राजेश बोबडे
गुरुदेव सेवा मंडळाचे कार्य आम्ही का करत आहोत, असा प्रश्न राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज प्रचारकांना विचारतात. त्यासाठी सर्वप्रथम गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रचारकांना याचे ज्ञान असणे आवश्यक आहे, असे सांगून महाराज म्हणतात गुरुदेव सेवा मंडळ म्हणजे गुरुतत्त्व आणि गुरुशक्ती मान्य असणाऱ्या सज्जन सेवकाचे मंडळ. ज्यांचा गुरुशक्तीवर विश्वास असेल आणि सेवा हे ज्यांचे ध्येय असेल तेच या सेवा मंडळाचे
सेवक राहतील. आता गुरुत्व म्हणजे काय हे समजणेही आवश्यक आहे. प्रत्येक वस्तूत जे ज्ञान असते, श्रेष्ठपण असते त्याला आम्ही गुरूपण मानतो. महाराज ग्रामगीतेत म्हणतात..
गुरु नव्हे हाडा मांसाचा नोहे।
गुरु नव्हे जाती संप्रदाय।।
गुरु शुद्ध ज्ञानतत्त्वची। आहे अनुभवियांचे ।।
एखादा हाडामांसाचा पुरुष म्हणजे गुरुदेव अशी आमची व्याख्या अजिबात नाही. परंतु ज्यांच्या हृदयाकाशात अशा श्रेष्ठ, विश्वव्यापक शक्तीचा प्रकाश पसरला आहे, ज्याचा आत्मानुभव सर्व प्रकारच्या पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडचा आहे, व्यापक आहे, अशा आत्मज्ञानपरिपूर्ण महापुरुषाला आम्ही गुरुदेव समजतो. असे महापुरुष नित्य निर्माण होत असतात. त्यांच्या मार्गदर्शनावर आमचा विश्वास आहे. मार्गदर्शनाशिवाय कोणाचीही उन्नती होऊ शकत नाही. म्हणून अशा महापुरुषांचे मार्गदर्शन सेवा मंडळाला आवश्यक आणि अपेक्षित आहे ही एक बाब झाली.
आम्ही गुरुदेव देशकालातीत मानतो, ते साऱ्या विश्वाचे असतात. आणि त्यांचे सारे व्यवहारही सर्वासाठी असतात. ही सर्वागीण परिपूर्णता, विशाल धारणा ज्या महापुरुषाच्या संग्रही असेल ती आमची गुरुदेवशक्ती होय. जगाच्या कल्याणासाठी कोणाला कोणत्या रस्त्यावर आणले पाहिजे याचे ज्ञान त्या महापुरुषाला आधीच झालेले असते असा आमचाविश्वास आहे. ब्रह्म सत्य आणि विश्व मिथ्या मानणारे महापुरुषही येथे होऊन गेले. आम्ही त्यांच्यावर टीका करू इच्छित नाही परंतु त्यांची ‘जगमिथ्या’ दृष्टी त्या काळात भोगवादाचे निर्दालन करण्यासाठी आवश्यक होती. परंतु आजही आम्ही तोच विचार जसाच्या तसा लागू करू आणि जग मिथ्या आहे असे म्हणू तर जगाचा आणि आमचा संबंधच संपून जाईल. मग त्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न कसा करता येईल?
आम्ही सेवा मंडळाच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे या विचाराला जरा वळण देऊ इच्छितो. मानवसेवेच्या भावनेतून आजच्या साधकाने आपली साधना पूर्ण करावी, अशी आमची इच्छा आहे आणि अशा प्रकारची प्रेरणा देणाऱ्या गुरुदेवशक्तीवर आमचा विश्वास आहे. म्हणून महाराज आपल्या आदेशरचना ग्रंथात म्हणतात
गुरुदेव सेवामंडळा। गुरुदेवची विसरु नको।।
गुरुदेव हा नच देह।
आणि व्यक्तिही समजू नको।।
तत्वार्थ हे संबोधिले। तुकडया म्हणे ते जाणना ।।
निजधर्म-नीती रक्षणा। कर सामुदायिक प्रार्थना।।
rajesh772 @gmail. com