थलांतरितांचा धोका वाटतो आहे. प्रत्येक देशात वाढती महागाई सर्वांसाठीच त्रासदायक ठरते आहे. अमेरिकेत चलनवाढ २.४ टक्क्यांवर असली आणि अमेरिकेतील फेडरल बँक धोरणात्मक व्याजदर (कमी चलनवाढीचे लक्षण) कमी करण्यास तयार असली, तरीही रिपब्लिकन पक्षाच्या हातात चलनवाढ हे एक शक्तिशाली शस्त्र होते. वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि अमली पदार्थांमुळे बहुतेक इतर सर्व देशांप्रमाणे अमेरिकेतही गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. गुन्हेगारी हे कायमस्वरूपी शस्त्र आहे आणि सत्तेवर येणारे कोणतेही सरकार हे असुरक्षितच असते.
ट्रम्प यांनी या मुद्द्यांचा पुरेपूर उपयोग केला. बिनधास्तपणे पातळी ओलांडणारी भाषा वापरली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मतदारांनी त्यांच्या या वागण्यावर आक्षेप घेतला नाही.
संयम आणि सभ्यतेचा अभाव
दुसरीकडे, कमला हॅरिस यांनी त्यांच्या प्रचारात घेतलेल्या गर्भपात आणि महिलांचे हक्क, संविधानाचे पावित्र्य, निष्पक्षता, वांशिक समानता आणि करुणा या प्रमुख मुद्द्यांचे बहुसंख्य मतदारांवर पडसाद उमटले नाहीत. ही मूल्ये आणि ट्रम्प यांच्या या लढाईत या मूल्यांचा पराभव झाला ही शोकांतिका आहे. ट्रम्प यांना या मूल्यांची फिकीर नाही, ही त्यातला आणखी एक पैलू.
अमेरिकेच्या निवडणुकीत ‘पराभूत’ झालेल्या इतर मुद्द्यांपैकी एक म्हणजे सुमारे ४४ हजार पॅलेस्टिनींची (हजारो महिला, मुले आणि संयुक्त राष्ट्रांचे कर्मचारी) क्रूर हत्या. युक्रेनवरील रशियन आक्रमणाचा या निवडणुकीत फारसा परिणाम झाला नाही. तैवानला धमकावणारा चीन, उत्तर कोरियाची अमेरिकेच्या भूमीवर उतरू शकणारी लांब पल्ल्याची आंतरखंडीय क्षेपणास्त्रे, अनेक देशांतील गृहयुद्ध आणि तथाकथित लोकशाहीतील स्वातंत्र्यावरील निर्बंध या गोष्टींना बहुतांश अमेरिकन लोकांनी फारसा भाव दिला नाही. आपण एका दोषी ठरलेल्या व्यक्तीला निवडून देतो आहोत, याचेही बहुतेक मतदारांना फारसे काही पडलेले नाही. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत, सांगायचे तर ज्यामुळे अमेरिका जगातला सर्वात श्रीमंत देश झाला आहे, त्या धोरणांपासून (मुक्त आणि खुला व्यापार, कमी दर, मक्तेदारीला विरोध) माघार घेण्याची भूमिकाही बहुसंख्य अमेरिकनांना चिंताजनक वाटत नाही. बड्या तेल कंपन्या, बड्या औषध कंपन्या आणि मोठ्या टेक कंपन्या ट्रम्प यांच्या विजयाचा जयजयकार करत आहेत.
लिंग आणि वर्णभेद
अखेरीस, अमेरिकन मतदारांनी त्यांच्या आग्रह आणि पूर्वग्रहानुसार मतदान केले. पुरुष मतदारांनी ट्रम्प यांना पसंती दिली. तरुण मतदारांनी (१८-२९ वर्षे) ट्रम्प यांना पसंती दिली. कर्मचारी वर्गानेही ट्रम्प यांना पसंती दिली. पदवीधर नसलेल्या मतदारांनी ट्रम्प यांना मते दिली. लॅटिनो मतदारांनी (मेक्सिकन, पोर्तो रिकन्स आणि क्यूबन्स) ट्रम्प यांना पसंती दिली. स्पष्ट सांगायचे तर, त्यांनी कमला हॅरिस यांच्याविरोधात मत दिले ते मुख्यत्वे त्यांच्या स्त्री असणे आणि त्यांचा वर्ण यामुळे.
अमेरिकेतील निवडणुकांच्या निकालांचा इतर देशांतील निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो का असेही आता विचारले जाऊ लागले आहे. ट्रम्प यांनी या निवडणुकीत जी भाषा वापरली, त्यामुळे त्यांना यश मिळाले असेल तर आपणही तशीच फुटीरवादी भाषा वापरायला हवी, असे आता इतर देशांमधील नेत्यांनाही वाटू शकते. ट्रम्प यांचे हे प्रारूप इतर देशांमध्येही वापरले गेले तर तो लोकशाहीवर मोठा आघात असेल.
(*लेखातील सर्व आकडेवारी हा लेख लिहिते वेळची आहे)