एल. के. कुलकर्णी भूगोलकोशाचे लेखक आणि भूगोलाचे निवृत्त शिक्षक

एव्हरेस्टची उंची निश्चित करण्यासंदर्भातल्या श्रेयवादाकडे राधानाथांनी कधीच लक्ष दिले नाही. आपले काम करून ते बाजूला झाले. पण त्यामुळेच त्यांचे योगदान आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाची  उंची एव्हरेस्टच्या तोडीची ठरली.

Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Singh said Modi treated Maharashtra like step mother running 2 lakh crore projects in Gujarat
“पंतप्रधान मोदी यांची महाराष्ट्राला सावत्र वागणूक,” संजय सिंह यांचा आरोप
gold prices dropping post Diwali it will reach 70000 per 10 grams soon
सोन्याचे दर ७० हजारांपर्यंत येणार? आणखी मोठी घसरण…
accountability of devendra fadnavis declined due to his divisive politics says supriya sule
फोडाफोडीच्या राजकारणामुळे फडणवीसांची विश्वसनीयता कमी; सुप्रिया सुळे
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
mallikarjun kharge criticize pm narendra modi in nagpur
पंतप्रधान देशाचे असतात, पण मोदी मात्र सर्व चांगले प्रकल्प आपल्याच गृहराज्यात…खरगेंची जोरदार टीका

भारताच्या ट्रिग्नोमेट्रिक सर्वेक्षणाच्या भव्य प्रकल्पात भारतीयांचाही मोठा वाटा होता. राधानाथ सिकधर, मोहसीन हुसेन, नैनसिंग व किशनसिंग रावत, किंथुप इत्यादींचे योगदान जागतिक पातळीवर नोंदवले गेले. राधानाथ सिकधर हे त्यापैकी एक महत्त्वाचे नाव.

त्यांचा जन्म ५ ऑक्टोबर १८१३ रोजी कोलकाता येथे झाला. आर्थिक स्थिती बेताची. एका साध्या स्थानिक शाळेत शिकून त्यांनी १८२४ मध्ये हिंदू महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. गणितात त्यांचे प्रावीण्य असामान्य होते. १८३० मध्ये त्यांचा संबंध महाविद्यालयामधील प्राध्यापक जॉन टायटलर यांच्याशी आला. तोपर्यंत राधानाथांनी न्यूटन यांचा प्रिन्सिपीया तसेच इतर गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञांच्या गाजलेल्या पुस्तकांचा फडशा पाडला होता. भूमितीत काही नवीन पद्धती शोधल्या होत्या.

त्या काळात जॉर्ज एव्हरेस्ट हे सव्‍‌र्हेच्या कामासाठी एखाद्या हुशार व प्रवीण अशा गणितज्ञाच्या शोधात होते. टायटलर यांनी एव्हरेस्टकडे राधानाथांची शिफारस केली. १९ डिसेंबर १८३२ रोजी वयाच्या एकोणिसाव्या वर्षी ट्रिग्नोमेट्रिक सव्‍‌र्हेच्या कामात ‘गणन ( कॉम्प्युटर) उपसाहाय्यक’ म्हणून राधानाथ रुजू झाले. त्यांचा पगार होता ३० रुपये. ग्रेट आर्क प्रकल्प, भूपृष्ठाची वक्रता आणि त्रिकोणमितीय सव्‍‌र्हेची गणिते यावर राधानाथांचे विशेष प्रभुत्व होते. त्यासाठी स्वत:च्या अभ्यासातून त्यांनी विशेष तक्ते तयार केले होते. त्यांचा सव्‍‌र्हेच्या लोकांना फार उपयोग होई. एवढेच नव्हे तर, एव्हरेस्टनी तयार केलेल्या काही तक्त्यांत राधानाथांनी बदलही केले होते. जॉर्ज एव्हरेस्ट यांची तर राधानाथांवर विशेष मर्जी होती. अनेकदा गणितीय विश्लेषणात एव्हरेस्ट त्यांचा सल्ला घेत.

हा बुद्धिमान तरुण सहकारी कधीतरी सोडून जाईल याचा एव्हरेस्टना सतत घोर असे. १८३८ मध्ये राधानाथ सव्‍‌र्हे सोडून गणिताचे शिक्षक होण्यासाठी निघालेही होते. पण एव्हरेस्ट यांनी वरिष्ठांकडे विशेष शिफारस करून राधानाथांचा पगार १०० रुपयांनी वाढवून घेतला आणि कसेबसे त्यांना थांबवले.

