‘हिंदू’ हे नाव ही राष्ट्रीय संपत्ती आहे. भारतात कायम निवास करणारा कोणीही मनुष्य त्या नावावर अधिकार सांगू शकतो..

रवींद्र माधव साठे

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
40 thousand seats of public representatives are vacant in state
राज्यात लोकप्रतिनिधींच्या ४० हजार जागा रिक्त
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
Sanjay Raut
“…तर मोदींनी बांगलादेशमधील हिंदूंसाठी काहीतरी केलं असतं”, ठाकरेंच्या शिवसेनेची टीका
issue of Kashmir
संविधानभान : संविधानसभेत काश्मीरचा मुद्दा
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : “आम्हाला ‘बटेंगे तो कटेंगे’ सांगणारे अशावेळी जातात कुठे?” बेळगावच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचा भाजपाला सवाल

बर्नार्ड जोसेफ यांनी ‘नॅशनॅलिटीज : इट्स नेचर अँड प्रॉब्लेम्स’ हा ग्रंथ १९२९ मध्ये लिहिला. त्यामध्ये एक प्रकरण भारतातील राष्ट्रीयत्वावर आहे. जोसेफ यांना भारत हे राष्ट्र आहे, हा मुद्दा विवाद्य वाटला. तरीही त्यांनी हे मान्य केले आहे की, ‘आधुनिक राष्ट्रीयत्वाची जी लक्षणे समजली जातात ती भारताच्या प्राचीन इतिहासात आढळतात.’ (पृष्ठ २२८)

भारतात एकात्म राष्ट्राची कल्पना ही प्राचीन काळापासून आहे. सांस्कृतिकदृष्टय़ा भारत हजारो वर्षांपासून एक राहिला आहे. वेदकाळापासून याचे इतिहासात अनेक दाखले आहेत. राष्ट्रवादाचा प्रमुख निकष ‘एकता’ आहे. हे ऐक्य निरनिराळय़ा समाजांत भिन्न मार्गानी व तत्त्वांनी निर्माण होते, आणि पुढे त्याचे संवर्धन होते. उदाहरणार्थ भूमीवरच्या प्रेमामुळे ग्रीक समाजात, मोझाइक कायद्यामुळे ज्यू समाजात, कीर्ती व व्यक्तिस्वातंत्र्याविषयीच्या प्रेमामुळे रोमन समाजात आणि व्यक्तिस्वातंत्र्याविषयीच्या प्रेमामुळे इंग्लिश समाजात राष्ट्रवादाच्या तत्त्वांचे संवर्धन झाले, असे इतिहास सांगतो. भारताच्या राष्ट्रवादाचे व सांस्कृतिक एकतेचे गमक हिंदूत्वात आहे.

एखाद्या समाजातील घटकांत प्रदीर्घ काळापासून भूमीनिष्ठेबरोबर एकत्वाची भावना नांदत असेल तर त्या समाजास स्वत:स राष्ट्र म्हणवून घेता येऊ शकते. यानुसार हिंदूस्थानात हिंदू हेच राष्ट्र ठरतात. हिंदू समाज हा या राष्ट्राचा कणा आहे. या समाजानेच या भूमीला स्वत:च्या जातीचे नाव देण्यात आणि ते टिकवून ठेवण्यात यश मिळविले आहे. त्यास भरतभूमी म्हणा, भारत म्हणा किंवा इंडिया म्हणा; यापैकी कोणतेही एक नाव घेतले की डोळय़ासमोर हजारो वर्षांच्या हिंदू समाजाच्याच घडामोडींचा इतिहास उभा राहतो!

