तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे बहुतांश शिक्षण गुरुकुल पद्धतीच्या व्यवस्थेतून झाले. प्राज्ञपाठशाळा, वाईची शिक्षण पद्धती लक्षात घेता मौखिक अध्ययन-अध्यापनावर भर असायचा. त्यातही स्वयंशिक्षण हेच ज्ञानप्राप्तीचे महाद्वार होते. एका अर्थाने तर्कतीर्थांची प्राच्यविद्या विशारद म्हणून झालेली घडण ही अनौपचारिक शिक्षण पद्धतीची परिणती होती, म्हणून त्या घडणीला स्वयंप्रज्ञता आणि स्वावलंबनाचे अधिष्ठान होते. त्यात गुरू स्वामी केवलानंद सरस्वतींचा सिंहाचा वाटा होता. तो तर्कतीर्थांनी वेळोवेळी मान्य तर केला आहेच, शिवाय त्यांचे समाधी स्मारक उभारणे, त्यांच्या मीमांसाकोश (सात खंड), धर्मकोश (पाच खंड / २० भाग) यांचे संपादन व प्रकाशन कार्य, संस्कृत हस्तलिखित ग्रंथ विवरण सूची (भाग १, २) ची पूर्तता ही गुरूऋणातून मुक्त होण्याची सकारात्मक कृती आणि श्रद्धांजलीच होती. प्राच्यविद्या विशारद म्हणून त्यांनी लिहिलेले संस्कृत निबंध तसेच चरित्र, मानपत्र इत्यादींचे लेखन नोंद घेण्याजोगे ठरते. ‘शुद्धिसर्वस्वम्’ (१९२८), ‘भारतीय धर्मतिहासतत्त्वम्’ (१९३३), अस्पृश्यत्व -मीमांसा (१९३४), ‘श्रीकेवलानंदयतेश्चरित्रसार:’ (१९६०) यांचा त्यात अंतर्भाव आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा