हॉलीवूडमधील सिनेमांतून लक्षोत्तमा नायिका बनण्यासाठी साठचे दशक सर्वाधिक सुपीक होते. कारण हिप्पी चळवळ, व्यक्तिधिष्ठित विचारसरणीचा प्रभाव, ‘प्लेबॉय’ मासिकाने समाजात पसरविलेल्या मुक्तछंदी जगण्याचा कळस आदी गोष्टींमुळे अमेरिकेतून अमेरिकेतर देशांमध्ये चक्षुसंपन्न निर्यातीचा विडाच ललनांनी उचलला होता. रॅकेल वेल्च या लक्षोत्तमांपैकी एक. या मदनिकेने दिलेल्या एकाच बिकिनी दृश्यातील भूमिकेचा शिक्का तिच्या हयातभरासाठी पुरून उरला आणि नंतर केलेल्या भूमिकांना बाजूला सारून तिला ‘बॉम्बशेला’दी उपमांनी सजवत राहिला. एका गाजलेल्या बॉण्डप्रियेने नाकारलेली भूमिका स्वीकारल्याने रॅकेल वेल्च हिचा लक्षधारित अवतार जगासमोर आला. चित्रपटात या गुहेत राहणाऱ्या तरुणीच्या सर्वागीण सौंदर्याचे गूढ उकलण्याची शब्दचुरस त्या काळी हॉलीवूड पोहोचलेल्या राष्ट्रांमध्ये लागली. केवळ तीन ओळींचा साभिनय अदाकारीचा हा डोळय़ांसाठी भरगच्च अनुभव ‘वन मिलिअन इयर्स बीसी’ चित्रपटाला अजरामर ठरवून गेला. तिचा बोलबाला संभाव्य बॉण्डगर्ल म्हणून व्हायला लागला. ‘लाइफ’ मासिकाने त्यासाठी प्रयत्नही केले. पण बॉण्डप्रिया न बनताही या लक्षोत्तमेने आपल्या कारकीर्दीचा अध्याय उत्तमरीत्या रचला. शिकागोमध्ये सुखवस्तू कुटुंबात जन्मलेल्या रॅकेल हिची जडणघडण कॅलिफोर्नियामध्ये रंगभूमीवर झाली. तिथे बॅले नृत्याचे धडेही तिने गिरवले आणि घरातील गॅरेजमध्ये नाटक बसवता बसवता तिने नाटकासाठी शिष्यवृत्ती पटकावली. लग्न करून स्थानिक वृत्तवाहिनीत हवामान-अंदाज सांगण्याची नोकरी करताना तिला चित्रपटाची दुनिया खुणावू लागली. पती आणि शहर या दोहोंशी काडीमोड घेत तिने चित्रनगरी लॉस एंजेलिस गाठून मॉडेलिंग वा हॉटेलात वेट्रेस बनून दिवस काढले.
‘फॅण्टेस्टिक व्हॉएज’ या चित्रपटातून ती पहिल्यांदा पडद्यावर झळकली. त्याहीपेक्षा, पोस्टरवर बिकिनीसह झळकलेली तिची छबी चित्रपटावर दर्शकांच्या उडय़ा पडण्यास कारणीभूत ठरली. ‘पुढल्या सगळय़ा काळात माझी ‘सेक्स सिम्बॉल’ ही ओळख दूर करण्यासाठी मला झगडावे लागले. आकर्षक असल्याने लोक माझ्याकडे पाहतात, हे सुखावह असले, तरी फक्त त्यासाठीच मला ओळखले जाऊ नये, अशी माझी इच्छा होती,’ असे रॅकेल हिने वारंवार मुलाखतींत सांगितले. विशेष म्हणजे ज्या काळात ह्यू हेफ्नर यांचे ‘प्लेबॉय’ हे मासिक उभरत्या आणि बहरत्या नायिकांना आपल्या पानांत झळकवत त्यांच्या मुलाखती छापत होते, तेव्हा त्यास सपशेल नकार देत रॅकेल यांनी आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यालाच या मासिकात जागा दिली. पुढल्या काळात त्यांनी रंगभूमीवर वेगवेगळय़ा भूमिका गाजवत आधी थट्टा- अवहेलना करणाऱ्या समीक्षक आणि टीकाकारांना आश्चर्यचकित केले. टीव्हीवरही त्यांनी काम केले आणि चित्रपटांमध्ये ‘तीन ओळींची सुपरस्टार’ या अपसमजाला काढून टाकण्यासाठी रॅकेलने पहिल्या दहा वर्षांत विज्ञानिकांपासून वेस्टर्न आणि प्रेमकथांपासून देमार चित्रपट स्वीकारले. ‘थ्री मस्कीटर्स’ या चित्रपटातील भूमिकेसाठी गोल्डन ग्लोब मिळाल्यानंतर मात्र टीकाकारांची तोंडे बंद झाली आणि ताठ मानेसह लक्षोत्तमी नजाकतीत मासिकांची मुखपृष्ठे गाजविण्याच्या कामात ती रमली. नुकत्याच झालेल्या तिच्या निधनानंतर या लक्षोत्तमेने दिलेल्या योगदानाची उजळणी करण्यात नेत्रसुखी जग सध्या गढले आहे.