‘संशोधनासाठी अर्थसाह्य हा विषय सरकार कसा हाताळते हे आपणा सर्वांना माहीतच आहे; पण अनुभव असा की, बड्या कंपन्यादेखील संशोधन संस्थांना अर्थपुरवठा करू इच्छितात त्या ‘सामाजिक दायित्वा’च्या नावाखाली- त्याऐवजी त्यांनी या संस्थांशी करार करावेत- संशोधनाचा दर्जा पाहून पुढे पैसा द्यावा की नाही हे ठरवावे, याला त्या राजी नाहीत’- ही प्रत्येक सच्च्या संशोधकाची खंत प्रा. सतीशचंद्र ओगले यांनाही असेल; किंबहुना आहेच. पण ही परिस्थिती बदलण्यासाठी ‘ट्वास पुरस्कारा’साठी त्यांची यंदा त्यांची झालेली निवड कारणीभूत ठरू शकते! ‘युनेस्को’ने स्थापन केलेल्या ‘द वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्सेस’ (ट्वास)च्या ट्रीस्टे- इटली येथील मुख्यालयातून दर दोन वर्षांनी, विकसनशील देशांतील सुमारे २० ते २५ जणांना हे पुरस्कार दिले जातात, त्यांची रक्कम ५००० डॉलर (सुमारे चार लाख २१ हजार रु.) इतकीच असली तरी ‘ट्वास’च्या प्रशस्ति-चिन्हाची प्रतिष्ठा मोठी असते… संशोधनातील विश्वासार्हतेवर ही जागतिक मोहोर समजली जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : व्यक्तिवेध : मुकुंद फणसळकर

पुणे शहराशी ओगले यांची नाळ जुळली आहे. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण आणि पीएच.डी.देखील पुणे विद्यापीठातील (आताचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ); त्यानंतर ते शिकवू लागले तेही या विद्यापीठात… पुढे ‘नॅशनल केमिकल लॅबोरेटरी’ (एनसीएल), पुण्याचीच ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च’ (आयसर), तसेच कोलकात्याची ‘टीसीजी-क्रेस्ट’ या संस्थांशी त्यांचा संबंध आला. ‘एनसीएल’मध्ये असताना त्यांनी १२ पेटंट मिळवून दिली; परंतु त्यांचा स्वभाव विद्यापीठीय संशोधकाचा आणि पुढली पिढी घडवणाऱ्या अध्यापकाचाच राहिला. भरलेल्या प्रेक्षागृहातही एखाद्या श्रोत्याच्या चेहऱ्यावरील चलबिचल वाचून, ‘तुम्हाला काही विचारायचे आहे का’ म्हणून त्याला बोलते करणारे प्रा. ओगले, संशोधन संस्थांतील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी ‘केवळ शोधनिबंध प्रकाशित होण्यात धन्यता मानू नका, ते हवेच; पण सोबतच या संशोधनातील पुढल्या संधीही शोधा,’ अशी प्रेरणा देत राहिले आहेत. त्यांचे स्वत:चे ५०० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झालेले असून या निबंधांची संदर्भक्षमताही उच्च दर्जाची आहे. सध्या ते ‘आयसर’च्या ऊर्जा-संशोधन विभागात मार्गदर्शन करतात तसेच ‘टीसीजी-क्रेस्ट’चे संचालकपद सांभाळतात.

हेही वाचा : व्यक्तिवेध : प्रतिभा राय

सौर ऊर्जेसाठी सिलिकॉन चकत्या आपल्याला आयातच कराव्या लागणार, त्याऐवजी सोडियम/ लिथियम आयन बॅटरी गावोगावी पोहोचू शकते, वाहनांतही तिचा वापर होऊ शकतो, यावर प्रा. ओगले यांनी भर दिला. ‘ट्वास’चा पुरस्कारदेखील ऊर्जा-साठवणूक व ऊर्जाबचत कार्यासाठी संशोधनाचे उपयोजन केल्याबद्दल त्यांना मिळणार आहे.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune professor sureshchandra ogale twas award 2026 the world academy of sciences css