वसंतदादा पाटील मुख्यमंत्रीपदी असताना खासगी व्यक्ती आणि संस्थांना व्यावसायिक अभ्यासक्रमांची महाविद्यालये स्थापन करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर राज्यात अनेक राजकीय नेत्यांनी महाविद्यालये स्थापन केली. पण या महाविद्यालयांमधील शैक्षणिक गुणवत्ता आणि त्याचे प्रशासन याची आखणी करणे हे तसे अवघड काम. या क्षेत्रात मराठवाडय़ासारख्या भागात आपल्या कार्यशैलीची छाप निर्माण करून तशीच घडी पुढे बारामतीसारख्या भागात बसवणारे होते प्राचार्य प्रतापराव बोराडे.

संस्था काढणे सोपे पण तिचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी उत्तम प्रशासक लागतात. प्रताप बोराडे हे या श्रेणीतील. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी गणवेशात यावे असा त्यांचा आग्रह असे, कारण अभियंता होण्यासाठी जगण्यातही शिस्त लागते. पुढे अभियांत्रिकी महाविद्यालयांना गणवेशाची शिस्त लागली. एकाच महाविद्यालयात २३ वर्षे प्राचार्यपद सांभाळणारे प्रतापराव बोराडे हे समाजवादी चळवळीतील नेत्यांच्या सहवासातील. त्यांनी मराठवाडय़ातील अनेकांना मदत केली. त्यांच्या निधनाने शिक्षण प्रशासनात पोकळी निर्माण झाली आहे.

१९८३ ते २००३ असे २१ वर्ष जेएनईसी महाविद्यालयाचे प्राचार्य, पुढे २००३ पासून विद्या प्रतिष्ठान, बारामती येथेही अभियांत्रिकी महाविद्यालयाची घडी बसवून देणाऱ्या बोराडे यांच्यावर समाजवादी नेते बापूसाहेब काळदाते यांच्या विचारांचा प्रभाव. तसे ते लहानपणापासूनच राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात होते. त्यांचे मूळ गाव पाटोदा. सेलू येथे त्यांनी सहावीपासून पुढचे शिक्षण घेतले. पुण्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी संपादन केली.

समाजवादी मित्रमंडळींचा संपर्क आणि तंत्रज्ञानविषयक प्रेम याचा समतोल साधणारे बोराडे यांनी पुढे आयआयटी पवई येथून प्लास्टिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. काही वर्षे नोकरी केली आणि नंतर प्लास्टिकच्या वस्तू तयार करण्याचा कारखाना स्थापन केला. या काळात त्यांनी लघु उद्योजकांची संघटना बांधली. बापूसाहेब काळदाते यांच्या मार्गदर्शनाखाली छोटय़ा उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. औरंगाबाद येथे कमलकिशोर कदम आणि अंकुशराव कदम अभियांत्रिकी महाविद्यालय काढणार असल्याने तेथे प्राचार्यपद स्वीकारावे, असे त्यांना सांगण्यात आले. तेव्हा त्यांच्याकडे अभियांत्रिकीची पदव्युत्तर पदवी नव्हती. सोलापूर येथून त्यांनी ती पदवी मिळविली. भविष्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाचा अचूक वेध घेणारी दृष्टी प्रताप बोराडे यांच्याकडे होती. आपल्या संस्थेतून उत्तम नागरिक घडवायचे असतील तर चांगले लेखक, विचारवंत यांच्याशीही विद्यार्थ्यांचा संपर्क यायला हवा असा त्यांचा प्रयत्न असे. त्यामुळे त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयात अनेकांची व्याख्याने आयोजित केली. साहित्यिक, विचारवंत आणि विद्यार्थी यांच्यात रमणारे प्राचार्य बोराडे यांनी अनेक संकटांत आपल्या विद्यार्थ्यांसह निधी गोळा केला. बिहार राज्यात १९८८ साली आलेल्या महापुराच्या वेळी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन दोन लाख रुपये जमवले. किल्लारी आणि भूजच्या भूकंपातही त्यांनी आर्थिक मदत गोळा करण्यासाठी पुढाकार घेतला होता. शिक्षण घेताना पालकांशी असणारा बंध त्यांना मागे तर खेचत नाही ना, याची काळजी घ्या, असा सल्ला ते आवर्जून देत.