१५ रमजान १४४६? वाचून नवल वाटलं ना? ही आहे आजची तारीख. हिजरी कालगणनेनुसार.
‘हिजरी कालगणना’, ‘रमजानचा महिना’, ‘रोजे’, ‘ईद’, ‘हज यात्रा’ या सगळ्या गोष्टी थोड्याफार ऐकून माहीत असतात आपल्याला. आज हे सगळं नीट समजून घेऊ.
इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत महंमद पैगंबर. त्यांचा जन्म झाला इ.स. ५७०मध्ये. लहान वयातच त्यांच्यावरचं मात्यापित्याचं छत्र हरपलं. त्यांच्या आजोबांकडे, काकांकडे वगैरे ते लहानाचे मोठे झाले. पुढे साधारण २५ वर्षांचे असताना त्यांचा विवाह झाला. पण प्रार्थना, ध्यानधारणा यांकडे त्यांचा ओढा होता. ते वारंवार जवळच्याच एका डोंगराच्या ‘हिरा’ नावाच्या गुहेत अनेक रात्री एकांतात प्रार्थनेसाठी जात. गॅब्रिएल (जिब्रील) नावाच्या एका देवदूतामार्फत देवाकडून प्रथमच दिव्य संदेश प्राप्त झाल्याचं त्यांनी सर्वांना सांगितलं ते वर्ष होतं इ.स. ६१०. त्यावेळी त्यांचं वय होतं ४० वर्षं. तिथून पुढे अगदी त्यांच्या देहावसानापर्यंत त्यांना असे दिव्य संदेश येतच राहिले. मात्र तो पहिला संदेश मिळाल्यावर सुमारे तीन वर्षांनी, म्हणजे इ.स. ६१३ पासून त्यांनी या शिकवणीचा प्रसार करायला सुरुवात केली.
ही गोष्ट त्यावेळच्या तिथल्या प्रस्थापितांना रुचली नाही. आणि प्रस्थापितांनी हजरत महंमद पैगंबरांच्या अनुयायांचा छळ सुरू केला. अनेक वर्षं हा छळ सहन केल्यावर सन ६२२ मध्ये हजरत महंमद पैगंबर यांनी मक्केहून मदीनेला प्रयाण केलं. हे असं ‘सोडून जाणं’ याला अरबी भाषेत शब्द आहे ‘हिजरा’. इस्लाम धर्मात या घटनेला फार महत्त्व आहे कारण या घटनेनंतर प्रथमच एका ‘मुस्लीम’ समुदायाची निर्मिती झाली. आणि म्हणून इस्लाम धर्मीयांची कालगणना या घटनेच्या वर्षापासून सुरू होते. आणि ‘हिजरा’च्या वर्षापासून सुरुवात म्हणून ‘हिजरी’ कालगणना.
ही कालगणना तशी अगदी साधी सोपी आहे. नवा चंद्र दिसला की नवा महिना सुरू. नीट लक्ष द्या. ‘नवा चंद्र’ म्हणजे अमावास्येनंतर दिसणारी चंद्रकोर. शुक्लपक्षातली. त्यामुळे ही दिसते पश्चिम आकाशात. सूर्यास्तानंतर लगेच. नव्या चंद्राबरोबर नवा महिना सुरू होत असल्यामुळे महिना २९ किंवा ३० दिवसांचा असतो.
पण ‘नवा चंद्र दिसला की नवा महिना सुरू’ असं जर आहे तर तो नव्या महिन्याचा पहिला दिवस कधी सुरू होतो असं म्हणायचं? ज्या दिवशी ती चंद्रकोर दिसते तो दिवस की त्यानंतरचा दिवस? दोन्ही पर्याय चुकीचे. नव्या महिन्याचा पहिला दिवस हा त्या चंद्रदर्शनाबरोबरच सुरू होतो. किंवा त्या सूर्यास्तानंतर सुरू होतो म्हणा ना! हो हो, हिजरी कालगणनेनुसार दिवसाची सुरुवात आणि अर्थातच, शेवट सूर्यास्तसमयी होतो. आणि त्याच न्यायाने महिन्याची आणि वर्षाची सुरुवातदेखील सूर्यास्तालाच होते.
म्हणजे थोडक्यात हा लेख जर तुम्ही आज १५ मार्चला सूर्यास्तापूर्वी वाचत असाल तर तो हिजरी कालगणनेनुसार १५ रमजान या दिवशी वाचत आहात. पण हेच जर सूर्यास्त होऊन गेला असेल तर हिजरी कालगणनेनुसार १६ रमजान सुरू झाला!
या कालगणनेत ‘आठवडा’ ही संकल्पनादेखील आहे. आणि आठवड्याचे वार सातच आहेत. पण गंमत म्हणजे वारांची नावं अशी नाहीतच. चक्क ‘पहिला दिवस’, ‘दुसरा दिवस’ असे दिवस मोजायचे. सहाव्या आणि सातव्या दिवसाला मात्र स्वतंत्र नाव आहे. सहावा दिवस म्हणजे ‘अल-जुमा’. अरबी भाषेत ‘जुमा’ म्हणजे ‘संमेलन’ किंवा ‘एकत्र येणे’. आणि सातवा दिवस म्हणजे ‘अस-सब्त’ – विश्रांतीचा दिवस!
वारांची नावं म्हणजे एका अर्थाने दिवसांची नावं. आणि दिवसाची सुरुवात तर सूर्यास्ताबरोबर होते. त्यामुळे दिवसाचं नावही सूर्यास्तानंतर बदलतं. मघाचंच उदाहरण द्यायचं तर आज शनिवारी सूर्यास्तापूर्वी ‘अस-सब्त’ होता. सूर्यास्तानंतर मात्र ‘अल-अहद’, अर्थात ‘पहिला दिवस’ सुरू झाला. आणि उद्याच्या सूर्यास्तानंतर ‘अल-इथनैन’, अर्थात ‘दुसरा दिवस’ सुरू होईल.
या कालगणनेत एकूण १२ महिने असतात. या महिन्यांची नावंही मोठी गमतीची आणि अर्थपूर्ण. उदाहरणार्थ पहिल्या महिन्याचं नाव आहे ‘मुहर्रम’. हा महिना पवित्र मानतात आणि त्यात युद्ध, लढाई वगैरे निषिद्ध आहे. गंमत अशी की ‘मुहर्रम’ या शब्दाचा अर्थच मुळी ‘निषिद्ध’ असा आहे!
किंवा सध्याच्या महिन्याचं नाव पाहा. ‘रमजान’. अरबी भाषक याचा उच्चार ‘रमादान’ असा करतात. पण फार्सीचा प्रभाव असणाऱ्या ठिकाणी याचा उच्चार ‘रमजान’ असा करतात. ‘रमजान’चा शब्दश: अर्थ प्रचंड उष्मा असा होतो. अगदी जाळून-पोळून काढणारा उष्मा. हिजरी कालगणनेनुसार हा नववा महिना. या महिन्याचं महत्त्व अशाकरिता की हजरत महंमद पैगंबरांना देवाचा संदेश प्रथम मिळाला तो याच महिन्यात.
असो. ही सगळी ऐतिहासिक माहिती झाली. पण यातल्या गणिताचं काय? तेही आपण पाहूच. पण पुढच्या लेखात.
Kalache.ganit@gmail.com