उपासना पद्धती बदलल्याने राष्ट्रीय जीवनाचा प्रवाह बदलत नाही. येथील राष्ट्रीय आणि सांस्कृतिक प्रवाहात येतात ते ते सर्व हिंदूत्वाचे घटक आहेत.
रवींद्र माधव साठे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी १९२५ मध्ये जेव्हा संघाची स्थापना केली त्या वेळी लोक विचारत की ‘तुम्ही मुस्लीमविरोधी आहात?’ डॉक्टर म्हणत ‘नाही’. लोक पुन्हा विचारत की, मग ‘ख्रिश्चनविरोधी आहात?’ डॉक्टर म्हणत ‘तेही नाही’ मग लोक प्रश्न करीत ‘मग तुम्ही काय आहात?’ डॉ. हेडगेवार म्हणत की ‘आम्ही हिंदू अभिमुख आहोत. आम्ही हिंदूंचा विचार करतो कारण हिंदू समाज आणि हिंदूस्थान हे येथील समीकरण आहे. देशाचा विचार करणे म्हणजे हिंदू समाजाचा विचार करणे.’ डॉ. हेडगेवार यांचा संघ स्थापनेमागील दृष्टिकोन असा होता.
या दृष्टिकोनातून संघाकडे ‘हिंदू संघटन’ म्हणून पाहणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ- एखादा युवक रोज आखाडय़ात भरपूर व्यायाम करत असेल आणि शरीर स्वस्थ ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर, तो कोणाला तरी मारण्यासाठी व्यायाम करत आहे, असा त्याचा अर्थ नाही. तो त्याच्या प्रकृतीची चिंता ‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्’ म्हणून करतो. याचप्रमाणे हिंदू समाजाचे स्वास्थ्य ठीक राहावे यासाठी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदू समाज संघटित करत आहे. त्यामुळे हे संघटन अन्य कोणत्याही समाजाच्या विरोधासाठी नाही.
संघ जेव्हा ‘हिंदू’ म्हणतो त्या वेळी या देशात अन्य उपासना किंवा पंथ मानणारे जे लोक आहेत त्यांच्याबद्दलच्या संघाच्या दृष्टिकोनाविषयी शंका उत्पन्न केली जाते आणि ती स्वाभाविक आहे. देशात सुमारे २० कोटी मुस्लीम व तीन कोटी २५ लाख ख्रिस्ती राहतात. संघाची अशी भूमिका आहे की, या देशात राहणारे मुस्लीम तुर्कस्तान, इराण वा अफगाणिस्तानातून आलेले नाहीत आणि ख्रिस्ती इंग्लंड, फ्रान्स किंवा जर्मनीतून आलेले नाहीत. हिंदूंप्रमाणेच तेही या देशातील रहिवासी आहेत. फक्त फरक इतकाच, की काही पिढय़ांपूर्वी या दोन्ही समाजांनी आपापल्या उपासना पद्धतीत बदल केला. या उपासना पद्धतीस आक्षेपार्ह असे काहीच नाही. हिंदूस्थानचा इतिहास आणि हिंदू समाजमनाचे अध्ययन केल्यास हे स्पष्टपणे आढळेल, की हिंदू समाजमन आणि हिंदू तत्त्वज्ञान हे नेहमीच व्यापक व विशाल राहिले आहे.
