भारताच्या औषधी उद्योगाचा जगाला सुपरिचित चेहरा ठरावेत इतके कार्यकर्तृत्व असलेले रणजीत शहानी यांचे निधन केवळ उद्योग क्षेत्राचीच नव्हे तर जनसामान्यांना परवडणाऱ्या आणि सार्वत्रिक आरोग्य सेवेसाठी नावीन्य व संशोधन प्रयासांचीही हानी ठरावी. नोव्हार्टिस (इंडिया) या स्विस औषधी कंपनीचे तब्बल दोन दशके उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राहिलेले आणि सध्या जे बी फार्मास्युटिकल्सच्या अध्यक्षपदासह, अन्य अनेक जबाबदाऱ्यांवर सक्रिय राहिलेल्या शहानी यांनी शनिवारी वयाच्या ७४ वर्षी जगाचा निरोप घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> लोकमानस : आता खारांच्या मुदतवाढीची चौकशी हवी

पाकिस्तानातून निर्वासित म्हणून भारतात दाखल झालेल्या सुंदरी आणि गोबिंदराम शहानी या दाम्पत्याचे सुपुत्र रणजीत शहानी यांनी आयुष्यभर चढ-उतारांचा अगदी जवळून अनुभव घेतल्याने, अधूनमधून आलेले प्रतिकूलतेचे वारे त्यांच्यासाठी कधी असामान्य ठरले नाहीत. ते ज्या कंपनीचे नेतृत्व करीत होते त्या नोव्हार्टिसलाही त्यांनी वादळ-वाटेतून सुलभरीत्या तारून नेले. अर्थात रक्ताच्या कर्करोगावरील ग्लिव्हेकच्या गाजलेल्या पेटंट प्रकरणाचा निकाल नोव्हार्टिससाठी अनुकूल ठरला नाही. ग्लिवेकप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने नोव्हार्टिससारख्या नवोदित कंपन्यांना बौद्धिक संपदेसाठी संरक्षण मिळणार नाही, हेच संकेत दिले. तथापि बौद्धिक संपदा संरक्षण मर्यादित चौकटीत बंदिस्त करणे व बाजारपेठेतील प्रवेशामध्ये अडथळे निर्माण करणे हे खुद्द भारताच्या औषध उद्याोगाला मारक आणि नवनवीन उत्पादने विकसित, संशोधित करण्याला प्रतिबंधित करणारे ठरेल, ही शहानी यांची भूमिका धोरणकर्त्यांनाही मान्य करावीच लागली.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : कराराचा लाभ तूर्तास चॉकलेटस्वस्ताईपुरता!

एका बहुराष्ट्रीय कंपनीचा म्होरक्या म्हणून त्यांची बाजू लढवणाऱ्या या भारतीय अधिकाऱ्याने, देशाचे आणि देशाच्या आरोग्य सेवेशी इमान कधीही सोडले नाही. त्यांनी दिल्लीदरबारी बसणाऱ्या नोकरशहा व त्यांच्या लालफीतशाही कचाट्यातून हे क्षेत्र मुक्त होऊन नवोन्मेष, नवगुंतवणूक आणि सर्जनतेसह कक्षा रुंदावत नेईल, असे प्रयत्न केले. ‘ओपीपीआय’ या भारतीय औषध निर्मात्यांच्या संघटनेचे मानद अध्यक्ष म्हणून त्यांनी या प्रयत्नांना मूर्त रूप दिले. साहित्यात विरोधाभासाचा चपखल वापर केला जात असतो, तसा व्यवहारातील विरोधाभास पदोपदी उलगडण्याचे कसब शायरीच्या चाहत्या शहानी यांनाही अवगत असावे. म्हणूनच भारतीय औषधी कंपन्यांची गोंधळलेली मानसिकता त्यांच्या लेखी कायम चिंतन-समालोचनाचा विषय होता. एकीकडे या कंपन्या जेनेरिक औषधांचा जगाला पुरवठा करून स्वत:ला ‘जगाची फार्मसी’ म्हणून मिरवत असतात. दुसरीकडे भारतीय औषधी उद्याोगाचे नेते संशोधनावर आधारित उद्योगाचे स्वप्न पाहताना दिसतात. सर्वप्रथम भारतीयांची औषधांची गरज भागवण्याला त्यांचा प्राधान्यक्रम असणे योग्य ठरणार नाही काय, असा त्यांचा साधा सवाल असे. आपल्याच उद्योग क्षेत्राची कानउघाडणी करणाऱ्या त्यांच्या अशा गोळ्यांची (औषध) मात्रा यापुढे नसेल हे दु:खदच!

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranjit shahani life journey remembering mr ranjit shahani zws