हिरामण हा भारवाहू मालाची ने-आण करणारा एक गाडीवान. या कामावरच त्याची गुजराण असते. एके दिवशी एका सुंदर नर्तिकेला त्याच्या बैलगाडीत बसवून दिलं जातं. ज्या ठिकाणी जत्रा सुरू आहे तिथं एका लोकनाट्यात सहभागी होण्यासाठी ती आलेली आहे. प्रवास तब्बल तीस तासांचा. गाडी जुंपल्यापासून हिरामणचं शरीर रोमांचित झालं आहे. त्यानं आपल्या गाडीला पडदा लावलेला आहे. तो बैलांना मारण्यासाठी हात उगारतो तेव्हा पाठीमागून ‘अहा… मारो मत’ असा आवाज येतो. या आवाजाने तो अक्षरश: वेडावतो. क्षणभर त्याला अवघं शरीर झंकारल्याचा भास होतो. गाडीत बसताना बाईला एवढं निरखून पाहिलेलं नसतं; मात्र आवाज आल्यानंतर तो पाठीमागे वळून पाहतो तेव्हा जणू तो मनातल्या मनात ओरडतोच, ‘अरे बाप, ई तो परी है…’ मग दोघेही एकमेकांची नावानिशी ओळख करून घेतात. हिराबाईलाही हिरामणचा निरागसपणा भावतो. जत्रा सुरू होते. हिराबाईच्याच सांगण्यावरून हिरामण हे लोकनाट्य पाहायला येतो. ‘हिराबाई का आदमी’ म्हणून त्याला या ठिकाणी वेगळी जागा मिळते. जत्रेचे दहा दिवस निघून जातात. ज्या नाटक कंपनीतून हिराबाई ‘रौता संगीत नाटक कंपनी’त दाखल झालेली असते त्याच आधीच्या ‘मधुरामोहन कंपनी’त ती पुन्हा परत जायला लागते… आणि मग रेल्वे स्टेशनवरचा दोघांच्या ताटातुटीचा प्रसंग. हिराबाई रेल्वेच्या डब्यात बसते. गाडीची शिट्टी वाजते आणि काही क्षणात ती धूसर होत जाते. हिरामणची बैलगाडी त्याच्या गावाच्या रस्त्याच्या दिशेने धावायला लागते. दोन जीवांच्या बऱ्याच अव्यक्त गोष्टी. निरोपाची वेळ आलेली आहे आणि मनात शिगोशीग साठलेले शब्द, जे ओठांवर आलेच नाहीत. फणीश्वरनाथ रेणू यांची ‘मारे गये गुलफाम’ (ऊर्फ ‘तीसरी कसम’) ही एक सुंदर प्रेमकथा आहे.

अनंत या नावाचे एक पत्रकार-लेखक पाटण्यात राहतात. रेणू यांच्या साहित्यानं ते अक्षरश: झपाटलेले आहेत. अनंत यांचं अलीकडेच ‘दो गुलफामों की तीसरी कसम’ हे पुस्तक प्रसिद्ध झालं आहे. ‘तीसरी कसम’ या चित्रपटाच्या निर्मितीचे बरेच अज्ञात तपशील या पुस्तकात नोंदवण्यात आले आहेत. या चित्रपटाच्या निर्मितीमागची कथा, गीतांचा जन्म, चित्रीकरणादरम्यानचे प्रसंग अशा अनेक बाबींचा उलगडा या पुस्तकात आहे. दहा प्रकरणं असलेलं हे संपूर्ण पुस्तक अतिशय रोचक आहे.

