रशियात औट घटका बंडाचे निशाण फडकवणारी वॅग्नर टोळी आणि तालिबान किंवा आयसिसच्या टोळय़ांमध्ये काही साम्यस्थळे निश्चित आढळतील. हे सगळेच भाडोत्री सैनिक. वॅग्नरला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी; तर तालिबानला पाकिस्तानी लष्करशहा आणि आयएसआय या गुप्तहेर संघटनेने पोसले आणि वाढवले. आयसिसला इस्लामी देशांचा असलेला छुपा पाठिंबा अखेरीस उघडकीस आलाच. सामरिक परिभाषेत ‘नॉन-स्टेट अ‍ॅक्टर’ किंवा ‘हायब्रिड वॉरफेअर’ नामक एक खूळ पुंड देशांनी जन्माला घालून वाढवले, त्यांतीलच या पगारी, भाडोत्री टोळय़ा. या सगळय़ांमध्ये एक समान दुवा म्हणजे अनेकदा त्या राष्ट्रराज्य म्हणवल्या जाणाऱ्या प्रदेशांतील प्रस्थापित सरकारांवरच उलटतात. वॅग्नरचे वरवरचे बंड हे अशाच प्रकारचे होते. या भाडोत्री किंवा खासगी फौजांना कसल्याही प्रकारचे बंधन नसते. ही मंडळी मानवी हक्क किंवा युद्धासंबंधी कोणत्याही आंतरराष्ट्रीय करारांच्या अधीन नसतात. त्यामुळेच त्या पदरी बाळगणे रशिया, इराण, पाकिस्तानसारख्या देशांना सोयीचे जाते. ‘नैतिक पाठिंबा’ अशा शब्दांचा वर्ख भाडोत्रींच्या दुष्कृत्यांना लावून त्यांचे पोशिंदे मोकळे होतात. कारण पोशिंद्यांचाच हेतू कुटिल असतो. वॅग्नर आर्मीला पुतिन यांनी प्रथम क्रिमियात वापरून पाहिले. तत्पूर्वी आणि नंतरच्या काळात हे टोळीवाले सीरिया, लिबिया, माली, सुदान अशा देशांमध्ये जाऊन आले. दिमित्री उतकिन या चेचेन्यात लढून आलेल्या रशियन लष्करी अधिकाऱ्याने ही संघटना स्थापली आणि आता तिचे परिचालन येवगेनी प्रिगोझिन हा एके काळी पुतिन यांच्या विशेष मर्जीतला अब्जाधीश करतो. युक्रेनमध्ये रशियाने गतवर्षी फेब्रुवारीत सैन्य घुसवले, त्यावेळी काही ठाण्यांवर हल्ल्यांची जबाबदारी वॅग्नर गटावर सोपवण्यात आली होती. प्रिगोझिनच्या अमलाखाली जवळपास ३० हजारांचे सैनिक असल्याचे सांगितले जाते. यांतील बहुतेक जण रशियन लष्करात चाकरी करून आलेले आहेत. त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रास्त्रेही आहेत. युक्रेनमध्ये सुरुवातीच्या मुसंडीनंतर अनेक ठिकाणी रशियन फौजांना युक्रेनच्या फौजांकडून कडवा प्रतिकार होऊ लागला आणि मोहीम थंड पडू लागली. युक्रेनसारख्या आकाराने मोठय़ा परंतु लष्करीदृष्टय़ा सामान्य कुवतीच्या देशासमोर रशियाला अपेक्षेप्रमाणे यश आले नाही, त्याच वेळी रशियन लष्कराच्या सुमार सिद्धतेचा आणि रशियन सामग्रीच्या कुचकामीपणाचा अंदाज सामरिक विश्लेषकांना येऊ लागला होता. क्रिमिया युक्रेनने मागे हातचा जाऊ दिला होता. पण डॉनेत्स्क आणि लुहान्स्क या दोन रशियाबहुल प्रांतांचा ताबा युक्रेन सहजी सोडत नव्हता. शिवाय कीव्ह, खारकीव्ह, खेरसन अशा मोठय़ा शहरांचे रक्षणही अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या नेतृत्वाखाली युक्रेनच्या फौजांनी प्राणपणाने केले. जे युद्ध सहज जिंकून आपली प्रतिमा किमान रशियात उजळविण्यासाठी पुतिन उतावीळ झाले होते, त्या युद्धानेच पुतिन यांच्या आणि रशियन व्यवस्थेच्या मर्यादा उघडय़ा पाडल्या. या स्थितीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न वॅग्नर गटाने घेतला.

