राजेश बोबडे
‘‘आपल्या देशात भजन-कीर्तनाच्या भरवशावर पोट भरण्याचा मार्ग यापुढे बंद व्हायला पाहिजे. संतांनाही हा मार्ग अमान्य होता. भजन कीर्तनादी कार्यातून समाजाच्या मनोवृत्ती नैतिकतेवर आरूढ करणे, हे काम अत्यंत महत्त्वाचे आहे, यात शंकाच नाही. पण हे काम उपजीविकेचे साधन झाले की त्याची दिशा चुकू लागते,’’ असे चिंतन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी १९५२ साली पंढरपूर येथे संत संमेलनात व्यक्त केले.
उपाय सुचवताना महाराज म्हणतात, ‘‘शासनानेच अशा उपदेशक बुवांच्या कार्याचे निरीक्षण करून उपजीविकेसाठी एखादी योजना तयार करावी. सध्याचे राजकारण ‘बुवा’ म्हणविणाऱ्या समाजाकडे कोणत्या अपेक्षेने पाहते, ती आपणास कितपत पूर्ण करता येईल याचा विचार झाला पाहिजे. सध्याचा समंजस समाज बुवालोकांकडे ज्या अपेक्षेने पाहतो त्याला पूर्वीच्या संतांच्या कामगिरीची पार्श्वभूमी आहे. समाजाच्या उन्नतीत अडथळे आणणारे जे जे प्रश्न ज्या काळी प्रमुख होते, ते दूर करण्यासाठी त्या- त्या काळातील संतांनी जिवापाड प्रयत्न केले. इतकेच नव्हे तर संतांनी सांगावे व राजांनी तसे वागावे अशीच योजना पूर्वी प्रचलित होती. इतिहासात अशी शेकडो उदाहरणे आहेत. संतऋषींचा सल्ला, त्यांनी राजा व प्रजा यासाठी निश्चित केलेले स्मृतिवजा नियम, यांना अनुसरूनच पूर्वीचे राजकारण चालत असल्याने जनतेच्या जीवनाचे प्रश्न त्यातच सुटत असत. परंतु काळ बदलला. राजकारण व धर्मकारण यांचा संबंध दुरावला आणि भारतातील जनता भांबावून गेली. राजकारण स्वत:च्या लहरीने जनतेच्या जीवनाशी खेळू लागले आणि धर्मकारणाने श्रद्धेच्या आधारे जिकडे तिकडे आपले हातपाय पसरले. खरा मार्ग कोणता, खरी जीवनदृष्टी कोणती, खरा शासक नि नेता कोणता यासंबंधी विचारांचा गोंधळ जनतेत निर्माण झाला. आपल्या सर्वांगीण उन्नतीसाठी काय करावे, कोणत्या मार्गाने जावे, धर्मकारण श्रेष्ठ की राजकारण, या संबंधी लोकांना योग्य दृष्टीच मिळेनाशी झाली आणि लोकांच्या या भांबावलेल्या जीवनात सर्वच बाबतीत त्यांना योग्य मार्ग दाखविण्याची जबाबदारी सांभाळण्याऐवजी, आमचे उपदेशक ठरावीक चाकोरीतून ठरावीक बोध करू लागले.’’
हेही वाचा >>> मानसिक आरोग्य हा मानवी हक्कच!
‘‘अर्थात् हे आमच्या उज्ज्वल संतपरंपरेला धरून आहे, असे कसे म्हणता येईल? समाजात काहींना घरदारांची फिकीर असते तर काहींना जहागीरदारीची काळजी असते; पण ज्या लोकांनी आपले जीवनच देवाला अर्पण केले आहे, त्या साधुसंतांचे घरदार सारा देश आहे. तेव्हा त्यांना सर्व लोकांच्या हिताचीच चिंता करणे गरजेचे नाही का? एकच चिंता हवी की, माझ्या देशात कोणती उणीव आहे, समाज कशाने सुखी व उन्नत होऊ शकेल. संतांनी आध्यात्मिकतेला सोडून वागावे, असे मला म्हणायचे नाही. उलट, आध्यात्मिकतेची संजीवनी या सेवाकार्याच्या आड न येता ती अधिक उपयुक्त ठरते असाच अनुभव आहे. त्यांनी वनात झोपडय़ा बांधून राहावे असेही नाही; उलट समाजापासून दूर न राहताच त्यांना स्वत:बरोबर सर्वाचे कल्याण सुगमतेने साधता येणार आहे.
rajesh772@gmail.com