हिंदूंना भारत सोडून जगात अन्य कोणताही देश नाही. त्यामुळे ‘हिंदू’ हा शब्द भूमिवाचक झाला आहे. हा शब्द सांप्रदायिक नाही वा ती राजकीय विचारधाराही नाही. ती या देशाची ओळख आहे. या शब्दावर हिंदूंच्या सर्व संप्रदायांतील लोकांचा जसा अधिकार आहे त्याप्रमाणे हिंदूस्थानाविषयी ज्यांना ममत्व आहे, व या देशाच्या प्राचीन परंपरेविषयी ज्यांना आपुलकी वाटते अशा कोणाही व्यक्तीला ‘हिंदू’ या शब्दावर सारखाच दावा सांगण्याचा अधिकार आहे, असे हिंदूत्व मानते.

ज्ञानकोशकार केतकर म्हणतात, ‘जर हिंदू आणि इतर यांमधील अंतर तत्त्वत: हिंदूतील दोन जातींतील अंतरापेक्षा निराळे नाही आणि संप्रदाय हे वस्तुत: जातिस्वरूपी नसून मत व उपासना यांपुरते आहेत, तर हिंदूंपैकीच जी माणसे ख्रिस्ती किंवा मुस्लीम मत स्वीकारतात त्यांना हिंदू म्हणण्यास काय हरकत आहे? मुस्लीम आणि ख्रिस्ती हे हिंदूतीलच दोन संप्रदाय समजण्यास काय हरकत आहे? असे न म्हणण्याचे कारण एवढेच की, भारतीय ख्रिस्ती किंवा मुस्लीम हे आपणास हिंदू म्हणवत नाहीत. मग प्रश्न असा उपस्थित होतो की एखादा संप्रदाय किंवा जात हिंदू आहे किंवा नाही हे ठरविण्यास काही प्रमाण आहे की ते एखाद्या जातीच्या किंवा संप्रदायाच्या स्वेच्छेवर आहे? हिंदू या नावावर अधिकार स्थापित करणे हे त्या जातीच्या किंवा संप्रदायाच्या इच्छेवरच आहे. (श्री. व्यं. केतकर- महाराष्ट्रीय ज्ञानकोश विभाग पहिला – हिंदूस्थान आणि जग, पृ. ९९).

काँग्रेसने सर्वसमावेशक हिंदी राष्ट्रवादाचा पुरस्कार केला. त्यामुळे ‘हिंदू’ हा शब्द राजकीयदृष्टय़ा त्याज्य ठरला परंतु मुद्दा असा आहे की त्यामुळे काँग्रेसला आपल्या तत्त्वज्ञानाप्रमाणे, या देशात हिंदी राष्ट्र निर्माण करता आले का? हिंदी राष्ट्राची सीमा आणि हिंदी शासनाची सीमा हिंदी राष्ट्रवादाच्या पुरस्कर्त्यांच्या नजरेत एक होती. पण मग ‘अल्पसंख्य आणि नागरिक’ असे शब्दप्रयोग राष्ट्रवादाच्या दृष्टीने कसे होऊ शकतात? या देशात कोणी अल्पसंख्य असेल तर बहुसंख्य कोण आहेत? आणि जर कोणी बहुसंख्य असतील तर त्यांच्या राष्ट्राचे नाव काय आहे?