कोणत्याही युद्धात आक्रमकांच्या यशाची शक्यता सुसूत्रतेत सर्वाधिक असते. युक्रेनमध्ये  अधिकृत रशियन फौज आणि वॅग्नर गट. त्यांचे स्वरूप आणि उद्दिष्टे यांच्यात मेळ घालण्याची जबाबदारी पुतिन वा त्यांच्या सल्लागार, सहकाऱ्यांची होती. ती पाळली गेलेली दिसत नाही. निव्वळ शस्त्रास्त्रांनिशी दुसऱ्या देशात जाऊन हैदोस घालणे वेगळे आणि युद्धजन्य स्थितीमध्ये सुसूत्र मोहिमा आखून लढायांमागून लढाया लढवत पुढे सरकणे निराळे. रशियन लष्कराला इंच-इंचही पुढे सरकता येत नसताना, मध्यंतरी वॅग्नर टोळीवाल्यांनी बाख्म्मुत हे युक्रेनचे शहर काबीज केल्याची दवंडी पिटवली. तसे पाहायला गेल्यास हे सामान्य यश नाही. परंतु बाख्म्मुत खरेच काबीज केले का, याविषयी रशियातूनच अधिकृत घोषणा होत नव्हती. त्यावेळीच रशियन लष्कर आणि वॅग्नर यांच्यातील विसंवादाचे दर्शन घडले होते. वॅग्नरचा म्होरक्या प्रिगोझिन याने त्याच वेळी रशियन लष्करी नेतृत्वाच्या कथित अकार्यक्षमतेविषयी बोलायला सुरुवात केली होती. पुढे तर रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोइगू आणि लष्करप्रमुख व्हॅलेरी गेरासिमॉव यांच्यावर थेट शाब्दिक शरसंधान करण्यासही प्रिगोझिनने मागेपुढे पाहिले नाही. रशियान लष्कराकडून माझ्या सैनिकांना लक्ष्य केले जात असल्याचा गंभीर आरोप प्रिगोझिनने केला होता. त्यावेळी विसंवादाची ही झळ मॉस्कोपर्यंत पोहोचणार, हे स्पष्ट झाले होते.

Success Story An inspiring journey from selling balloons
Success Story: रस्त्यांवर फुगे विकण्यापासून ते करोडोंची कंपनी उभी करण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Russian President Vladimir Putin, nuclear weapons policy,
विश्लेषण : रशियाचे अण्वस्त्र धोरणच बदलण्याचा पुतिन यांचा निर्णय कशासाठी? या बदलांमुळे अणुयुद्धाची शक्यता बळावणार?
construction houses mangroves, state government,
खारफुटीवर घरे बांधल्याच्या तक्रारीच्या तपासणीचे राज्य सरकारला आदेश
Why will families migrate from tiger protected areas
वाघांच्या संरक्षित क्षेत्रांतील कुटुंबांचे स्थलांतरण का होणार? समस्या काय? आव्हाने कोणती?
