‘बुंदेलखंडातल्या बेडिया समाजाशी जुळलेल्या कलाकाराचा गौरव ‘पद्मश्री’ने आता होतो आहे’ असे दिशाभूलकारक कौतुकही रामसहाय पांडे यांना २०२२ मध्ये, वयाच्या ९४ व्या वर्षी ‘पद्मश्री’ जाहीर झाली तेव्हा खुद्द ‘ऑल इंडिया रेडिओ’कडून झेलावे लागले होते. यातल्या ‘बेडिया समाजाशी’ पांडे हे ‘जुळले’ (इंग्रजीत ‘लिंक्ड टू’ किंवा हिंदीत ‘जुडे हुए’) असल्याचा उल्लेख जणू ते त्या समाजातील असल्यासारखा भासण्यातून कुणाला ‘सामाजिक न्याय’चे समधान मिळाले असेल, पण वास्तव तसे नव्हते. ‘ब्राह्मण असूनही ‘त्यांच्या’सारखा नाच काय करतोस?’ म्हणून १९५० च्या दशकात कुणा समाजगटाने रामसहाय यांना काही वर्षे तरी बहिष्कृत ठरवले होते. त्या अवहेलनेवर मात करून ते मृदुंग वाजवत, नाचत राहिले आणि बुंदेलखंडातल्या ‘राई’ नृत्यप्रकाराला आंतरराष्ट्रीय मंचावर त्यांनी नेले. भारतीय लोककलांच्या स्वातंत्र्योत्तर, आधुनिक काळातल्या वाटचालीत त्यांचेही योगदान होते. या रामसहाय पांडे यांचे दीर्घ आजारानंतर गेल्या मंगळवारी (८ एप्रिल) निधन झाले, तरी त्यांची संघर्षगाथा अनेकांना प्रेरक राहील.

रामसहाय यांच्या वयाच्या सहाव्या वर्षी त्यांचे वडील वारले आणि त्यानंतर सहा वर्षांत आईनेही अखेरचा श्वास घेतला. भावंडे बहिणीकडे राहू लागली. रामसहाय शाळा सांभाळून गुरे वळायला जाऊ लागले. पण हा दिनक्रम एका संक्रांतीच्या जत्रेपासून हळूहळू मोडत गेला. त्या जत्रेत राई नृत्य पाहून रामसहाय इतके प्रभावित झाले की, हेच आपण करायचे, असे त्यांनी ठरवले. शाळाही बुडवून, शेतात ते मृदुंग वाजवून पाहू लागले. राई नृत्य करणाऱ्या महिला बेडिया समाजाच्या आणि तथाकथित खालच्या जातीच्या मानल्या जात असल्यामुळे त्यांचे शीलही भ्रष्टच मानले जाई. त्या बायांबरोबर रामसहाय नाचणार, म्हणून भाऊदेखील चिडला. पण रामसहाय बधले नाहीत. त्यांनी आधी लपूनछपून, नंतर घरच सोडून मृदुंगवादन- आणि गळ्यात मृदुंग बांधून गिरक्या घेत नर्तन- सुरूच ठेवले. नर्तनाची ही आवर्तने वाढली… आधी बुंदेलखंडच्या पंचक्रोशीत – सागर ते छतरपूर आणि दतिया, झांशी ते ललितपूर- सर्व ठिकाणी त्यांनाच निमंत्रणे मिळू लागली. एव्हाना ‘समाजाचा’ रागही निमाल्यामुळे विवाह होऊ शकला. याच काळात देशभर लोकनृत्य, लोककलांना सरकारी आश्रयाचे प्रस्थ वाढत होते… पुपुल जयकर, कमलादेवी चट्टोपाध्याय, मुल्कराज आनंद अशी भारतीयतेबद्दल खरोखरची आस्था असलेली अभ्यासू मंडळी तेव्हा होती आणि ‘फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ला परदेशांत प्रतिष्ठा होती. त्याहीमुळे असेल, पण रामसहाय यांच्या चमूचे कार्यक्रम आधी मध्य प्रदेशात ठिकठिकाणी, पुढे अन्य काही राज्यांत आणि १९७८ ते १९८९ या काळात तर परदेशांमध्येही होऊ लागले. मॉरिशसमध्ये तेथील भारतीयांकडून निमंत्रण, जपानमध्ये १९८४ सालात महिनाभराचा दौरा हे रामसहाय आणि चमूसाठी संस्मरणीय ठरले. अखेरचा परदेशी कार्यक्रम त्यांनी २००६ मध्ये दुबईत केला. पंच्याहत्तरीनंतर मात्र चमूची सूत्रे त्यांनी पुढल्या पिढीकडे दिली. ‘आदिवासी लोककला परिषदे’वर मध्य प्रदेश सरकारने त्यांची नियुक्ती केली होती, तसेच ‘बुंदेली लोकनृत्य व नाट्यकला परिषद’ ही संस्था स्थापून रामसहाय यांनी दिल्ली/ लखनऊच्या मुलामुलींनाही ‘राई’चे धडे दिले होते. लोककलेचा प्राण टिकवून ती पुढे नेण्याची कृतार्थता त्यांच्या आयुष्याला होती.