रेणू यांची ही कथा १९५७ साली प्रसिद्ध झाली तेव्हा ‘मैला आंचल’ची सर्वदूर ख्याती झाली होती. त्याच वर्षी रेणू यांचा पहिला कथासंग्रह ‘ठुमरी’ प्रसिद्ध झाला. त्यात ही कथा आहे. बासू भट्टाचार्य एका चांगल्या कथेच्या शोधात होते. गीतकार शैलेंद्र यांच्याशी त्यांचा परिचय होताच. शैलेंद्र यांनाही ही कथा आवडली होती. त्यातूनच या कथेवर सिनेमा तयार करण्याचा विचार पुढे आला. पडद्यावर कथेचा नायक असलेल्या हिरामणची व्यक्तिरेखा राज कपूर यांनी तर हिराबाईची व्यक्तिरेखा वहिदा रहमान यांनी साकारली आहे. चित्रपटाची निर्मिती गीतकार शैलेंद्र यांचीच. शैलेंद्र यांच्यासह हसरत जयपुरी यांच्या गाण्यांनी या सिनेमाचं नाव अजरामर करून टाकलं. ‘पान खाये सैंया हमारो…’ , ‘दुनिया बनानेवाले क्या तेरे मन मे समाई’, ‘अजी हाँ… मारे गए गुलफाम’, ‘सजन रे झूठ मत बोलो खुदा के पास जाना है’, ‘सजनवा बैरी हो गए हमार’, ‘लाली लाली डोलीया मे लाली रे’, ‘चलत मुसाफिर मोहलिया रे पिंजड़ेवाली मुनिया’ अशी या सिनेमाची असंख्य गाणी अनेक पिढ्यांच्या ओठांवर आणि अगदी आजपर्यंतही खेळत राहिली आहेत. यापैकी काही गाण्यांचे शब्द हे रेणूंच्या कथांमधलेच आहेत. ‘अजी हाँ मारे गए गुलफाम’, ‘सजनवा बैरी हो गए हमार’, ‘सजन रे झूठ मत बोलो’, ‘लाली लाली डोलीया मे लाली रे’ अशी काही उदाहरणे सांगता येतील. या सिनेमाचे संवाद रेणू यांनीच लिहिले आहेत.

हिरामण आणि हिराबाई या व्यक्तिरेखांचा पत्रकार अनंत यांनी काही वर्षांपूर्वी एक शोध घेतला. रेणूंची हिरामण ही व्यक्तिरेखा कोणावर बेतली आहे? प्रत्यक्षात अशी कुठली व्यक्ती होती का? तेच हिराबाईचंही. या गोष्टींचा शोध घेण्यासाठी अनंत यांनी बरेच परिश्रम घेतले. तेव्हा असं लक्षात आलं की, या दोन्ही व्यक्तिरेखा प्रत्यक्षात रेणू यांनी पाहिलेल्या होत्या आणि त्यांना कथेत आणताना त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर खूप बदलही केले. या दोन्ही प्रमुख व्यक्तिरेखांचा शोध घेण्याची गोष्टही मोठी उत्कंठावर्धक आहे, ती मुळातून वाचायला हवी. रेणू यांचे संवाद, शैलेंद्र यांची गीतं यामुळे हा चित्रपट उल्लेखनीय ठरला. मुळातच कथेची भाषा लोकगीतासारखी काव्यात्मक आणि शैलीही तशीच जिवंत. पडद्यावर ती तेवढ्याच ताकदीनं उतरलीय.

पत्रकार अनंत यांनी ‘तीसरी कसम’च्या निर्मितीमागची जी कथा लिहिली आहे त्यात प्रत्येक गाण्याची जन्मकथाही आहे. राज कपूर यांच्याशी संबंधित या पुस्तकातला एक प्रसंग सांगायलाच हवा. ‘तीसरी कसम’चं चित्रीकरण सुरू झालं होतं आणि राज कपूर यांच्या तारखा काही केल्या जुळत नव्हत्या. सिनेमाचे निर्माते असलेले शैलेंद्र अस्वस्थ होते. अखेर शैलेंद्र एक दिवस आर. के. स्टुडिओत पोहोचले. राज कपूर त्या वेळी तिथं होते. शैलेंद्र यांनी ‘तीसरी कसम’च्या चित्रीकरणासाठी राज कपूर यांना वेळ काढण्यासंबंधी सांगितलं. नेमकं त्या वेळी ‘मेरा नाम जोकर’चं चित्रीकरण सुरू असल्याने राज कपूर व्यग्र होते. त्यांनी शैलेंद्र यांना हेच कारण सांगितलं आणि ‘तीसरी कसम’साठी वेळ देणं सध्या मुश्कील असल्याचंही सांगून टाकलं. ही गोष्ट शैलेंद्र यांच्या मनाला फारच लागली. खिन्न मन:स्थितीत ते आर. के. स्टुडिओमधून घरी आले. स्वत:ला त्यांनी आपल्या खोलीत कोंडून घेतलं. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत त्यांनी जे गाणं लिहिलं त्या गाण्याचे शब्द होते, ‘सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है…’ अर्थात मूळ रेणू यांच्या कथेतही याच आशयाचे बोल आहेत पण त्यातले शब्द काहीसे वेगळे. राज कपूर यांनी ‘तीसरी कसम’च्या आधी ‘जागते रहो’मधून ग्रामीण नायकाचं व्यक्तिमत्त्व पडद्यावर साकारलं होतंच, पण ‘तीसरी कसम’ची व्यक्तिरेखा किती तरी सरस उतरली. ‘पेट सब कुछ नही होता, पर प्यार भी तो सब कुछ नही होता…’ यासारखी सिनेमातली अनेक वाक्यं दर्शकांच्या काळजाला हात घालणारी आहेत.