pune ips bhagyashree navtake marathi news
पोलीस उपायुक्त नवटक्के यांच्याविरुद्धच्या गुन्ह्याचा तपास ‘सीबीआय’कडे? ‘बीएचआर’ पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरण
Union Minister Of port and shipping approved wage hike of port and dock workers
बंदर, गोदी कामगारांना साडेआठ टक्के वेतनवाढ, केंद्रीय बंदर व जहाजमंत्र्यांची मंजुरी
Satish Menon, Geojit Financial,
‘परताव्याची अपेक्षा १५ टक्क्यांच्या माफक मर्यादेत राखणे यथोचित’

कुंथलेल्या लष्करी मोहिमेदरम्यान अशा प्रकारे विसंवाद निर्माण झाल्यानंतर पुतिन यांनी प्रिगोझिन आणि मॉस्कोतील लष्करी धुरीणांना वठणीवर आणायला हवे होते. सर्वशक्तिमान आणि महत्त्वाकांक्षी नेत्याकडून हेच अपेक्षित असते. पण पुतिन हे महत्त्वाकांक्षी असले, तरी सर्वशक्तिमान राहिलेले नाहीत. रशियन लष्कराच्या सिद्धतेविषयी पुरेसा अंदाज न बांधताच त्यांनी युक्रेन युद्ध उचकटून काढले. वॅग्नर टोळीने यात नेमकी कोणती भूमिका पार पाडायची, हेही पुतिन सुनिश्चित करू शकले नाहीत. परवाच्या बंडानंतर तर पुतिन यांचे वॅग्नर गटावर नियंत्रण तरी आहे का, याविषयीच शंका उपस्थित होते. ज्यांचा उल्लेख पुतिन ‘देशद्रोही’ आणि ‘खंजीर खुपसणारे’ असा करतात, त्यांची अखेर मृत्युदंडातूनच होणार हे निश्चित असते. पण प्रिगोझिन आणि वॅग्नर यांच्याबाबतीत घडले ते भलतेच. बेलारूसचे पुतिनधार्जिणे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी मध्यस्थी करून प्रिगोझिन आणि वॅग्नरवाल्यांना बेलारूसमध्ये सामावून घेतले. मध्यस्थी ही सहसा तुल्यबळ व्यक्ती किंवा संघटनांमध्ये केली जाते. मग याचा अर्थ प्रिगोझिन बलवान झाला, की पुतिन कमुकवत झाले? वॅग्नरवाल्यांविरुद्ध देशद्रोहासारखे गंभीर आरोप मागे घेत असल्याचे रशियातर्फे जाहीर करण्यात आले आहे. मग बंड घडलेच नाही, असे समजायचे का? या सगळय़ा घटना पुतिन यांची सत्तेवरची पकड खिळखिळी झाल्याचे स्पष्ट दर्शवतात. पुतिन यांना युक्रेनवरील दुसरे आक्रमण (पहिले आक्रमण क्रिमियावरील) हाताळता आले नाही आणि त्यांच्या सत्तेला आव्हान देणाऱ्या ‘देशद्रोही बंडखोरां’नाही शासन करता आले नाही. रशियात गतशतकाच्या पहिल्या टप्प्यातील सम्राट निकोलस झार याचे शासन आणि अखेरच्या टप्प्यातील सोव्हिएत सरकार आंतरिक खिळखिळेपणातून उलथवले गेले. तसेच पुतिन यांच्या बाबतीतही घडू शकते. अशा प्रकारच्या क्रांतिकारी सत्ताबदलांना दोन घटक कारणीभूत असतात – देशांतर्गत बजबजपुरी आणि अकार्यक्षम नेतृत्व. हे दोन्ही सध्याच्या रशियामध्ये प्रस्तुत आहेत. त्यामुळे हा देश पुन्हा एकदा अस्थैर्याच्या उंबरठय़ावर आहे. आणि ही बाब जगाच्या चिंतेत भर टाकणारीच ठरते. भारत अजूनही त्या देशावर संरक्षण सामग्री आणि स्वस्त इंधनाच्या बाबतीत अवलंबून आहे. या दोन्हींचे पर्यायी स्रोत नजीकच्या भविष्यात उपलब्ध होण्याची शक्यता धूसर. वॅग्नर टोळी पुन्हा युक्रेनमध्ये जाणार की आणखी कुठे भरकटणार याविषयी स्पष्टता नाही. जगात संघर्षक्षेत्रे किंवा कॉन्फ्लिक्ट झोन्स अनेक आहेत. इस्रायल-पॅलेस्टाइन, आफ्रिका, सीरिया, अफगाणिस्तान.. आणि पाकिस्तान! वॅग्नरसारख्या भाडोत्री सैनिकांची निष्ठा ही अशा संघर्ष-क्षेत्रांशीच अधिक असते. तेव्हा ती ब्याद निराळय़ा मार्गाने भारतालाही सतावू शकते. अर्थात तूर्त वॅग्नरविषयी आणि स्वत:च्या भवितव्याविषयी चिंता करण्याची वेळ पुतिन यांच्यावरच आलेली आहे.