आजकाल विशेषत: २०१४ नंतर सहिष्णुता आणि असहिष्णुता हे शब्दप्रयोग फारच प्रचलित झाले आहेत. हिंदू संघटना अन्य धर्मीयांशी असहिष्णूपणे वागत असल्याचा आरोप केला जातो. विली ग्राहम नावाचे एक प्रसिद्ध धर्मगुरू एकदा भारतात आले होते. त्यांनी म्हटले होते की, ‘दि हिंदूज आर दि मोस्ट टॉलरन्ट पीपल इन द वल्र्ड.’ परंतु हिंदूंचे केवळ हे वर्णन पुरेसे नाही. टॉलरन्स ही चांगली गोष्ट आहे, परंतु खूप चांगली गोष्ट नाही. टॉलरन्सचा अर्थ काय तर ‘तुम्हाला आपल्या मतानुसार (उपासना) चालण्याचा अधिकार आहे,’ परंतु टॉलरन्सचा एक अर्थ असाही होतो की ‘तुम्हाला तुमच्या मतानुसार चालण्याचा अधिकार असला तरी माझे मत तुमच्यापेक्षा अधिक चांगले आहे.’ (‘आय टॉलरेट यू, बट माय आयडिया, माय वे, माय रिलिजन इज बेटर दॅन युअर्स.’)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे आणीबाणीनंतर मुंबईत एक भाषण झाले. त्यात ते म्हणाले होते, ‘१९६४ मध्ये मुंबईत युखेरिस्टिक काँग्रेस भरविण्यात आली आणि त्यास पोप येणार होते. परंतु याला काही नागरिकांनी विरोध केला. कारण पोप मुंबईतील गरीब वस्त्यांमध्ये गेल्यास सेवाकार्याच्या नावाखाली धर्मातर घडेल, असे विरोधकांना वाटले. पोपना विरोध होताच मुंबईच्या कार्डिनल ग्रेशस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात ते म्हणाले, ‘आमचा उद्देश धर्मातराचा नसून गरीब वस्त्यांमधून मानवीय दृष्टिकोनातून सेवा करणे हा आहे.’ बोलता-बोलता ते म्हणाले, ‘वुई बिलिव्ह इन टॉलरन्स’. एका चतुर पत्रकाराने त्यावर त्यांना सांगितले की, ‘तुम्ही टॉलरन्सवर विश्वास ठेवता, पण आम्ही हिंदू तर त्याच्याही पुढे गेलो आहोत. आम्ही मानतो की, सर्व धर्म श्रेष्ठ व समान आहेत. आपापल्या धर्ममताने चालून सर्वाना मोक्ष व मुक्ती मिळते. त्यामुळे आपणही सर्व धर्म समान आहेत, असे म्हणा,’ परंतु त्यावर ग्रेशस म्हणाले, ‘टॉलरन्सची मान्य करेन परंतु सर्व धर्म समान आहेत, असे मात्र म्हणणार नाही.’ एवढेच नाही तर पुढे त्यांनी असे उदाहरण दिले की, ‘एखादी व्यक्ती एखादा साबण विकायला निघाली असेल, तर एखाद्या खास ब्रँडच्या साबणाचा एजंट असे कसे म्हणेल, की आमच्या साबणासारखेच अन्य साबणसुद्धा चांगले आहेत. त्यामुळे अन्य धर्मसुद्धा आमच्या धर्माइतकेच श्रेष्ठ आहेत, असे मी कसे म्हणेन?’ (१४ जानेवारी १९७८, मुंबई)
इतिहास सांगतो की अनेक देव मानणारे निसर्गत:च सहिष्णू असतात. खरे तर देव फक्त एक व आमचाच तेवढा खरा असे म्हणणारे ‘धर्म’ निसर्गत:च असहिष्णूच असतात. असहिष्णुतेबद्दलचा माझा हा मुद्दा पुढील उदाहरणांनी अधिक स्पष्ट होईल.
१) ही घटना इराणमधील आहे. विरोधकांच्या बाबतीत मुस्लीम मानसिकता काय असू शकते याचे हे उदाहरण. इ. स.१४९० च्या सुमारास इस्माईल नावाच्या तरुणाने इराण जिंकून घेतला. तो स्वत: शिया होता आणि त्याला सुन्नी मंडळींचा तिटकारा होता. त्याने सुन्नींपुढे दोन पर्याय ठेवले. एक, तुम्ही शिया व्हा किंवा मृत्यू पत्करा. हा हा म्हणता इराणचे सुन्नी शिया झाले. (‘द इरानिअन्स : हाऊ दे लिव्ह अँड वर्क’- जॉन अॅबॉट, पृष्ठ ३८) शिया व सुन्नी हे एकाच मूळ इस्लामच्या दोन फळय़ा आहेत. जे लोक आपल्यापैकीच काहींना असे वागवू शकतात, ते जे त्यांच्यापेक्षा भिन्न धर्माचे आहेत, त्यांच्याकडे कसे बघतील?