याचे उत्तर शेवटी हिंदू, हिंदूत्व, हिंदू राष्ट्र असेच आहे. या देशात एक जरी हिंदू शिल्लक राहिला तरी हे हिंदू राष्ट्रच राहील असे, रा. स्व. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार म्हणत. हिंदूत्व ही संकल्पना येथील राष्ट्रीयत्वाचा मूलाधार आहे. हिंदूत्व प्रतिक्रियात्मक नसून विधायक व रचनात्मक आहे. जुलै १९९५ मध्ये रामकृष्ण मिशनवरील खटल्याच्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला तो हिंदूत्वास विरोध करणाऱ्या मंडळींनी लक्षात ठेवण्याजोगा आहे. न्यायालयाने या निर्णयात मोनियर विल्यम्स यांच्या ‘रिलिजस थॉट अँड लाइफ इन इंडिया’ या ग्रंथातला दाखला दिला. तो दाखला असा ‘हिंदू धर्म म्हणजे तथाकथित ब्राह्मणवादावर आधारलेला व ईश्वराचे अस्तित्व मानणारा धर्म आहे, असे म्हणणे योग्य नाही. काळाच्या ओघात या धर्माने अनेक मते, श्रद्धा आणि तत्त्वे आत्मसात केली आहेत. अनेक भिन्न प्रवाह सामावून घेऊन विशाल होत गेलेल्या गंगेचीच उपमा या धर्माला योग्य ठरेल. अध्यात्म साधनेचे व अंतिम सत्याप्रत जाणारे विविध मार्ग, अनेक देवदेवता मानणारा बहुदैवतवाद, निरीश्वरवाद, बौद्धांचा शून्यवाद, श्रीशंकराचार्याचा अद्वैतवाद इत्यादी भेदांना एका सूत्रात गोवून या धर्माने एकत्र आणले आहे.’

या विषयाचे विवेचन करताना न्यायमूर्तीनी विल्यम्स यांच्या समवेत स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, डॉ. राधाकृष्णन, अर्नोल्ड टॉयनबी यांच्या लेखनाचा व विचारांचा आधार घेतला आहे. स्वामी विवेकानंदांनी मांडलेले विचार आपण लक्षात घेतले तर बुद्धिवादावर आधारलेल्या हिंदू धर्मात निरीश्वरवादी लोकांनाही स्थान आहे, हे स्पष्ट होते. हिंदू ही संकुचित संज्ञा नाही तर ती एका प्राचीन संस्कृतीची निदर्शक आहे. ती एक जीवनपद्धती आहे, ही भूमिका स्वीकारली तर भारताला आपली मातृभूमी मानणारे आणि ज्यांचे पूर्वज शतकानुशतके याच भूमीत राहात होते ते सर्वच हिंदू या संज्ञेला पात्र आहेत, असेही स्वामीजींनी सांगितलेले आहे.

रा. स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी स्वामी विवेकानंदांनी मांडलेल्या भूमिकेचे पुढे समर्थन केले. श्रीगुरुजी विशेषत: मुस्लीम व ख्रिस्ती समाजास उद्देशून म्हणतात ‘तुमचा उपासना पंथ कोणताही असो, भारत ही तुमची मातृभूमी आहे, असे तुम्ही एकदा मानलेत म्हणजे तुम्ही सर्व हिंदूच ठरता.’  (संदर्भ: श्रीगुरुजींचे विचार विश्व, लेखक- ब. ल. वष्ट)  विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी हिंदू-मुस्लीम यांचा डीएनए एकच आहे असे प्रतिपादन करून संघाची भूमिका आणखी स्पष्ट केली. हिंदू हा या देशातला पायाभूत राष्ट्रीय समाज आहे, म्हणून हिंदूत्व हेच या देशाचे राष्ट्रीयत्व आहे हे सावरकरांनी आपल्या ‘हिंदूत्व’ या प्रबंधात मांडले. त्यांचा विचार संक्षेपात सांगायचा तर जगातील कुठल्याही राष्ट्राला अस्तित्वासाठी आधारभूत म्हणून एक नागरिक-समूह लागतो. ज्या नागरिक समूहाचे हितसंबंध, आशा-आकांक्षा, इतिहास-सारे काही त्या राष्ट्राशीच संबद्ध असते. हिंदूंचा भूतकाळ, वर्तमानकाळ नि भविष्यकाळ हिंदूस्थानशी घट्ट बांधलेला आहे म्हणून हिंदू हेच येथे स्वयंमेव राष्ट्र आहेत. सावरकरांनी तर्कशुद्ध पद्धतीत ही मांडणी केली.