‘तीसरी कसम’ची सगळीच गाणी ऐकली तर असं लक्षात येतं की, या गाण्यांना तिथल्या मातीचा गंध आहे. जणू शैलेंद्र यांनी ही सगळी गाणी हिरामणच्या गाव-शिवारात बसून लिहिली आहेत. आणि त्या भागात असलेल्या माणसांच्या तोंडीच ती अनेक वर्षांपासून असावीत असं वाटत राहतं. चित्रपटाच्या कथेशी ही सगळीच गाणी इतकी एकजीव झाली आहेत की कथा आणि या कथेत माळलेली ही गाणी वेगळी काढताच येऊ नयेत. ‘सजनवा बैरी हो गये हमार’सारखं गीत तिथल्या जनमानसात आधीच लोकप्रिय होतं आणि त्या भागात नाचगाणं करणारी मंडळी हे गाणं सादर करत.

‘तीसरी कसम’ हा सुखान्त असलेला चित्रपट नाही. चित्रपटाच्या व्यावसायिक कारणासाठी प्रत्यक्षातल्या कथेपेक्षा चित्रपटाचा शेवट वेगळा करू या अशी सूचना रेणू यांना त्या वेळी करण्यात आली होती, पण रेणू आपल्या मतावर ठाम होते. शेवट बदलला तर सिनेमा चालेल, आर्थिकदृष्ट्या यशस्वी होईल अशी राज कपूर यांचीही इच्छा होती. चित्रपटाचे निर्माते असलेल्या शैलेंद्र यांनाही ही सुखान्त गोष्ट मान्य झाली नाही. प्रत्यक्ष कथेतल्यापेक्षा वेगळा असा शेवट जेव्हा रेणू यांना ऐकवला गेला तेव्हा सुरुवातीला तो ऐकण्याचीही त्यांची अजिबात इच्छा नव्हती. अखेर त्यांना शेवटचं दृश्य वाचून दाखवलं गेलं. प्रत्यक्ष रेणू यांच्या कथेतला शेवट हा सैरभैर करणारा होता तर राज कपूर व अन्य मंडळींना हवा असलेला शेवट हा हिरामण आणि हिराबाईच्या मीलनाचा होता. त्यात ताटातूट नव्हती. हिरामण रेल्वे स्टेशनवर येतो. समोर हिराबाई उभी आहे. दोघांचेही डोळे पाणावतात. दोघे एकमेकांना बिलगतात. तेवढ्यात गाडी सुरू होते. दोघेही परस्परांना बिलगलेलेच आहेत. शेवटी गाडी दूर निघून जाते, डोळ्याआड होते. हे सगळं दृश्य रेणू यांना या बैठकीत ऐकवलं जातं आणि हा असा शेवट चालेल ना, असा प्रश्न विचारला जातो. त्यावर रेणूंचं उत्तर असतं, ‘‘अजिबात चालणार नाही.’’

राज कपूर, या सिनेमाचे वितरक आणि चित्रपटासाठी पैसा गुंतवणारे भांडवलदार या सर्वांसमक्ष रेणू यांनी निक्षून सांगितलं, ‘‘मला माझं मानधन मिळालंय. चित्रपटाच्या शेवटी तुम्हाला काही बदल करायचाच असेल तर मग माझं नाव लेखक म्हणून यात कुठेही घालू नका.’’ रेणू आणि शैलेंद्र या दोघांनी कोणत्याही तडजोडीला तयार न होता जणू चित्रपटाच्या संभाव्य व्यावसायिक यशावर पाणी सोडलं. पुढे शैलेंद्र यांनी या निग्रहाची फारच मोठी आर्थिक किंमत मोजली. अर्थात सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा फारसा चालला नाही. पण कालांतराने या सिनेमाची चर्चा पुन्हा सुरू झाली. जाणकार रसिकांपर्यंत तो सिनेमा जसजसा पोहोचू लागला आणि गाणी लोकप्रिय व्हायला लागली तेव्हा पुन्हा या सिनेमानं रसिकांना आकर्षित केलं. हा सिनेमा म्हणजे पडद्यावर लिहिलेली एक कविता आहे असा अभिप्राय त्या वेळी अनेकांनी व्यक्त केला… आजही तीच अनुभूती येते.

Story img Loader