राजेश बोबडे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आईचे नाव मंजुळा. सर्वत्र मंजुळामाता म्हणून त्यांची ओळख! त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विचार व्यक्त करताना महाराज म्हणतात, ‘‘आजवर जे जे महापुरुष होऊन गेले किंवा आम्ही ज्यांना ज्यांना देव मानतो ते महापुरुष किंवा देव म्हणून जन्मास आले नव्हते. तुमच्या आमच्यासारखे सामान्य माणूस म्हणूनच जन्मास आले होते. पण आपल्या चारित्र्याने, त्यागाने, सेवेने, असामान्य कर्तृत्वाने ते महापुरुष झाले. देवत्वाचा दर्जा त्यांना मिळाला म्हणूनच आपण विशेषत: त्यांच्या कार्याकडे पाहिले पाहिजे.’’
‘‘त्यांची पूजा किंवा त्यांचा उत्सव करणे, हे त्यांच्या नावावर दिखाऊ अवडंबर किंवा अंधश्रद्धा माजविण्यासारखे आहे. त्यांच्या कार्याची व तत्त्वांची स्मृती आपल्या जीवनात उतरविणे आवश्यक आहे. ज्यांना ज्यांना आपण ‘महा’ मानत आलो, ते आपापल्या काळातील विषमता, अमानुषता, अज्ञान यांचा नाश करण्यासाठी जन्मभर लढणारे मानवतेचे महावीर होते, आदर्श क्रांतिकारक होते, ही गोष्ट प्रत्येकाने ध्यानी घेतली पाहिजे. त्या महात्म्यांच्या मानवतेची, विश्वप्रेमाची वा दैवी सामर्थ्यांची साधना जर आपण आजच्या काळात करू तरच त्यांचे स्मृती उत्सव सफल होऊ शकतील. वास्तविक हे उत्सव किंवा ही तीर्थक्षेत्रे आपल्या पूर्वजांनी एका विशिष्ट उच्च हेतूने निर्माण केली आहेत. त्यातून बहुजन समाजाला सत्कर्माचे धडे देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. विशिष्ट वेळी सर्व संतांनी, पंडितांनी, विद्वानांनी एकत्र यावे व जनतेला पुन्हा जागरूक करून मानसिक व बौद्धिक विकासाला हातभार लावून देवतांचे प्रभावी आदर्श त्यांच्यासमोर ठेवावेत म्हणूनच ही भव्य मंदिरे, यात्रा, उत्सव यांची योजना करण्यात आली.’’
‘‘मंजुळामातेचे केवळ स्तोत्र गायल्याने आपला उद्धार होणार नाही, तिने आपल्या जीवनात केलेले काम व तिच्या संदेशाचेही स्मरण ठेवले पाहिजे. त्यानुसार वागण्याची तयारी ठेवली पाहिजे. मदांध झालेल्या रावणाच्या हातून भूमिकन्येला सोडविण्याचे कार्य रामाने सामान्य वानरांची संघटना करून, आपल्यापुढे ठेवले आहे. भिकेस लागलेल्या वनवासी पांडवांना मातीचा एक कणही देण्याची इच्छा नसणाऱ्या कौरवांच्या हातून खरे स्वराज्य मिळवून देण्याचे कार्य श्रीकृष्णाने करून दाखविले. देशातील समाजसुधारकांनी, महात्म्यांनी जातीयता, विषमता, अमानुषता यांच्याशी लढून मानवतेचा अमर संदेश दिला. हेच कार्य आपण मंजुळामातेच्या नेतृत्वाखाली करत आहोत, असे म्हणायला काहीच हरकत नाही. तिचा मूक संदेश होता, ‘‘मोठेपणा हा श्रीमंतीत नसून सेवेत आहे, भोगात नसून त्यागात आहे व ऐषआरामात नसून कष्टात आहे.’’ हा संदेश तिच्या चारित्र्यातून पदोपदी दिसून आला. यावर अंमलबजावणी करणारेच खरोखर तिचे भक्त ठरतील व स्वत: बरोबर सर्व समाजाला सुखी करतील,’’ असे सांगून महाराज ग्रामगीतेत म्हणतात-
लाख बोक्यांहुन थोर।
एकचि माझा कर्तबगार।
हे वचन पाळोनि सुंदर।
गाव सुधारावे कार्याने।।
rajesh772@gmail.com