हिंदूत्वाची भूमिका नित्यनूतन आहे. ते विकसनशील आहे. सावरकरांच्या साहित्याचे परिशीलन केले तर आपल्याला हेच आढळेल की, ‘पुण्यभू’चा त्यांचा आग्रह हा त्या काळाशी प्रासंगिक निश्चित होता परंतु अहिंदूंनी भारतास पुण्यभू मानले तर सावरकर त्यांनाही हिंदू मानावयास तयार होते. ‘आपल्या सामायिक मातृभूमीला तुम्ही संपूर्ण प्रेम अर्पण करा आणि तिला केवळ पितृभू न समजता पुण्यभूही समजा. हिंदू समाज तुमचे स्वागत करेल’ (समग्र सावरकर वाङ्मय, खंड ६, पृष्ठ ७४)

याच पृष्ठावर ते बोहरा, खोजा, मेमन व इतर मुस्लीम व ख्रिश्चनांनाही हे आवाहन करतात आणि पृष्ठ ५४ वर ते म्हणतात की, ‘कदाचित पुढेमागे हिंदू म्हणजे हिंदूस्थानचा केवळ नागरिक आणि अन्य कोणीही नाही अशा प्रकारची गोष्ट घडून येणारच नाही असे नाही. परंतु तो दिवस तेव्हाच उगवेल, जेव्हा आक्रमक आणि स्वार्थी वृत्तीचे हात बळकट करणारे जातीय आणि सांस्कृतिक दुरभिमान गळून जातील आणि हे सारे धर्म जेव्हा आपला संकुचितपणा सोडून देऊन विश्वाच्या बुडाशी असलेल्या सनातन तत्त्वांच्या विचारांचे सर्वाचे असे एक जागतिक पीठ निर्माण करतील.’ (समग्र सावरकर, खंड ६) यावरून हे सिद्ध होते की, ‘पुण्यभू’ हा शब्द सदासर्वकाळ आवश्यक आहे, असे सावरकरही मानत नव्हते.

ज. द. जोगळेकर हे सावरकरांच्या विचारांचे अभ्यासक होते. ‘हिंदूत्व, भारतीयत्व आणि निधर्मी शासन’ या पुस्तकात ते म्हणतात, ‘सावरकरांनी मांडलेला पुण्यभूचा मुद्दा आपण बाजूला ठेवू, आणि या प्रश्नाकडे वेगळय़ा दृष्टिकोनातून पाहू. समजा भारतातील ख्रिस्ती वा इस्लामी संप्रदायाच्या लोकांनी आपल्याला हिंदू म्हणवून घेण्याचे ठरविले तर त्याला कोण प्रतिबंध करू शकेल? श्री. व्यं. केतकर यांनी म्हटल्याप्रमाणे हिंदू या नावावर अधिकार स्थापन करणे हे ज्या त्या जातीच्या किंवा संप्रदायाच्या इच्छेवर अवलंबून आहे. हिंदू हे नाव ही राष्ट्रीय संपत्ती आहे. त्या नावावर भारतात कायम निवास करणारा कोणीही अधिकार सांगू शकतो. खरी गोष्ट अशी आहे की, राष्ट्रीयत्व ही भावनिक गोष्ट आहे. तिचा आधार भावना आहे. ती लादण्यासारखी गोष्ट नाही. सैन्यात सक्तीची भरती होते त्याप्रमाणे राष्ट्रीयत्वात सक्तीने भरती करता येणार नाही. खरी भावना अशी की, जी व्याख्येच्या कायद्याच्या नियमाच्या कक्षेत धरून ठेवता येत नाही. भावनेचा खरा उद्रेक झाला की ‘पितृभू’ नि ‘पुण्यभू’ या शब्दांचा छल न करताच एखादा उद्घोष करेल, ‘मी हिंदू आहे, मी हिंदी आहे, मी भारतीय आहे.’ त्याने काहीही घोष केला तरी त्याचा अंतिम अर्थ एकच राहणार. (पृष्ठ. ३३)

Story img Loader