१८४३ मध्ये एव्हरेस्ट निवृत्त झाल्यावर कर्नल  अँड्रूय़ू वॉ हे सव्‍‌र्हेयर जनरल झाले. ते अनेकदा राधानाथांचा सल्ला घेत. त्यांनाही हा हुशार, स्वाभिमानी तरुण कधीही सोडून जाईल याची भीती वाटे. त्यामुळे त्यांनीही प्रयत्न करून राधानाथांचा पगार वाढवून दिला. रिकाम्या वेळेत राधानाथ भूगोलाकार शास्त्रामधील (geodesics)अद्ययावत माहिती मिळवत. १८४३ मध्ये त्यांची नेमणूक गणन विभाग प्रमुखपदी  (chief,  computer department) झाली.

राधानाथ अतिशय मानी व निर्भय होते. १८४३ मध्ये  डेहराडून येथे वँसीट्टार्ट या जिल्हा मॅजिस्ट्रेटने सव्‍‌र्हेच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा राधानाथांनी तीव्र व उघड विरोध केला होता. त्याबद्दल त्यांना २०० रुपये दंड लावण्यात आला.

१८४९ मध्ये कर्नल वॉ यांनी दार्जिलिंग परिसरातील हिमालयीन शिखरांची उंची मोजण्याचे काम सुरू केले. त्यामुळे मग सव्‍‌र्हेचे गणन कार्यालय कोलकात्याला नेण्यात आले. अर्थात राधानाथही कोलकात्याला आले. येथेच सव्‍‌र्हेच्या नोंदीवरून गणिते करताना Peak -15 हे पृथ्वीवरील सर्वोच्च शिखर असल्याचे १८५२ मध्ये त्यांच्या लक्षात आले. ते त्यांनी लगेच आपले प्रमुख कर्नल वॉ यांच्या निदर्शनास आणून दिले. पुढे १८६५ मध्ये रॉयल सोसायटीने त्या शिखराचे ‘माउंट एव्हरेस्ट’ हे नामकरण स्वीकारून ते सर्वोच्च असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले.

राधानाथांची प्रतिभा बहुमुखी होती. ताऱ्यांच्या निरीक्षणावरून एखाद्या ठिकाणचे अक्षांश रेखांश शोधण्याची विशेष पद्धत त्यांनी शोधली होती. १८५२ मध्ये ते कोलकात्याच्या वेधशाळेत अधीक्षक (सुपिरडेंडंट ) झाले. १८५४ मध्ये पेरीचंद मित्र या मित्रासोबत त्यांनी ‘मासिक पत्रिका’ हे नियतकालिक सुरू केले. महिला शिक्षणाला वाहिलेले हे मासिक चार वर्षे चालले.

१८६२ मध्ये, वयाच्या ४९ व्या वर्षी राधानाथांनी सव्‍‌र्हेच्या कामातून निवृत्ती घेतली. नंतर ते कोलकात्याच्या ‘स्कॉटिश चर्च कॉलेज’मध्ये गणित शिक्षक म्हणून कार्य करू लागले. ते अविवाहित होते. १७ मे १८७० रोजी वयाच्या ५७ व्या वर्षी चंदेरनगर येथे त्यांचा मृत्यू झाला.

दुर्दैवाने या प्रतिभासंपन्न व थोर गणितज्ञाचे नाव एव्हरेस्ट शिखरशोधाच्या श्रेयवादात गुंतवण्यात आले. Peak -15 हे सर्वोच्च शिखर असल्याचा शोध सव्‍‌र्हेच्या डेहराडून कार्यालयातील बी. एन. हेन्नेसी व राधानाथ शिकधर यापैकी कुणी आधी लावला, याबद्दल काही काळ वाद चालले. एव्हरेस्ट शिखरास ‘राधानाथ शैल’ असे नाव देण्यात यावे अशी मागणीही १९४८ मध्ये बंगालमधून करण्यात आली होती.

