योगेंद्र यादव

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’ची नवी आवृत्ती असलेली ‘भारत न्याय यात्रा’ मणिपूरमधून १४ जानेवारीपासून सुरू होत आहे.

तुम्ही एकाच नदीत दोनदा पाऊल टाकू शकत नाही. तुम्ही पुन्हा पाऊल टाकताच, जुने पाणी वाहून गेलेले असते आणि ती एक नवीन नदी असते, अशा आशयाची ग्रीक म्हण आहे.

काँग्रेसच्या नव्या ‘भारत न्याय यात्रे’बाबतही तेच म्हणता येईल. राहुल गांधींची ती दुसरी ‘भारत जोडो यात्रा’ नाही, तर नवीन यात्रा आहे. ही नवीन यात्रा तेव्हापेक्षा वेगळया कालखंडात, वेगळया भूप्रदेशात होते आहे. दरम्यानच्या काळात राहुल गांधीही बदलले आहेत. केवळ सभा आणि पत्रकार परिषदा घेण्यापेक्षा या यात्रेच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणण्याची नियोजित मोहीम अधिक चांगली आहे, यात शंका नाही. पण या पद्धतीच्या यात्रेतून किती राजकीय फायदा मिळेल हा मुख्य प्रश्न आहे. ही नवी यात्रा नवीन आव्हाने आणि नव्या संधींचा कसा सामना करते यातून ते कळेल. राहुल गांधी, काँग्रेस पक्ष आणि देशाच्या भवितव्यासाठी ही यात्रा किती महत्त्वाची होती, हे त्यावरूनच ठरेल.

अर्थात या दोन्ही यात्रांमध्ये वरवर काही गोष्टी समान आहेत, अगदीच नाही असे नाही. २०२२ मध्ये उदयपूरमध्ये पहिल्या ‘भारत जोडो यात्रे’ची घोषणा करण्यात आली. तेव्हाचे वातावरण वेगळे होते. भाजपच्या उत्तर प्रदेशातील अनपेक्षित विजयानंतर आणि विरोधकांमध्ये आलेल्या निराशेच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली होती. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये झालेल्या भाजपच्या आश्चर्यकारक विजयानंतर आता ‘भारत न्याय यात्रा’ जाहीर करण्यात आली आहे. या तीन राज्यांमधील भाजपच्या विजयाने तेलंगणामधील काँग्रेसचा उल्लेखनीय विजय झाकोळला गेला होता. मागच्या वेळेप्रमाणे यावेळीही विरोधी पक्ष त्यातही विशेषत: काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि समर्थकांच्या नैतिक धैर्यावर परिणाम झाला आहे. अर्थात असे असले तरी दोन भारत जोडो यात्रांमध्ये एक मुख्य फरक आहे. पहिली भारत जोडो यात्रा झाली ती सार्वत्रिक निवडणुकीच्या जवळपास दोन वर्षे आधी. तर दुसरी यात्रा लोकसभा निवडणुकीला आता चार महिन्यांहून कमी कालावधी उरलेला असताना होत आहे. याशिवाय, लोकांमध्ये पुन्हा आशा जागृत करणे अवघड आहे. अलीकडच्या निवडणुकांमधील पाच राज्यांतील निकालांपेक्षा भाजपचा तेव्हाचा उत्तर प्रदेशमधील विजय अधिक निर्णायक असला तरी, यावेळी भाजपविरोधी शक्तींचे जास्तच नैतिक नुकसान झाले आहे. त्यामुळे, केवळ आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमधलेच नाही तर इंडिया आघाडीतील इतर पक्षांमधील चैतन्य जागृत करणे, हे राहुल गांधींसमोरील पहिले आणि सर्वात मोठे आव्हान आहे.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : लाल समुद्रात लाल बावटा!

हे दुसऱ्या आव्हानाशी संबंधित आहे. भारत जोडो यात्रा आयोजित करण्यात आली होती, तेव्हा इंडिया युती वगैरे काही नव्हते. काँग्रेसच्या काही प्रादेशिक मित्रपक्षांनी जसे की तमिळनाडूमध्ये द्रमुक, केरळमधील यूडीएफ, महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि शिवसेना, उत्तर प्रदेशात आरएलडी या पक्षांनी भारत जोडो यात्रेला वेगवेगळया प्रमाणात पाठिंबा दिला. पण काहीजण बरोबर आले म्हणून किंवा काहीजण आले नाहीत म्हणून ही यात्रा यशस्वी झाली असे नाही. उलट यावेळी इंडिया आघाडी झालेली आहे आणि जागावाटपावर गांभीर्याने वाटाघाटी सुरू आहेत. काँग्रेस आणि काही प्रादेशिक पक्षांमध्ये तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जाहीर केलेल्या देशव्यापी यात्रेतून काँग्रेसबरोबर युती केलेल्या पक्षांसाठी काही संमिश्र संकेत आहेत. यातून सर्व भाजपेतर शक्तींना बळकटी मिळेल  म्हणून हे पक्ष यात्रेचे स्वागत करू शकतात, आणि दुसरीकडे इंडिया आघाडीतील नेतृत्वाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही, म्हणून त्यांना या टप्प्यावर धास्तीही वाटू शकते. हा मुद्दा गंभीर आहे कारण आगामी यात्रा पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, यूपी आणि महाराष्ट्र या राज्यांमधून जाणार आहे. तिथे २०२४ च्या निवडणुकांच्या निकालांमध्ये इंडिया आघाडातील युती महत्त्वाची आहे. या यात्रेत इंडिया आघाडीतील भागीदारांना जोडण्याचा मार्ग राहुल गांधींना शोधावा लागेल.