२) २००२ च्या आसपास पॅलेस्टाईन, बोस्निया, उत्तर आर्यलड व युरोप खंडातील अनेक देशांत ज्यू, ख्रिश्चन व मुस्लीम या तीन धर्मीयांमध्ये धुमश्चक्री सुरू होती. तिचा पाया मध्ययुगातील ‘क्रुसेड’च्या युद्धांनी घातला. कॅरेन आर्मस्ट्राँग या ख्रिस्ती लेखिकेने ‘होली वॉर्स-द-क्रुसेडस् अँड देअर इम्पॅक्ट’ या पुस्तकात हा निष्कर्ष काढला आहे व त्यासाठी पुरावे दिले आहेत.
३) नाझींनी अनेक छळ शिबिरांत ज्यूंना भट्टीत जिवंत जाळले होते. १९४५ मध्ये प्रत्येकी ८-९ टन मानवी राख भरलेले पाच-सहा ट्रक ‘श्ॉशसेनहोसेन’ या छळ शिबिरातून जवळच्या नाल्यात रिते केले गेले. ही राख ज्या ज्यूंना जिवंत जाळण्यात आले त्यांची होती (द ब्रदर्स ब्लड: द रुट्स ऑफ ख्रिश्चन अँटीसेमिटिझम- हे, माल्कम, पृष्ठ २). या पुस्तकात दोन हजार वर्षे कॅथॉलिक चर्चने ज्यूंचा जो छळ केला वा इतरांना करावयास लावला, त्याची साद्यंत माहिती आहे. कॅथॉलिक पंथ ज्यूंना ख्रिस्ताचे मारेकरी मानतो, म्हणून हा छळ.
४) मार्क्स हाही एका अर्थाने धर्मपंथच. या धर्माच्या नावाने स्टॅलिन, माओ आणि पूर्व युरोपातील मार्क्सवादी राजवटीत सहा- सात कोटी लोक मारले गेले, हा इतिहास सर्वाना ज्ञात आहे.
वरील दाखले बोलके आहेत. याउलट हिंदूंचे तत्त्वज्ञान व त्यांचा व्यवहार कधीच असहिष्णू नव्हता. हिंदू नेहमीच स्वागतशील व सर्वसमावेशक होते आणि आहेत. उदा: सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी इस्रायलमधून ज्यू परागंदा झाले, तेव्हा केवळ भारत वगळता अन्य सर्व देशांत त्यांच्यावर अत्याचार झाले. त्यामुळे हिंदूना असहिष्णू म्हणणे हा घोर अपमान आहे.
‘एकम् सत् विप्रा: बहुधा वदन्ति’ असे हिंदू मानतात. एक सत्य विद्वान अनेक मार्गानी सांगतात. एक लक्ष्य पण तिथे जाण्याचे विविध मार्ग असू शकतात. सर्व मार्ग समान व श्रेष्ठ आहेत, अशी आपली भूमिका आहे आणि ती आपण सिद्ध केली आहे.
संघ मानतो की, उपासना पद्धती बदलल्याने सांस्कृतिक धारा म्हणजेच राष्ट्रीय जीवनाचा प्रवाह काही बदलत नाही. येथील मुस्लीम समाजाचे खान-पान, राहणी, इ. येथील हिंदूंशी मिळतीजुळती आहे की अरबस्तानातील मुस्लिमांशी? तसेच ख्रिश्चनांची राहणी भारतातील हिंदूंसारखी आहे की इंग्लड, अमेरिकेतील ख्रिश्चनांसारखी? याचे उत्तर स्वाभाविकच भारतातील हिंदूंसारखी असेच मिळते. त्यामुळे ते चर्च किंवा मशिदीत गेले तर कोणतीही आपत्ती नाही.
मुद्दा हा की, संघाची कल्पना व्यापक हिंदूत्वाची आहे. हिंदूत्वाचे नाते हे कधीही उपासना पद्धतीशी जोडलेले नाही तर ते सदासर्वदा येथील सांस्कृतिक प्रवाह आणि राष्ट्रीयतेशी जोडलेले आहे. म्हणून जे जे येथील राष्ट्रीय आणि सांस्कृतिक प्रवाहात येतात ते सर्व हिंदूत्वाचे घटक व अंग आहेत. ‘हिंदूत्व इज नॉट एक्सक्लुसिव्ह बट इन्क्लुसिव्ह’ हे आपण लक्षात घेतले पाहिजे.