खरे तर १८४९ ते १८५१ अशी दोन वर्षे प्रयत्न करून त्या शिखराचे सहा ठिकाणांवरून वेध घेण्याचे अतिशय खडतर व जोखमीचे काम जेम्स निकल्सन यांनी केले होते. पण निकल्सन यांना मलेरिया झाल्यामुळे त्यांच्या नोंदीच्या आधारे प्राथमिक गणिते करण्याचे काम गणन विभागात झाले. त्या विभागाचे प्रमुख राधानाथ असल्याने त्यांना सर्व शिखरांच्या नोंदी उपलब्ध होत्या. त्या आधारे त्यांनी सर्वात आधी, १८५२ मध्ये Peak -15 ची उंची २९ हजार फूट म्हणजे सर्वाधिक असल्याचा निष्कर्ष काढला होता. पुढे वॉ यांच्यासोबत या निष्कर्षांची पडताळणी करून हेन्नेसी यांनी २९,००३ फूट ही अंतिम उंची निश्चित केली ती १८५४ मध्ये. म्हणजे एकूणच हे एक मोठे सामूहिक कार्य होते. त्यात  कर्नल वॉ, जेम्स निकल्सन, राधानाथ सिकधर व हेन्नेसी अशा अनेकांचा वाटा होता. त्यामुळे श्रेयाचा वाद निरर्थक होता. कदाचित ही जाणीव असल्यामुळेच स्वत: राधानाथ हे या वादापासून दूर होते. त्यांच्या हयातीत हा वाद उद्भवलाही नाही. पण पुढे उठलेल्या श्रेयाच्या गदारोळात राधानाथांचे इतर महत्त्वाचे योगदान झाकोळले गेले. एकूणच त्यांचे कार्य व योगदान याबद्दल जागतिक गौरव व उपेक्षा हे दोन्ही त्यांच्या वाटय़ाला आले.

जॉर्ज एव्हरेस्ट, कर्नल वॉ यांनी अनेक ठिकाणी राधानाथांचे प्रावीण्य व योगदान याबद्दल लेखी व  गौरवपूर्ण उल्लेख केले आहेत. १८६४ मध्ये ‘जर्मन फिलॉसॉफीकल सोसायटी’चे सदस्यत्व राधानाथांना देण्यात आले. ‘ट्रिग्नोमेट्रिक सव्‍‌र्हे’चे पाहिले हस्तलिखित (मॅन्युअल) राधानाथांनी तयार केले होते. हे त्यांचे अतिशय महत्त्वपूर्ण कार्य होते. त्याच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रास्ताविकात राधानाथांचा उल्लेख होता. पण १८७५ मधील तिसऱ्या आवृत्तीत ते प्रास्ताविकच वगळण्यात आले. याबद्दल त्या काळात अनेक इंग्रज विद्वानांनी टीकाही केली.

त्यांच्या मृत्यूनंतर ७८ वर्षांनी १९४८ मध्ये बंगालमधील चंदेरनगर येथील एका रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले व त्यांचा एक पुतळा उभारण्यात आला. २००४  मध्ये ट्रिग्नोमेट्रिक सव्‍‌र्हेच्या द्विशताब्दी निमित्त भारताच्या पोस्ट खात्याने राधानाथ सिकधर यांच्या स्मरणार्थ एक तिकीट जारी केले. ‘नेचर’ या जगप्रसिद्ध व प्रतिष्ठाप्राप्त वैज्ञानिक नियतकालिकाच्या ७ जुलै १८७० च्या अंकात पुढीलप्रमाणे नोंद आढळते.

‘‘अनेक वर्षे ‘ट्रिग्नोमेट्रिक सव्‍‌र्हे ऑफ इंडिया’ चे मुख्य गणक (chief  computer) राहिलेले, कोलकाता वेधशाळेचे प्रमुख आणि विशेष प्रावीण्य असणारे गणितज्ञ बाबू राधानाथ सिकधर यांचे मागच्या मेमध्ये कलकत्ता येथे निधन झाले.’’

श्रेयाच्या साठमारीत न अडकलेल्या, आनंदाने एक गणित शिक्षक राहू इच्छिणाऱ्या गणितज्ञाच्या कार्याची मरणोत्तर असली तरी, ही फार मोठी नोंद आहे.

‘जिनियस कॉन्ट्रिब्युट्स, स्कॉलर्स स्टडी अ‍ॅण्ड अदर्स फाइट फॉर क्रेडिट’ अशी एक म्हण आहे. तिचा प्रत्ययच राधानाथांच्या चरित्रातून येतो.