तिसरे आव्हान आघाडीबाहेरून आहे. भाजप आणि त्यांचे सर्व सहकारी अयोध्येतील राम मंदिराकडे जास्तीतजास्त लोकांनी यावे यासाठी प्रयत्न करत आहेत. या समारंभाचा प्रभू रामाशी, त्यांच्या ‘मर्यादा‘ किंवा श्रद्धा यांच्याशी काहीही संबंध नाही. लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी केलेली ही राजकीय जमवाजमव तसेच प्रचारमोहीम असू शकते. त्याच्या परिणामी विरोधक बाजूला फेकले जाऊ शकतात.

भारत न्याय यात्रा मात्र एकदम योग्य योग्य वेळी सुरू होते आहे, असे म्हणता येईल. तिच्यासमोर  खरे आव्हान आहे ते भावनिक, सांस्कृतिक आणि धार्मिक पातळीवर भाजप करत असलेले आवाहन माध्यमे ज्या पद्धतीने उचलून धरत आहेत, त्याला नीट उत्तर देण्याचे.

‘न्याय’ हे काँग्रेसचे उत्तर आहे, हे प्रस्तावित यात्रेच्या नावावरून स्पष्ट होते. ही एक चांगली सुरुवात आहे. भाजपच्या भावनिक आवाहनाचा प्रतिकार करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग हा आप-शैलीतील हिंदूुत्वाची कास धरणे हा नसून लोकांच्या रोजच्या जगण्यातील प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणे हा आहे. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय पातळीवर न्यायाची मागणी करणे हा योग्य संदेश आहे. संसदेतील घुसखोरीनंतर राहुल गांधी यांनी बेरोजगारी ही देशासमोरील सर्वात मोठी समस्या असल्याचा पुनरुच्चार केला आहे. सामाजिक न्यायासाठीची आपली बांधिलकी दर्शवण्यासाठी काँग्रेस पक्षाने जात जनगणनेची मागणी लावून धरली आहे. परंतु प्रतिकथन (काऊंटर नरेटिव्ह) करण्यासाठी ते पुरेसे असू शकत नाही. न्याय हा मुद्दा ठोस धोरणातून स्पष्ट होणे आवश्यक आहे. विशेषत: तरुण, महिला, गरीब, शेतकरी आणि सामाजिकदृष्टया वंचित समुदायांसाठी याचा अर्थ काय असेल, हे स्पष्ट केले पाहिजे. या सगळयाची लोकांना समजेल अशा भाषेत खात्री दिली पाहिजे. आणि त्यामध्ये एक सांस्कृतिक घटक असायला हवा जो भाजपच्या भावनिक प्रचाराला उत्तर ठरू शकेल.

हेही वाचा >>> उलटा चष्मा : ऐक सूनबाई..

हे सगळे अर्थातच सोपे नाही. आधीच्या ‘भारत जोडो यात्रे’तून त्यासंदर्भातील पुरेसा आणि स्पष्ट संदेश लोकांपर्यंत पोहोचवला गेला नव्हता. ‘भारत न्याय यात्रे’ला लोकांच्या भाषेतून, त्यांच्या रोजच्या जगण्यातील प्रतिमा प्रतीकांमधून, ते वापरत असलेल्या म्हणी, वाक्प्रचार यांच्या माध्यमातून लोकांशी उत्तम आणि धारदार संवाद साधला जाईल यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. भारत जोडो यात्रा लाखो भारतीयांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरली. पण तिला लोकांना कायमस्वरूपी जोडून घेता आले नाही. ‘भारत न्याय यात्रे’ने निवडणुकीच्या तोंडावर यात्रेत येणाऱ्या लोकांना स्वयंसेवक आणि कार्यकर्ते म्हणून जोडून घेण्यासाठी एक यंत्रणा तयार करणे आवश्यक आहे. नागरी सामाजिक संघटना, लोक चळवळी आणि काँग्रेस पक्षाबाहेरील सामान्य नागरिकांच्या सहभागामुळे भारत जोडो यात्रा काही प्रमाणात यशस्वी झाली. आता या यात्रेकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातले प्रयत्न यावेळी वाढवावे लागतील.

१४ जानेवारीला संक्रांतीच्या आदल्या दिवशी भारत न्याय यात्रा सुरू होत आहे. हा दिवस ऋतूंच्या संक्रमणाचे प्रतीक आहे. देशातील राजकीय परिस्थितीत संक्रमण होणे अत्यंत आवश्यक आहे. अशा संक्रमणाचे संकेत तो देईल का? २०२४ च्या निडणुकीआधी अशा पद्धतीने देशाचे भवितव्य निश्चित करण्याची शेवटची संधी भारत न्याय यात्रा संधी देते आहे.

लेखक ‘जय किसान आंदोलन’ आणि ‘स्वराज इंडिया’चे संस्थापक आहेत. 

yyopinion@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi to start bharat nyay yatra from manipur from january 14 zws